57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

57व्या इफ्फी 2026 मध्ये ॲनिमेशन चित्रपटांचा नवा विभाग; ॲनिमेटेड कथाकथनातील भावविश्व आणि सर्जनशीलतेचा गौरव


जपान, फ्रान्स, चीन, सिंगापूर आणि अमेरिकेतील पाच गाजलेल्या आंतरराष्ट्रीय ॲनिमेटेड चित्रपटांमधून मानवी अनुभवांचे वैविध्यपूर्ण चित्रण

Posted On: 18 NOV 2026 1:09PMby PIB MumbaiRelease ID: 2337909Views: 5

गोवा, 18 नोव्‍हेंबर 2026

 

प्रत्येक संस्कृतीत आणि प्रत्येक वयोगटात ॲनिमेशनमध्ये साध्या चित्रांना मनाला भिडणाऱ्या कथांमध्ये रूपांतरित करण्याची एक विलक्षण क्षमता असते. चित्रपटविश्वाच्या क्षितिजाचा विस्तार करत 57वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 2026 मध्ये ॲनिमेटेड कथाकथनातील कलात्मकता आणि भावनिक खोलीचा गौरव करण्यासाठी स्वतंत्र ॲनिमेशन विभाग सुरू करण्यात आला आहे. जपान, फ्रान्स, चीन, सिंगापूर आणि अमेरिकेतील पाच उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय ॲनिमेटेड चित्रपटांचा समावेश असलेला हा विभाग प्रेक्षकांच्या डोळ्यांना सुखावण्यासोबतच त्यांच्या मनालाही स्पर्श करणाऱ्या चित्रपटांवर प्रकाश टाकतो.

आधुनिक प्रेमसंबंध आणि सामाजिक अस्वस्थतेचे हळुवार चित्रण करणारा जपानी ॲनिमेटेड चित्रपट ‘चेरी अँड व्हर्जिन’ या विभागाची सुरुवात करतो. मसानाओ कावाजिरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 2026 मधील या ॲनिमेटेड चित्रपटात र्यो या 32 वर्षीय कामुक मंगा चित्रकाराची कथा आहे. त्याला महिलांशी संवाद साधणे कठीण जाते. 28 वर्षीय आमी हिलाही प्रत्यक्ष आयुष्यात पुरुषांशी संवाद साधताना तितकीच अडचण येते. स्वतःच्या भीती आणि प्रेमसंबंधांचा अनुभव नसतानाही हे दोघे भेटतात आणि हळूहळू एकमेकांना समजून घेऊ लागतात. स्वतःच्या मनातील असुरक्षिततेवर मात करत ते एका खऱ्या नात्यातील शांत आनंदाचा शोध घेतात.

प्रत्यक्ष चित्रीकरण आणि मंगा ॲनिमेशन यांची सांगड घालून हा चित्रपट अत्यंत सहजसुंदर उबदारपणा आणि विनोदाच्या माध्यमातून कथा सादर करतो. ओसाका कला विद्यापीठाचे पदवीधर असलेल्या कावाजिरी यांना 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अ जपनीज बॉय हू ड्रॉज’ या ॲनिमेटेड लघुपटासाठी विविध चित्रपट महोत्सवांमध्ये व्यापक प्रशंसा मिळाली होती. या चित्रपटातून त्यांनी विकसित केलेली संमिश्र दृश्यशैली आजही जपानमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवत आहे.

समकालीन सामाजिक विसंगतींवर तीक्ष्ण विनोद आणि भावनिक स्पर्शातून भाष्य करणारा फ्रेंच ॲनिमेटेड चित्रपट ‘जिम क्वीन’ या विभागातील आणखी एक आकर्षण आहे. निकोलस अताने आणि मार्को गुयेन यांनी या चित्रपटाचे सहदिग्दर्शन केले आहे. पॅरिसच्या पार्श्वभूमीवर आधारित 2026 मधील या चित्रपटाची कथा जिम या लोकप्रिय फिटनेस इन्फ्लुएन्सरभोवती फिरते. शहरातील समलिंगी समुदायात त्याला मोठी लोकप्रियता असते. मात्र, ‘हेटेरोसिस’ नावाचा एक रहस्यमय विषाणू समलिंगी पुरुषांना विषमलिंगी बनवू लागतो आणि एका रात्रीत जिमचे जग उद्ध्वस्त होते. त्याचे अनुयायी, मित्र आणि सामाजिक प्रतिष्ठा त्याच्यापासून दूर जातात. अशा परिस्थितीत ल्युसीएन हा एकनिष्ठ, मात्र तुलनेने कमी लोकप्रिय तरुण त्याच्या पाठीशी उभा राहतो. उपचार शोधण्यासाठी जिम पॅरिसमधील गजबजलेल्या मारे परिसरातून अशा डॉक्टरच्या शोधात निघतो, ज्याच्याकडे या विषाणूवरील उपचार असल्याची चर्चा असते. या दोन्ही दिग्दर्शकांनी ॲनिमेशन क्षेत्रातील नामांकित गोबेलिन्स संस्थेत प्रशिक्षण घेतले आहे. अताने यांनी यापूर्वी ‘रेमन’ या व्हिडिओ गेम मालिकेवर, ‘द रॅबाईज कॅट’ आणि ‘द रेड टर्टल’ या चित्रपटांवर काम केले आहे. ‘मिस्टर फ्लॅप’, ‘स्टार्टअप हिरोज’ आणि ‘पीपुडू’ या ॲनिमेटेड मालिकांचेही त्यांनी सहदिग्दर्शन केले आहे. तर गुयेन यांनी ‘द रॅबाईज कॅट’, ‘अर्नेस्ट अँड सेलेस्टीन’ आणि ‘द समिट ऑफ द गॉड्स’ या चित्रपटांमधील योगदानातून आपली समृद्ध दृश्यात्मक प्रतिभा सिद्ध केली आहे.

वेगाने बदलणाऱ्या जगात एकांत, उत्कट इच्छा आणि आसक्तीचा शोध घेणारा 'लाइट पिलर' हा एक चीनी ॲनिमेटेड चित्रपट आहे, जो लेखक, दिग्दर्शक आणि प्रोडक्शन डिझायनर शू झाओ यांचा 2026 मधील पहिला ॲनिमेटेड चित्रपट आहे. भविष्यात जिथे अंतराळ प्रवास ही एक सामान्य गोष्ट आहे, तिथे घडणाऱ्या या चित्रपटात झा नावाचा एक सफाई कर्मचारी आहे, जो एका दिवाळखोरीत गेलेल्या फिल्म स्टुडिओच्या आवाराची देखभाल करतो. तो  एका समृद्ध आभासी जगात राहणाऱ्या एका महिलेच्या प्रेमात पडतो. तिच्यासोबत चंद्रावर जाण्यासाठी तिकीट काढण्यासाठी अतिरिक्त तास काम करतो. मात्र नंतर झा याच्या लक्षात येते की त्याचे तिकीट अवैध आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्ससाठी जुना स्टुडिओ पाडण्याकरिता जेव्हा चित्रपटाचे कर्मचारी तिथे येतात, तेव्हा झा तिथेच रराहण्याचा भावुक निर्णय घेतो, तो  त्या जगासोबतच नाहीसा होण्याचा निर्णय घेतो, ज्याला तो आतापर्यन्त एकमात्र जग मानत होता. 1991  मध्ये चीनमधील अनशान येथे जन्मलेल्या शू झाओ यांनी बीजिंग फिल्म अकादमीमधून पदव्युत्तर पदवी मिळवली आहे आणि यापूर्वी IFFR मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या 'नो चेंजेस हॅव टेकन इन अवर लाईफ' या ॲनिमेटेड लघुपटासाठी त्यांचे खूप कौतुक झाले आहे.

सिंगापूरहून आलेला सन शुन दिग्दर्शित 'मॅजिक अॅटलास' हा चिनी भाषेतील ॲनिमेटेड चित्रपट आहे, जो स्मृती आणि प्रतिकारावर आधारित 2026 मधील एक मार्मिक कथा  आहे. जेव्हा एक रहस्यमय जादूगार लुओचा नावाच्या एकाकी कोळसा साम्राज्यात येतो, तेव्हा त्याचे अस्तित्व आधीच तणावपूर्ण असलेल्या समाजात भीती आणि अशांतता पसरवते.  शियाओ झी नावाच्या एका अनाथ मुलासोबत अटक होऊन तुरुंगात टाकल्यावर, तो जादूगार  मिमेंग उत्सवादरम्यान त्याला खांबावर जाळण्यापूर्वी गुपचूप त्या मुलाकडे एक जादुई नकाशा सोपवतो . मिमेंग हा एक शासकीय विधी आहे, ज्यामध्ये नागरिकांना त्यांचा भूतकाळ विसरायला लावला जातो. 1980  मध्ये चीनच्या फुक्सिन येथे जन्मलेले सन शुन हे बीजिंग स्थित कलाकार आणि चीन ललित कला अकादमीचे  पदवीधर आहेत, ज्यांनी 2005 मध्ये π ॲनिमेशन स्टुडिओची स्थापना केली. व्हेनिस आणि बर्लिन येथे प्रदर्शित झालेल्या त्यांच्या कलाकृतींनंतर, 'मॅजिक अॅटलास' लोकार्नो आणि टोकियो चित्रपट महोत्सवांमध्ये स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर इफ्फीमध्ये दाखल झाला आहे.

या विभागाचा शेवट 'रे गन' या इंग्रजी भाषेतील अमेरिकन ॲनिमेटेड चित्रपटाने होतो, ज्याचे दिग्दर्शन 2026 मध्ये अकादमी पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते ब्रॅड बर्ड यांनी केले आहे. मेट्रोपिया नावाच्या भविष्यकालीन महानगरावर आधारित आहे,  जिथे उडणाऱ्या गाड्यांनी भरलेल्या आकाशाखाली मानव आणि परग्रही एकत्र राहतात आणि प्रत्येक गोष्टीची एक किंमत चुकवावी लागते. तिथे चकचकीत दर्शनी भागामागे मोठा भ्रष्टाचार दडलेला आहे. या पार्श्वभूमीवर, रे गन नावाचा एक जुन्या विचारांचा खाजगी गुप्तहेर, जो त्याच्या व्यवसायाला कालबाह्य मानणाऱ्या जगात आपली मूल्ये जपण्यासाठी संघर्ष करत आहे,  तो अचानक  त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या केसमध्ये अडकला जातो.   लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि आवाज कलाकार म्हणून जगभरात नावाजलेले बर्ड, भावना, विनोद आणि ॲक्शन यांची सहजतेने गुंफण करणारे म्हणून ओळखले जातात. 'द इनक्रेडिबल्स', 'रॅटाटुई' आणि 'मिशन: इम्पॉसिबल – घोस्ट प्रोटोकॉल' यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांमधील आपली खास कथाकथनाची शैली ते या रेट्रो-फ्युचरिस्टिक ॲनिमेटेड नॉयरमध्ये आणतात.

या नवीन विभागाद्वारे,  57 वा 'भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव  (IFFI)2026 , चित्रपट रसिकांना केवळ एक 'माध्यम' म्हणून न पाहता, ॲनिमेशनला आपल्या आशा-आकांक्षा, उणिवा  आणि सामायिक मानवतेचे एक जिवंत प्रतिबिंब म्हणून अनुभवण्यासाठी आमंत्रित करतो.

 

इफ्फी बद्दल

1952 मध्ये सुरू झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' (IFFI) हा आशियातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे, गोवा सरकार आणि 'एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा' यांच्या सहकार्याने आयोजित केला जाणारा हा महोत्सव, जागतिक स्तरावरील सर्वोत्तम चित्रपटांचा उत्सव साजरा करतो आणि त्याच वेळी भारतीय चित्रपट व प्रतिभेला जागतिक व्यासपीठावर प्रोत्साहन देतो. दरवर्षी गोव्यात आयोजित होणारा हा महोत्सव सर्जनशील देवाणघेवाण, नवीन कलाकारांचा शोध आणि चित्रपटांच्या माध्यमातून सांस्कृतिक समज वाढवण्याचे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरतो.

 

* * *

पीआयबी मुंबई | नितीन फुल्लुके/गजेंद्र देवडा/सुषमा काणे/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2337909
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026