गोवा, 18 नोव्हेंबर 2026
गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान आयोजित होणारा 57वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची मुख्य संकल्पना ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ (सीमेपलीकडील कथा) अशी आहे. या महोत्सवात भारतीय सिनेमा आणि खास तयार केलेला ‘मिशन लाईफ’ विभागाला जागतिक चित्रपट चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. या दोन घटकांना एकत्र आणण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे, भारताच्या भाषिक आणि प्रादेशिक कथाकथनातील वैविध्याचा उत्सव साजरा करणे; आणि त्याच वेळी, मानवकेंद्रित दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन पर्यावरणीय बदल, निसर्गाची सक्रिय भूमिका आणि शाश्वत सहअस्तित्व यांसारख्या विषयांचा शोध घेण्यासाठी चित्रपट माध्यमाचा एक प्रभावी साधन म्हणून वापर करणे हा आहे.
या संगमाच्या माध्यमातून, हा महोत्सव ‘भारतात जगासाठी निर्मिती करा’ (Create in India for the World) या राष्ट्रीय दृष्टिकोनाला चालना देण्याचा, उदयोन्मुख सर्जनशील प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचा आणि मानवी ग्रहाप्रती तसेच एकमेकांप्रती असलेल्या सामायिक जबाबदारीवर विचार करण्यास प्रेक्षकांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो.
महोत्सवातील कार्यक्रमांच्या केंद्रस्थानी भारतीय सिनेमा आहे, जो इफ्फीचा मुख्य आधारस्तंभ आहे. देशातील चित्रपट-अनुकूल धोरणे आणि चैतन्यमय सर्जनशील अर्थव्यवस्था अधोरेखित करणारा ‘इंडियन पॅनोरमा’ विभाग, 30 फीचर फिल्म्स, 20 नॉन-फीचर फिल्म्स आणि ‘सर्वोत्कृष्ट वेब सीरिज (OTT)’ पुरस्कारासाठी नामांकित पाच वेब सीरिजचे व्यापक प्रदर्शन घडवतो.
फिचर फिल्म्समध्ये पाच मुख्य प्रवाहातील चित्रपट, भारतीय चित्रपटांच्या 'सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक' पुरस्कारासाठी स्पर्धा करणारे पाच चित्रपट, तसेच 'न्यू होरायझन' विभागांतर्गत निवडक चित्रपटांचा समावेश आहे, ज्यांचे येथे जागतिक, आंतरराष्ट्रीय, आशियाई किंवा भारतीय प्रीमियर होणार आहेत.
प्रमुख स्पर्धात्मक विभागांमध्ये भारतीय चित्रपटांचीही ठळक उपस्थिती आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात 'कांतारा: अ लेजेंड – चॅप्टर 1' (कन्नड), 'पारो – द अनटोल्ड स्टोरी ऑफ ब्राइड स्लेव्हरी' (हिंदी) आणि 'द केरला स्टोरी 2 गोज बियॉन्ड' (हिंदी) यांचा समावेश आहे. 'सर्वोत्कृष्ट पदार्पण फीचर फिल्म' श्रेणीमध्ये 'बर्ड्स ऑन आईस' (लडाखी) आणि 'स्लेज' (काश्मिरी) हे चित्रपट आहेत, तर 'कबीर सर का आखरी लेसन' (हिंदी), 'प्लेअर 5' (तमिळ) आणि 'सेव मिच्चर' (हिंदी) हे चित्रपट 'आयसीएफटी-युनेस्को गांधी मेडल'साठी स्पर्धा करत आहेत.
याव्यतिरिक्त, हा महोत्सव भारताच्या समृद्ध चित्रपट वारशाचा गौरव करतो. 'तूलाभारम', 'साधी माणसे', 'वक्त', 'काश्मीर की कली' आणि 'चौरंगी' यांसारख्या अभिजात चित्रपटांची शताब्दी साजरी केली जात आहे; 'भक्त कन्नप्पा' आणि 'कभी कभी' चित्रपटांना 50 वर्षे झाल्यानिमित्त स्मरण केले जात आहे. तसेच भारथिराजा, के. भाग्यराज आणि नाना पाटेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांना विशेष आदरांजली अर्पण केली जात आहे. त्याचबरोबर, 'क्रिएटीव्ह माईंड्स ऑफ टुमारो' (CMOT) च्या सहाव्या आवृत्तीद्वारे चित्रपट निर्मितीच्या 13 विविध क्षेत्रांतील 100b तरुण कलाकारांना सक्षम करण्याचे कामही हा महोत्सव करतो.

