Posted On:
03 NOV 2026 9:54AM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने देशात औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि सौंदर्यप्रसाधनांच्या आयातीसाठी अधिकृत प्रवेश केंद्रांच्या जाळ्याचा विस्तार करण्यासाठी औषधे नियम, 1945च्या नियम 43A मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. आयात प्रक्रिया सुलभ करणे, लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारणे आणि आरोग्य सेवा उत्पादनांसाठी पुरवठा साखळी मजबूत करणे, हे प्रस्तावित दुरुस्तीचे उद्दिष्ट आहे.
औषधे नियम, 1945 च्या नियम 43 ए मध्ये अधिकृत बंदरे, विमानतळे, रेल्वे स्थानके, रस्ते ओलांडण्याची ठिकाणे आणि इतर प्रवेशद्वारांची माहिती दिली आहे. याद्वारे भारतात औषधांची आयात करता येते. व्यापार सुलभ करण्यासाठी आणि आयात-संबंधित प्रक्रियांची कार्यक्षमता सुधारण्याच्या उद्देशाने, मंत्रालयाने अधिकृत ठिकाणांच्या यादीमध्ये अतिरिक्त अंतर्देशीय कंटेनर डेपो (आयसीडी), एक विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) आणि एक आंतरराष्ट्रीय विमानतळ समाविष्ट करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
प्रस्तावित अतिरिक्त ठिकाणांमध्ये हरियाणातील आयसीडी सोनीपत, पियाला आणि हरसरू, उत्तर प्रदेशातील आयसीडी दादरी, गुजरातमधील आयसीडी गांधीधाम/मुंद्रा, हैदराबाद, तेलंगणा मधील आयसीडी सनथ नगर आणि थिम्मापूर, कर्नाटक मधील बेंगळुरू येथे आयसीडी व्हाइटफील्ड, कर्नाटकातील एसईझेड बोम्मासंद्रा, आणि हवाई मार्गाने औषधांच्या आयातीसाठी उत्तर प्रदेशातील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, याचा समावेश आहे.
ही ठिकाणे अधिकृत आयात प्रवेशद्वारांच्या सध्याच्या नेटवर्कशी जोडली जातील. यामध्ये मध्य प्रदेशातील इन्दूर मधील धन्नाड आणि तिही येथील आयसीडी तसेच औषधांच्या आयातीसाठी आधीच अधिसूचित केलेल्या विमानतळांचा समावेश आहे.
प्रस्तावित विस्तारामुळे आयातदारांना त्यांच्या उत्पादन सुविधा, गोदामे आणि वितरण केंद्रांच्या जवळच्या ठिकाणी मालाची वाहतूक करायला सहाय्य होईल अशी अपेक्षा आहे. यामुळे देशांतर्गत वाहतुकीचे अंतर कमी होईल, लॉजिस्टिक खर्च कमी होईल आणि आयात मालाच्या वाहतुकीतला विलंब कमी होईल. या उपायांमुळे देशाच्या विविध भागांमध्ये औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि सौंदर्यप्रसाधनांची अधिक कार्यक्षम वाहतूक सुलभ होईल, तसेच आयातदारांसाठी परिचालन सुविधा सुधारतील अशी अपेक्षा आहे.
या प्रस्तावित सुधारणेद्वारे, आरोग्यसेवा उत्पादनांच्या आयातीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा बळकट करण्याचा, व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देण्याचा आणि अधिक कार्यक्षम आणि प्रतिसादक्षम पुरवठा साखळी निर्माण करण्यात योगदान देण्याचा मंत्रालयाचा प्रयत्न असून, याद्वारे आरोग्यसेवा उत्पादने वेळेवर उपलब्ध होण्यात सहाय्य होईल.
प्रस्तावित दुरुस्तीवरील हरकती आणि सूचना अवर सचिव (औषध नियमन), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, U-6, वर्क हॉल, सी विंग, पहिला मजला, कर्तव्य भवन-1, नवी दिल्ली - 110001 येथे किंवा drugsdiv-mohfwt[at]gov[dot]in या ईमेल वर पाठवता येतील.
औषधे नियम, 1945 मधील प्रस्तावित सुधारणा समाविष्ट करणारी मसुदा अधिसूचना, अधिकृत राजपत्रात पुढील लिंकवर पाहता येईल:
https://egazette.gov.in/(S(s2ixpktncwy30a02dofwfeqh))/ViewPDF.aspx
***
NitinFulluke / RajashreeAgashe / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai