57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

इफ्फी 2026 मध्ये कन्नड आणि तुळू चित्रपटांचा जल्लोष


गिरीश कासरवल्ली यांच्या 50 वर्षांच्या चित्रपट प्रवासावर प्रकाशझोत

Posted On: 17 NOV 2026 2:45PMby PIB MumbaiRelease ID: 2337727Views: 15

गोवा, 17 नोव्‍हेंबर 2026

 

गिरीश कासरवल्ली यांच्या सामाजिक जाणीव असलेल्या समांतर चित्रपटांपासून ते समकालीन कौटुंबिक नाटके, लोककथांवर आधारित महाकाव्ये आणि माहितीपट शैलीतील कथाकथनापर्यंत - 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) गोव्यात कन्नड आणि तुळू चित्रपटसृष्टीतील समृद्धता आणि विविधता सर्वांसमोर आणत आहे.

कन्नड चित्रपट:

ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनीत 'कांतारा: अ लिजंड  - चॅप्टर 1' ची कथा  कदंब  काळातील पार्श्वभूमीवर आधारित आहे. बरमे नावाचा जंगलात राहणारा एक तरुण, शेजारच्या  'बांगरा' राज्यामध्ये प्रवेश करतो आणि तिथे राज्यकर्त्यांकडून वनवासी समुदायांवर होणारा अन्याय व अत्याचार पाहतो. जेव्हा राजकुमार कुलशेखरा आदिवासींवर हल्ला करून अनेकांची हत्या करतो, तेव्हा बरमे न्याय आणि धर्मासाठी चाललेल्या त्यांच्या लढ्यात सामील होतो. ही कथा लोककथा, श्रद्धा आणि वनवासी समुदायांच्या संरक्षणासाठी दिलेल्या संघर्षाला एकत्र गुंफते. हा चित्रपट 'इंडियन पॅनोरमा'च्या मुख्य प्रवाहातील चित्रपट विभागात आणि 'आंतरराष्ट्रीय स्पर्धा' या दोन्ही विभागात निवडला गेला आहे.

पी. शेषाद्री दिग्दर्शित 'रुबी-क्यूब' (Ruby-Cube) हा चित्रपट एका कुटुंबाच्या तीन पिढ्यांची कथा आहे, जे एकत्र सुट्टी घालवण्यासाठी एका हिल स्टेशनवर जातात. मानसशास्त्रज्ञ रोहिणी हिची भेट तिची मुलगी चित्राच्या माध्यमातून तिचा पती मूर्ती याच्याशी होते, ज्याच्यापासून ती वेगळी झाली होती.  चित्राच्या वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी असतात. जसजसे ते  एकत्र वेळ घालवतात, जुने तणाव आणि मनात दडलेल्या भावना पुन्हा उफाळून  येतात. इथे 'रुबिक्स क्यूब' नातेसंबंधांमधील गुंतागुंतीचे प्रतीक ठरते, जे दर्शवते की संयम आणि समजूतदारपणा लोकांना कठीण प्रसंगांतून पुढे जाण्याचा मार्ग दाखवू शकतात.

डॉ. प्रदीप केनचनुरू (डॉ. प्रदीप कुमार शेट्टी के.) दिग्दर्शित 'द हग ऑफ एम्प्टिनेस' चंद्रशेखरची कथा सांगतो. 2003 मध्ये कर्ज न फेडल्यामुळे सुलिया को-ऑपरेटिव्ह बँकेने त्याची मालमत्ता जप्त केली होती. ही कारवाई अन्यायकारक असल्याचे मानून, त्याने कायदेशीर लढा सुरू केला, जो दोन दशकांहून अधिक काळ चालला. हक्काचे घर नसल्यामुळे, तो न्यायाच्या शोधात असताना आपल्या कारमध्येच राहतो. हा माहितीपट त्याच्या प्रदीर्घ संघर्षाचे, एकाकीपणाचे आणि अनिश्चित भविष्य असतानाही  त्याने दाखवलेल्या दृढनिश्चयाचे चित्रण आहे.

उलिदिद्दू संपिगे मात्र (फक्त फूल उरले) हा अभिषेक दिग्दर्शित लघुपट आहे. या चित्रपटात मंजण्णा नावाच्या व्यक्तीची कथा सांगितली आहे. आपल्या प्रिय स्त्रीला गमावल्यानंतर तिच्या आठवणींसोबत तो एकटाच जीवन जगत असतो. एके दिवशी त्या स्त्रीचा फोटो खराब होतो. त्यामुळे तो एका चित्रकाराकडे जाऊन, आपल्या आठवणींवरून तिचे चित्र पुन्हा रेखाटण्याची विनंती करतो. चित्र मिळाल्यानंतर मंजण्णाची एका अनोळखी व्यक्तीशी भेट होते. या अनपेक्षित भेटीमुळे भूतकाळाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलतो आणि तो अशा एका शेवटाकडे प्रवास करतो, ज्याची त्याने कल्पनाही केलेली नसते. या लघुपटातून एखाद्या व्यक्तीला गमावल्याचे दुःख, तिच्या आठवणी आणि मनात होणारे भावनिक बदल यांचे चित्रण करण्यात आले आहे.

तुळू चित्रपट 

अनुपमा शरधी दिग्दर्शित पिली चन्ने हा चित्रपट एका आदिवासी महिलेची कथा सांगतो. ही महिला आपल्या आजीकडून पारंपरिक वनौषधी उपचारपद्धती शिकते. मृत्यूपूर्वी तिची आजी तिला एक पवित्र दगड देते. या दगडामध्ये जंगलातील औषधी वनस्पती आणि त्यांच्या उपचारपद्धतींचे ज्ञान सामावलेले असल्याचे मानले जाते. पिली चन्ने आपल्या या ज्ञानाचा उपयोग समाजातील लोकांना मदत करण्यासाठी करते. त्यामुळे ती गावकऱ्यांचा विश्वास संपादन करते. मात्र, गावातील एक लोभी डॉक्टर आणि गावप्रमुख हा दगड स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात. पण पिली चन्ने त्यांना तो दगड देण्यास नकार देते. या चित्रपटातून पारंपरिक ज्ञानाचे महत्त्व, धैर्य आणि पूर्वजांकडून मिळालेल्या ज्ञानाचे जतन करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. पिली चन्ने या चित्रपटाचा 2026 च्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात - इफ्फीत प्रथमच जागतिक प्रीमियर होणार आहे.

गिरीश कासरवल्ली यांच्या कारकिर्दीवरील विशेष चर्चासत्र:

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात- ईफ्फी 2026 मध्ये 21 नोव्हेंबर रोजी समांतर चित्रपटसृष्टीचे नैतिक विश्व : गिरीश कासरवल्ली यांच्या चित्रपट कारकिर्दीची 50 वर्ष या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. नमन रामचंद्रन या चर्चासत्राचे सूत्रसंचालन करतील. कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश कासरवल्ली यांच्या पाच दशकांच्या चित्रपट कारकिर्दीचा आढावा या चर्चासत्रात  घेतला जाणार आहे.

घटश्राद्ध या त्यांच्या पहिल्या चित्रपटापासून तबरन कथे, थायी साहेबा आणि ‘द्वीपा’ यांसारख्या चित्रपटांपर्यंत त्यांच्या कलाकृतींमधून सामाजिक अन्याय, नैतिक पेचप्रसंग आणि समाजातील वंचित घटकांचे जीवन मांडण्यात आले आहे. कथाकथनाची त्यांची शैली तसेच चित्रपटातील सामाजिक जाणीव या विषयांवर या चर्चासत्रात विचारमंथन केले जाणार आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | माधुरी पांगे/सुषमा काणे/राज दळेकर/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2337727
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026