राष्ट्रीय कथाकथनाच्या या गौरवसोहळ्याला पूरक ठरणारा ‘मिशन लाइफ’ हा स्वतंत्र विभागही महोत्सवात आहे. या विभागात पर्यावरणीय बदल, मानव आणि मानवेतर सजीवांमधील संबंध तसेच शाश्वत जीवनशैलीचा नव्याने विचार करण्याची तातडीची गरज यांचा वेध घेणाऱ्या पाच आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे.
या निवडीत मारिया मोलिना पेइरो यांच्या ‘लाइक एनी अदर मॉर्टल’ (कोमो तोडो मॉर्ताल) या नेदरलँड्स आणि स्पेन यांच्या सहनिर्मितीतील चित्रपटाचा समावेश आहे. या चित्रपटाचा आशियातील पहिला प्रीमियर होणार आहे. माहितीपट, फ्लॅमेन्को आणि विज्ञानकथा यांची सांगड घालत हा चित्रपट अँडालुसियातील प्राचीन खाणकामामुळे निर्माण झालेल्या जखमा आणि मंगळ ग्रहावरील रोबोटिक संशोधन यांच्यातील साम्य उलगडतो.
इक्वेडोर, चिली आणि जर्मनी यांच्या सहनिर्मितीतून साकारलेल्या वेरेनिस बेनितेझ यांच्या ‘नुंकुई’ या चित्रपटाचा आशियातील पहिला प्रीमियर होणार आहे. ॲमेझॉन खोऱ्यातील शुआर समुदायातील एका तरुण मुलीची ही कथा आहे. खाणकाम करणाऱ्या कंपन्या तिच्या मातृभूमीत प्रवेश करत असताना, ती आपल्या पूर्वजांची गीते, वनदेवता आणि निसर्गाशी असलेल्या नात्यातून शक्ती मिळवते.
नेदरलँड्स आणि इंडोनेशिया यांच्या सहनिर्मितीतून साकारलेल्या सबिन ग्रोनेवेगेन यांच्या ‘द क्लिअरिंग’ या चित्रपटाचा भारतात पहिल्यांदाच प्रीमियर होणार आहे. संग्रहित आणि समकालीन दृश्यफितींच्या एकत्रित वापरातून हा चित्रपट सुमात्रातील वर्षावनांचे वसाहतवादी काळात रबराच्या मळ्यांमध्ये झालेल्या रूपांतराचा वेध घेतो. तसेच शोषण आणि प्रतिकार यांचा आजही कायम असलेला वारसाही अधोरेखित करतो.

‘मिशन लाइफ’ विभागातील आणखी एक महत्त्वपूर्ण चित्रपट म्हणजे लिओनार्डो पिरोंडी यांचा पोर्तुगाल आणि ब्राझील यांच्या सहनिर्मितीतून साकारलेला प्रायोगिक विज्ञानपट ‘ट्रॉपिकल फ्रॅक्टल्स’ (फ्रॅक्टाइस ट्रॉपिकाइस). या चित्रपटाचा भारतात पहिल्यांदाच प्रीमियर होणार आहे. उद्ध्वस्त झालेल्या आणि पुन्हा सावरण्यास सुरुवात केलेल्या पृथ्वीवर एकाकी भटकंती करणाऱ्या व्यक्तीच्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर, अवकाशातून प्रवास करणारे शास्त्रज्ञ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली पृथ्वीवरील अखेरच्या उरलेल्या खुणांचा अभ्यास करत असल्याचे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
या विभागातील अखेरचा चित्रपट म्हणजे ख्यातनाम कंबोडियन-फ्रेंच चित्रपट निर्माते रिथी पान यांचा ‘वी आर द फ्रूट्स ऑफ द फॉरेस्ट’ (नू सोम ले फ्रुई द ला फोरे) हा माहितीपट. या चित्रपटाचा भारतात पहिल्यांदाच प्रीमियर होणार आहे. कंबोडियाच्या दुर्गम पर्वतीय भागातील मूळनिवासी बनोंग समुदायाचे जीवन या चित्रपटात जवळून चित्रित करण्यात आले आहे. कॉर्पोरेट कंपन्यांचा हस्तक्षेप आणि हवामान बदलामुळे शेतीवर होणारे परिणाम यांचा सामना करत हा समुदाय आपल्या पूर्वजांच्या परंपरा आणि सुपीक जमिनीचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
57 वा इफ्फी भारताच्या कालातीत कथाकथन परंपरांना पर्यावरण संवर्धनाविषयीच्या तातडीच्या जागतिक चर्चांशी जोडतो. सीमांच्या पलीकडे विविध संस्कृतींना एकत्र आणण्याची ताकद चित्रपटांमध्ये आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती या महोत्सवातून येते.
* * *
पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/सुषमा काणे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे