युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘माय भारत’च्या वतीने 100 आठवड्यांच्या अमली पदार्थविरोधी अभियानाअंतर्गत देशभरात दीपोत्सव आणि नेबरहुड युथ पार्लमेंट्सचे आयोजन


8व्या आठवड्यातील उपक्रमांमध्ये 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 1.19 लाखांपेक्षा जास्त युवा प्रतिनिधी आणि नागरिकांचा सहभाग

Posted On: 10 NOV 2026 12:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 नोव्‍हेंबर 2026

 

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारितील मेरा युवा भारत अर्थात माय भारत या संघटनेच्या वतीने देशभरात विकसित भारतासाठी नशामुक्त युवा हे 100 आठवड्यांचे संकल्प अभियान सुरु आहे. या अभियानाच्या 8व्या आठवड्या दरम्यान 6 आणि 7 नोव्हेंबर 2026 रोजी देशभरात ‘नशामुक्त युवा पर परिचर्चा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नशामुक्त युवा दीपोत्सव - एक दिवा संकल्पाचा आणि नेबरहुड युथ पार्लमेंट्स उपक्रमाअंतर्गत हे आयोजन करण्यात आले. या दोन उपक्रमांच्या माध्यमातून दिवाळीच्या उत्सवाला अमली पदार्थांच्या सेवनावर तळागाळापर्यंत चर्चा घडवून आणण्याच्या उद्देशाची जोड दिली गेली. देशभरातील 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 1.19 लाखांपेक्षा जास्त युवा प्रतिनिधी आणि नागरिक एकत्र आले. या उपक्रमातील सहभागिंनी नशामुक्त भारतासाठी प्रतिज्ञाही घेतली.

नशामुक्त युवा दीपोत्सव - एक दिवा संकल्पाचा या उपक्रमांतर्गत 435 कार्यक्रम आणि 568 उपक्रम आयोजित करण्यात आले. या उपक्रमांमध्ये 1,10,101 लोकांनी सहभाग नोंदवला. याअंतर्गत रांगोळी काढणे, दीप प्रज्वलित करणे, मिठाई वाटप, जनजागृती कार्यक्रम आणि माय भारत स्वयंसेवकांचा सत्कार अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ब्रह्मा कुमारीज, एज्युकेशन प्रमोशन सोसायटी फॉर इंडिया (EPSI) आणि हार्टफुलनेस या भागीदार संस्थांनीही या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.

या उपक्रमांअंतर्गत माय भारत संघटनेच्या स्वयंसेवकांनी उत्तर प्रदेशात लखनऊमध्ये दीपोत्सव साजरा केला, बांदा इथल्या वृद्धाश्रमात मिठाई आणि फळांचे वाटप केले, तसेच रामपूरमध्ये जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन केले. छत्तीसगडमधील मुंगेली आणि धमतरी इथेही दीपोत्सव आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. हिमाचल प्रदेशातील कांगडा इथल्या वृद्धाश्रमातही दीपोत्सव साजरा करून वृद्धांना मिठाईचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्रातील यवतमाळ, पुडुचेरीतील यानम आणि जम्मू-काश्मीरमध्येही अशाच स्वरूपाचे उपक्रम पार पडले.

विभागीय स्तरावर (Block level) नेबरहुड युथ पार्लमेंट्सच्या माध्यमातून नशामुक्त युवा पर परिचर्चा या उपक्रमांतर्गत 85 कार्यक्रम आणि 298 उपक्रमांचे आयोजन केले गेले. या आयोजनांमध्ये 9,526 नागरिकांनी सहभाग घेतला. या चर्चांमध्ये अमली पदार्थांचे सेवन, त्यामागील आव्हाने आणि नशामुक्त समाज घडवण्यात तरुणांची भूमिका या विषयांवर भर देण्यात आला होता.

नेबरहुड युथ पार्लमेंटच्या माध्यमातून चार सत्रांच्या आखणीच्या स्वरुपात चर्चांविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक विभागातून किमान 80 युवा प्रतिनिधींना जोडून घेणे हे या आयोजनांमागचे उद्दिष्ट होते. या सत्रांमध्ये माय भारत पोर्टलची ओळख, अमली पदार्थांच्या सेवनाची सद्यस्थिती : भारताच्या युवा वर्गासमोरील आव्हाने (Understanding Substance Abuse: Challenges before India’s Youth), जागरुकतेकडून कृतीकडे: नशामुक्त युवासाठीची साधने (From Awareness to Action: Tools for a Nasha Mukt Yuva), आणि गाथा परिवर्तनाच्या : प्रवास नशामुक्त भारताच्या दिशेचा (‘Stories of Change: The Journey Towards a Nasha Mukt Bharat) या विषयावरील दृक श्राव्य स्वरुपातील सादरीकरणाचा समावेश होता.

या उपक्रमांमध्ये घोषवाक्य लेखन, रांगोळी निर्मिती, पथनाट्ये, थेट संवादात्मक सत्रे आणि नशामुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचाही समावेश होता. हरयाणातील फतेहाबाद जिल्ह्यातील भुना, महाराष्ट्रातील लातूर, पूर्व दिल्ली आणि छत्तीसगडमधील डोंगरगड विभागांमध्येही अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यात आले. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा हे 100 आठवड्यांचे संकल्प अभियान नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी युवकांचा शाश्वत सहभाग आणि समुदाय आधारित कृतीला प्रोत्साहन देण्यातकरताचे देशातले एक महत्वाचे व्यासपीठ ठरू लागले आहे.

 

* * *

नितीन फुल्लुके/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2334629) अभ्यागत कक्ष : 12