कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डॉ. पी. के. मिश्रा यांनी पीपीव्हीएफआरएच्या (PPVFRA) 22 व्या स्थापना दिनानिमित्त 'प्लांट जिनोम सेव्हियर' पुरस्कार सोहळ्याला केले संबोधित

Posted On: 12 NOV 2026 4:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 नोव्‍हेंबर 2026

 

देशाच्या कृषी जैवविविधतेचे संरक्षक आणि नवोन्मेषक म्हणून शेतकऱ्यांचा गौरव करण्याची तसेच त्यांचे पारंपरिक ज्ञान वैज्ञानिक संशोधन, बियाणे प्रणाली आणि बाजारपेठेतील संधींशी जोडण्याची गरज पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी आज व्यक्त केली. वनस्पती वाण संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाच्या (PPVFRA) 22 व्या स्थापना दिनानिमित्त आणि 'प्लांट जिनोम सेव्हियर' पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या निमित्ताने 'वनस्पती वाण संरक्षण आणि शेतकरी हक्क कायदा, 2001' ला 25 वर्षे पूर्ण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पारंपरिक ज्ञान, अन्नसंस्कृती आणि स्थानिक समुदायांची उपजीविका जपतानाच हवामान बदल, पाण्याची टंचाई, कीड आणि रोगांचा सामना करू शकणारी सक्षम पिके विकसित करण्यासाठी भारताची समृद्ध कृषी जैवविविधता अत्यंत महत्त्वाची असल्याचं मिश्रा यावेळी म्हणाले. त्यांनी भारतातील 22 कृषी-जैवविविधता समृद्ध क्षेत्रांचा आवर्जून उल्लेख केला आणि समुदाय-प्रणीत संवर्धनाचे उत्तम उदाहरण म्हणून ओडिशातील कोरापुटचा दाखला दिला, ज्याला अन्न आणि कृषी संघटनेने 2012 मध्ये 'जागतिक महत्त्वाची कृषी वारसा प्रणाली' म्हणून मान्यता दिली आहे.

अन्न आणि कृषीसाठी वनस्पती जनुकीय संसाधनांवरील आंतरराष्ट्रीय करार (ITPGRFA), नवी दिल्ली येथे 2022 मध्ये झालेले नियामक मंडळाचे अधिवेशन आणि 2023 मधील 'शेतकरी हक्कांवरील जागतिक परिसंवाद' यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये भारताने दिलेल्या योगदानाचा डॉ. मिश्रा यांनी उल्लेख केला. ब्रिक्स (BRICS) देशांच्या कृषी मंत्र्यांनी स्वीकारलेला 'इंदूर जाहीरनामा' आणि बियाणे प्रणालीतील शेतकरी हक्कांसाठी स्थापन करण्यात आलेल्या 'जागतिक मंचाचा'ही त्यांनी विशेष उल्लेख केला.

केवळ सन्मानापुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाकडे वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी केले. सामुदायिक बियाणे बँका आणि क्षेत्रीय जनुकीय बँका (फिल्ड जीन बँका) बळकट करणे, पारंपरिक ज्ञानाची आधुनिक वैज्ञानिक संशोधनाशी सांगड घालणे आणि शेतकऱ्यांनी विकसित केलेले वाण दर्जेदार बियाणे प्रणाली, शेतकरी उत्पादक संघटना तसेच व्यापक बाजारपेठांशी जोडण्यावर त्यांनी भर दिला. जैवविविधतेच्या संवर्धनातून शाश्वत आर्थिक संधी निर्माण व्हाव्यात यासाठी शेतकरी उद्योजकतेला चालना देण्याचे आणि लाभाचे न्याय्य व पारदर्शक वाटप सुनिश्चित करण्याचे आवाहनही डॉ. मिश्रा यांनी केले.

कृषी विविधतेचे रक्षण करणे ही शेतकरी, शास्त्रज्ञ, विद्यापीठे, उद्योग क्षेत्र, शासन आणि संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत, मिश्रा यांनी प्राधिकरणाचे आणि सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.

 

* * *

सुषमा काणे/वैभवी जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2335535) अभ्यागत कक्ष : 6