Posted On:
11 NOV 2026 9:56AM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारितील राष्ट्रीय आरोग्य सेवा आणि संलग्न सेवा क्षेत्र आयोगाने (NCAHP - National Commission for Allied and Healthcare Professions) देशातील आरोग्य सेवा आणि संलग्न सेवा क्षेत्रातील मनुष्यबळात अधिक बळकटी आणण्यासाठी एका व्यापक नियामक आराखड्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावात पात्र आरोग्य सेवा आणि संलग्न सेवा क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञांच्या तात्पुरत्या नोंदणीसह कौशल्य वृद्धी, क्षमतांचे मूल्यमापन आणि नियमित नोंदणीमध्ये रुपांतर करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. आयोगाचा हा प्रस्ताव देशातील आरोग्य सेवा आणि संलग्न सेवा क्षेत्रातील मनुष्यबळ अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
व्यावसायिक तज्ञांच्या नोंदणीमध्ये अधिक सुसूत्रता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणणे हा या प्रस्तावित आराखड्याचा मुख्य उद्देश आहे. यासोतच पात्र व्यावसायिक तज्ञांना निश्चित मानकांनुसार आपल्या पात्रतेत आणि क्षमतेत सुधारणा घडवून आणण्यासाठी नियोजनबद्ध संधी उपलब्ध करून देणे हा ही यामागचा उद्देश आहे.
यासाठी राष्ट्रीय आरोग्य सेवा आणि संलग्न सेवा क्षेत्र कायदा, 2021 (NCAHP Act, 2021) अंतर्गत तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेवा आणि संलग्न सेवा क्षेत्र व्यावसायिक नियमावली, 2026 च्या तात्पुरत्या नोंदणी मसुद्यावर राष्ट्रीय आरोग्य सेवा आणि संलग्न सेवा क्षेत्र आयोगाने नागरिक आणि संबंधित भागधारकांकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत.
व्यावसायिक तज्ञांची नोंदणी आणि कारकिर्दीला पुढची दिशा देण्यासाठीचा नियोजनबद्ध मार्गदर्शक आराखडा
राष्ट्रीय आरोग्य सेवा आणि संलग्न सेवा क्षेत्र कायदा, 2021 मधील तरतुदींनुसार पात्र आरोग्य सेवा आणि संलग्न सेवा क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञांच्या तात्पुरत्या नोंदणीसाठी एक पारदर्शक आणि मानक यंत्रणा स्थापन करणे हे या प्रस्तावित नियमावलीचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
हा आराखड्याच्या माध्यमातून पात्रतेचे निश्चित निकष, प्रमाणपत्रांची पडताळणी आणि सुस्पष्ट नोंदणी प्रक्रियेची आखणी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे व्यावसायिक तज्ञांना दिली जाणारी मान्यता ही वैधानिक तरतुदी आणि क्षमता विषयक मानकांना अनुसरून असेल याची सुनिश्चिती होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, या प्रस्तावित नियमावलीनुसार तात्पुरती नोंदणी झालेल्या पात्र व्यावसायिक तज्ञांना कौशल्यवृद्धीसाठी गरज असेल तर निश्चित केलेले ब्रिज कोर्सेस (Bridge Courses) अर्थात संलग्न अभ्यासक्रमांकरिता, देखरेखीखालील वैद्यकीय प्रशिक्षणाकरिता आणि नियमित नोंदणीसाठीच्या आवश्यकता पूर्ण करण्याकरिता किमान पात्रता परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे.
हा दृष्टिकोन क्षमतेवर आधारलेला असून, हा दृष्टीकोन सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, कारकिर्दीत प्रगती साधण्याला चालना देण्यासाठी आणि आरोग्य सेवा आणि संलग्न सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
व्यावसायिक मानके आणि आरोग्य विषयक सेवांच्या गुणवत्तेला बळकटी देणे
या प्रस्तावित आराखड्यात कौशल्य विकास, व्यावसायिक तज्ञतेच्या क्षमता आणि नियामक उत्तरदायित्वावर भर देण्यात आला आहे.
या नियमाअंतर्गत नियमित नोंदणीच्या प्रक्रियेला शैक्षणिक आणि क्षमता विषयक आवश्यकतांशी जोडले गेले आहे. त्यामुळेच या नियमावलीच्या माध्यमातून आरोग्य सेवा आणि संलग्न सेवा क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञांकडे गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य आणि वैद्यकीय क्षमता असतील याची सुनिश्चिती होणार आहे.
या उपक्रमामुळे अधिक कुशल, संघटित आणि व्यावसायिकदृष्ट्या जबाबदार असलेले मनुष्यबळ तयार होईल. यामुळे रुग्णांची सुरक्षा आणि आरोग्य सेवेचा दर्जा अधिक सुधारण्यातही मदत होणार आहे.
अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमतेसाठी डिजिटल नोंदणी
या मसुदा नियमावलीत अर्ज सादर करणे, प्रमाणपत्रांची पडताळणी, पात्रतेचे मूल्यमापन आणि तात्पुरती नोंदणी प्रमाणपत्रे जारी करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याकरता एकात्मिक ऑनलाइन नोंदणी प्रणालीची संकल्पना मांडली आहे.
तात्पुरती नोंदणी मिळणाऱ्या पात्र व्यावसायिक तज्ञांना तात्पुरत्या नोंदणीचा विशिष्ट ओळख क्रमांक (PR UID) दिला जाईल. यामुळे सुव्यवस्थितरित्या ओळख पडताळणी आणि नियामक देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.
नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ करणे, वापर सुलभतेत सुधारणा घडवून आणणे आणि सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये अधिक पारदर्शकता, कार्यक्षमता तसेच एकसमानता आणणे हा या डिजिटल प्रणालीमागचा उद्देश आहे.
प्रस्तावित नियमावलीची ठळक वैशिष्ट्ये:
तात्पुरत्या नोंदणीसाठीचे प्रमाणित पात्रता निकष आणि प्रक्रिया.
ऑनलाइन अर्ज, पडताळणी आणि विशिष्ट ओळख क्रमांकासह नोंदणी प्रमाणपत्रे जारी करणे.
तात्पुरत्या नोंदणीची वैधता, मुदतवाढ, समाप्ती आणि अपिलांशी संबंधित सुस्पष्ट तरतुदी.
कौशल्य वृद्धीसाठी निश्चित केलेले ब्रिज कोर्सेस, क्षमता मूल्यांकन आणि जिथे लागू असेल तिथे पात्रता परीक्षा.
व्यावसायिक कौशल्य विकासासाठी देखरेखीखालील क्लिनिकल प्रशिक्षण आणि संस्थात्मक आवश्यकतांच्या पूर्ततेसाठी सहकार्य.
निश्चित अटींची पूर्तता केल्यानंतर योग्य केंद्रीय किंवा राज्य निबंधकांत (Central or State Register) नियमित नोंदणीत रुपांतर.
एक भक्कम, पारदर्शक आणि क्षमतेवर आधारित नोंदणी प्रणाली स्थापन करणे हा या सर्व तरतुदींचा एकंदर उद्देश आहे. यामुळे आरोग्य सेवांमधील गुणवत्तेचा दर्जा राखला जाऊन व्यावसायिक तज्ञतेच्या विकासाला पाठबळ मिळू शकणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य सेवा आणि संलग्न सेवा क्षेत्र आयोगाने 4 डिसेंबर 2026 पर्यंत अभिप्राय मागवले
पारदर्शक आणि प्रातिनिधिक नियमनाचा भाग म्हणून राष्ट्रीय आरोग्य सेवा आणि संलग्न सेवा क्षेत्र आयोगाने आरोग्य सेवा आणि संलग्न सेवा क्षेत्रातील व्यावसायिक, व्यावसायिक संघटना, शैक्षणिक संस्था, राज्यांची आरोग्य सेवा आणि संलग्न सेवा क्षेत्र परिषद, आरोग्य सेवा विषयक संस्था, तज्ञ आणि सर्वसामान्य जनतेकडून अभिप्राय, सूचना आणि आक्षेप मागवले आहेत.
मसुदा नियमावली राष्ट्रीय आरोग्य सेवा आणि संलग्न सेवा क्षेत्र आयोगाच्या https://ncahp.abdm.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे:
सर्व भागधारक ncahp.regulations@ncahp.mohfw.gov.in या ईमेल आयडीवर 4 डिसेंबर 2026 पर्यंत आपले अभिप्राय पाठवू शकतात.
नियमावलीला अंतिम रूप देण्यापूर्वी प्राप्त झालेल्या सर्व सूचना विचारार्थ घेतल्या जातील.
हा प्रस्तावित उपक्रम देशाच्या बदलत्या आरोग्य विषयक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने व्यावसायिक तज्ञतेच्या प्रगतीला पाठबळ देणारा आणि देशातील आरोग्य सेवा आणि संलग्न सेवा क्षेत्रातील मनुष्यबळाला बळकटी देणारा ठरणार आहे.
***
Nitin Fulluke / Tushar Pawar / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai