Posted On:
02 NOV 2026 7:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2026
सुदृढ आणि चैतन्यमय लोकशाहीमध्ये सहमती आणि असहमती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे सांगत, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी, सर्व खासदारांना मतभेदांचे स्वागत केले पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे, असे आवाहन केले. नवीन दृष्टिकोन समोर आणण्यासाठी, प्रशासनातील त्रुटी दूर करण्यासाठी आणि अधिक चांगले प्रशासन निर्माण करण्यासाठी मतभेद महत्त्वाची भूमिका बजावतात, असेही त्यांनी नमूद केले. राजकीय, पक्षीय किंवा वैचारिक मतभेद काहीही असले, तरी सर्व लोकप्रतिनिधींची बांधिलकी, राज्य आणि राष्ट्राच्या निरंतर प्रगतीप्रति असली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंचकुला इथे हरियाणा विधानसभेच्या संविधान पंधरवडा कार्यक्रमाचा भाग म्हणून आयोजित लोकप्रतिनिधी संमेलनाचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी, हरियाणा विधानसभेचे विद्यमान आणि माजी आमदार, तसेच माजी मंत्री यांना मार्गदर्शन केले, त्यावेळी त्यांनी हरियाणाच्या सहा दशकांच्या विकासप्रवासाचा, सामाजिक-आर्थिक आव्हानांचा सामना करण्याच्या क्षमतेचा आणि विविध क्षेत्रांतील नेतृत्वाचा आढावा घेतला. भारताची संवैधानिक मूल्ये आणि लोकशाही परंपरांच्या चौकटीत, राज्याच्या उल्लेखनीय कामगिरीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
गेल्या साठ वर्षात, हरियाणाच्या झालेल्या प्रगतीचा आलेख मांडतांना, बिर्ला यांनी, हरियाणा राज्य, अनेक ऐतिहासिक आणि प्रशासकीय आव्हानांचा सामना करतांना, कायमच देशाच्या प्रगतीत अग्रस्थानी राहिले आहे, असे सांगितले. भग्वदगीतेमध्ये सांगितलेल्या कर्माच्या शाश्वत संदेशाचा संदर्भ देत त्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात पुढाकार घेऊन, पीक उत्पादनात वाढ केल्याबद्दल आणि देशाच्या अन्नसुरक्षेत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल शेतकरी समुदायाचे कौतुक केले. देशाच्या सीमांचे आणि अंतर्गत सुरक्षेचे रक्षण करताना अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या हरियाणातील सशस्त्र दलांमधील तरुण जवानांचेही त्यांनी कौतुक केले. तसेच, जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताची प्रतिष्ठा सातत्याने उंचावणाऱ्या हरियाणाच्या खेळाडूंचे त्यांनी अभिनंदन केले.
भारताच्या संवैधानिक प्रवासाचे एकात्मिक आणि संवादात्मक स्वरूप अधोरेखित करत, बिर्ला म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीच्या मार्गदर्शनाखाली, आणि हरियाणा तसेच पंजाबमधील विविध प्रदेशातील मान्यवर नेत्यांच्या आणि जनतेच्या सहभागातून, घटना समितीने, सांस्कृतिक आणि धार्मिक विविधतेच्या पार्श्वभूमीवर एकसंध संसदीय लोकशाहीचा पाया घातला, असे त्यांनी नमूद केले. भारताची विविधतेने नटलेली संघराज्य व्यवस्था टिकून राहणे आणि तिचा विकास होत राहणे, हे भारतीय लोकशाहीच्या लवचिकतेचे आणि सामर्थ्याचे जागतिक स्तरावरील उदाहरण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
“आपले संविधान हे केवळ सरकार चालवण्याचा प्रशासकीय नियामक आराखडा नाही, तर ते भारताचा जिवंत आत्मा आहे. ते आपल्या राष्ट्रीय जाणीवेचे आणि कोट्यवधी जनतेच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे.” असे गौरवोउद्गार त्यांनी काढले.
विधिमंडळातील कोणाचाही लोकप्रतिनिधी म्हणून कार्यकाळ संपला असला, तरी, त्याची जनसेवेची बांधिलकी संपत नाही, यावर त्यांनी भर दिला. प्रशासन आणि सरकार, केवळ, एक प्रशासकीय यंत्रणा नाही, तर तळागाळातील व्यक्तींना सक्षम करण्याचे साधन आहे, अशी पक्की खूणगाठ लोकप्रतिनिधींनी बांधून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. समाजातील सर्वात दुर्बल घटकांच्या, म्हणजेच रांगेतील शेवटच्या व्यक्तीच्या जीवनात प्रत्यक्ष सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडवून आणणे आणि त्यांना खऱ्या अर्थाने आनंदी करणे, हेच राजकीय आणि सामाजिक जीवनाचे अंतिम मोजमाप असल्याचे त्यांनी सांगितले.
हरियाणा विधानसभेने आपल्या सहा दशकांच्या वाटचालीत उच्च दर्जाच्या चर्चा, तर्कशुद्ध संवाद आणि विधिमंडळाच्या प्रतिष्ठेचे पालन करून एक आदर्श मानदंड प्रस्थापित केल्याबद्दल बिर्ला यांनी प्रशंसा केली. देशभरातील विधिमंडळांसाठी हरियाणा विधानसभा प्रेरणादायक ठरली आहे, असेही ते पुढे म्हणाले. लोककल्याण आणि संस्थांप्रति जबाबदारी, यांच्याशी बांधिलकी राखल्यास लोकशाही संस्था अधिक सक्षम होतात, हे हरियाणा विधानसभेने दाखवून दिले आहे, असेही बिर्ला यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाला , हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष, हरविंदर कल्याण; विरोधी पक्ष नेते भूपिंदर सिंग हुड्डा, हरियाणाचे संसदीय कामकाज मंत्री महिपाल धांडा आणि हरियाणा विधानसभेचे उपाध्यक्ष डॉ.कृष्ण लाल मिड्ढा उपस्थित होते.
शैलेश पाटील/राधिका अघोर/प्रिती मालंडकर