आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी 'तंबाखूमुक्त युवा मोहीम 4.0'चा केला प्रारंभ; तंबाखू आणि व्यसनांविरुद्धच्या देशव्यापी चळवळीचे नेतृत्व करण्याचे युवकांना केले आवाहन


तंबाखू आणि व्यसनांपासून युवकांचे संरक्षण करणे हे निरोगी, सक्षम आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी अत्यंत आवश्यक आहे: प्रतापराव जाधव

केंद्रीय मंत्र्यांनी उपस्थितांना 'तंबाखूला नकार' देण्याची शपथ दिली; 'तंबाखूमुक्त भारता'चे दूत बनण्याचे युवकांना केले आवाहन

तंबाखू प्रतिबंधात्मक उपाय अधिक तीव्र करण्यासाठी, अंमलबजावणी बळकट करण्यासाठी आणि तंबाखूचे सेवन थांबवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी 60 दिवसांची देशव्यापी मोहीम

तंबाखूमुक्त युवा मोहीम 4.0 च्या केंद्रस्थानी विद्यापीठे आणि महाविद्यालये; तंबाखूमुक्त परिसर आणि युवकांच्या नेतृत्वाखालील जनजागृतीवर विशेष भर

Posted On: 28 OCT 2026 8:14PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑक्‍टोबर 2026 

 

केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज नवी दिल्ली येथील 'अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' आणि डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात तंबाखूमुक्त युवा मोहीमेच्या चौथ्या आवृत्तीचा शुभारंभ केला. तंबाखूचा वापर आणि निकोटीनच्या व्यसनापासून युवकांना वाचवण्यासाठी एक देशव्यापी लोकचळवळ उभारण्याचे त्यांनी  आवाहन केले.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे राबवली जाणारी ही 60 दिवसांची देशव्यापी मोहीम, तरुणांना तंबाखूच्या सेवनापासून दूर ठेवणे, त्यांना तंबाखू सोडण्यास प्रोत्साहित करणे, तंबाखू नियंत्रण कायद्यांची अंमलबजावणी अधिक कडक करणे आणि देशभरात  तंबाखूमुक्त वातावरणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेच्या मागील तीन आवृत्त्यांच्या यशानंतर —ज्यामध्ये 5.8 लाखांहून अधिक शैक्षणिक संस्था आणि 73000 हून अधिक गावे तंबाखूमुक्त घोषित करण्यात आली आहेत—या चौथ्या आवृत्तीत या उपक्रमाचा लक्षणीय विस्तार करण्यात आला असून यावर्षीच्या मोहिमेत विद्यापीठे आणि महाविद्यालयांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

   

उपस्थितांना संबोधित करताना, प्रतापराव जाधव यांनी देशातील तरुणांना तंबाखू आणि इतर व्यसनाधीन पदार्थांना ठामपणे नकार देण्याचे आणि एक निरोगी, समाधानी  व व्यसनमुक्त जीवनशैली अंगिकारण्याचे आवाहन केले.  भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तरुणांचे आरोग्य आणि कल्याण अत्यंत महत्त्वाचे आहे यावर त्यांनी भर दिला .

राष्ट्र उभारणीत युवकांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करताना, जाधव म्हणाले की, भारताची युवाशक्ती ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे आणि त्यांची ऊर्जा, प्रतिभा, सर्जनशीलता व दृढनिश्चयच देशाचे भविष्य घडवतील. युवा  पिढीचे तंबाखू आणि व्यसनांपासून रक्षण करणे ही  सार्वजनिक आरोग्याची गरज तर आहे, त्याचबरोबर  ती एक राष्ट्रीय जबाबदारीही आहे.

"निरोगी, बलवान आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी आपल्या युवकांचे तंबाखू आणि व्यसनापासून रक्षण करणे आवश्यक आहे,” यावर जाधव यांनी भर दिला. व्यसनांच्या ओझ्याशिवाय युवा  पिढी आपली पूर्ण क्षमता विकसित  करू शकेल, असे वातावरण निर्माण करण्यासाठी शैक्षणिक संस्था, कुटुंबे, समाज आणि सरकारी यंत्रणांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मंत्र्यांनी तंबाखू सेवनाच्या गंभीर आरोग्य परिणामांकडे लक्ष वेधले. तंबाखूच्या धुरामध्ये 7000 हून अधिक रसायने असतात, ज्यात अनेक विषारी आणि कर्करोग-कारक पदार्थांचा समावेश असतो, जे शरीराच्या विविध अवयवांना गंभीर इजा पोहोचवू शकतात, असे त्यांनी नमूद केले. तंबाखूच्या वापरामुळे केवळ वापरकर्त्यांचेच आरोग्य धोक्यात येत नाही, तर कुटुंबातील सदस्य, मुले आणि इतरांनाही अप्रत्यक्ष धूम्रपानाच्या  हानिकारक परिणामांना सामोरे जावे लागते, असा इशाराही त्यांनी दिला.

   

विशेषतः किशोरावस्थेतील निकोटीनच्या सेवनाबाबत जाधव यांनी निरीक्षण नोंदवले की लहान वयात निकोटिनचे सेवन केल्याने मेंदूचा विकास, स्मरणशक्ती आणि अध्ययन क्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. अगदी लहान वयातच म्हणजे ज्यावेळी लहान मुलांना निकोटीनची सवय लागून ते अधीन होऊ शकतात त्याच वयात त्यांना तंबाखू सेवनापासून रोखणे अत्यंत आवश्यक आहे, असे जाधव यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वाखाली आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रसाद नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार सातत्याने नागरिकांना विशेषतः लहान मुले आणि किशोरवयीन मुलांना तंबाखूच्या हानिकारक परिणामांपासून वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत, असे जाधव यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय वर्ष 2023 पासून दरवर्षी  60 दिवसांचे तंबाखू मुक्त युवा अभियान राबवत असून यामध्ये तंबाखू सेवनापासून प्रतिरोध, तंबाखू सोडणे, अधिक कडक अंमलबजावणी आणि सामुदायिक सहभाग यांवर लक्ष केंद्रित केले जाते, असे ते म्हणाले. या अभियानाने आता एका राष्ट्रव्यापी मोहिमेचे स्वरुप घेतले असून या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, शैक्षणिक संस्था, अंमलबजावणी संस्था, आरोग्यसेवेशी निगडित व्यावसायिक आणि समुदाय एकत्र आले आहेत.

मागील तीन आवृत्यांच्या कामगिरीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की सुमारे 5.8 लाख शैक्षणिक संस्था आणि 73,000 हून अधिक गावे आता तंबाखू मुक्त म्हणून घोषित करण्यात आली असून यातूनच या उपक्रमाची व्याप्ती तसेच राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील सर्व संबंधितांची वाढती बांधिलकी दिसून येते.  

   

केंद्र सरकारच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना शैक्षणिक संस्था आणि समुदायांचे योगदान लाभले असून त्यांनी तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती केली आहे आणि त्याचबरोबर राष्ट्राच्या तंबाखू नियंत्रण मोहिमेला बळ दिले आहे.

या अभियानाने आता केंद्र सरकारच्या कार्यक्रमाच्या कक्षेपलीकडे जाऊन युवा नेतृत्त्व आणि युवकांचा  सक्रिय सहभाग असलेल्या जनचळवळीचे रुप घेतले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

जाधव यांनी सर्व संबंधित घटकांना ‘तंबाखूला नकार द्या’  हा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे आणि तंबाखू प्रतिबंध ही एक सामायिक सामाजिक जबाबदारी बनेल याची खात्री करण्याचे आवाहन केले.

जाधव यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना उपस्थित सर्व सहभागींना ‘तंबाखूला नकार द्या’ ही शपथ दिली. यावेळी त्यांनी तंबाखूपासून दूर राहण्याची, इतरांनाही तंबाखूचे सेवन सोडण्यासाठी प्रोत्साहित करण्याची आणि निरोगी आणि  तंबाखूमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी योगदान देण्याची सामूहिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली.

   

तीन टप्प्यांत व्यापक विस्तार: 5.8  लाखांहून अधिक शैक्षणिक संस्था आणि 73,000 गावे तंबाखूमुक्त घोषित

तंबाखूमुक्त युवा अभियान 4.0 म्हणजेच टीएफवायसी 4.0 चा शुभारंभ हा देशभरात सलग राबवण्यात आलेल्या तीन मोहिमांच्या यशस्वी कामगिरीवर आधारित आहे. या मोहिमांमुळे तंबाखू प्रतिबंधक उपक्रमांचा टप्प्याटप्प्याने विस्तार झाला, अंमलबजावणी अधिक बळकट झाली, तसेच देशभरातील शैक्षणिक संस्था आणि समुदायांना या अभियानात सक्रियपणे सहभागी करून घेण्यात आले.

पहिल्या तीन टप्प्यांमध्ये 5.8 लाखांहून अधिक शैक्षणिक संस्था आणि 73,000 हून अधिक गावे तंबाखूमुक्त घोषित करण्यात आली आहेत. यावरून देशव्यापी जनजागृती मोहिमेची व्यापकता तसेच तंबाखू नियंत्रणाच्या उपक्रमांप्रती शैक्षणिक संस्था, स्थानिक प्रशासन आणि समुदायांमध्ये वाढत असलेली जबाबदारीची भावना आणि  सक्रिय सहभाग अधोरेखित होतो.

टीएफवायसी 4.0 अंतर्गत तंबाखू प्रतिबंधक उपक्रमांमध्ये विद्यापीठे आणि महाविद्यालयांना अग्रस्थानी स्थान

तंबाखूमुक्त युवा अभियान 4.0 चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विद्यापीठे आणि महाविद्यालयांचा सहभाग असलेल्या उच्च शैक्षणिक संस्थांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्याना विद्यार्थ्यांना तंबाखू सेवनापासून रोखण्यासाठी आणि एक निरोगी जीवनशैली अंगिकारण्यासाठी प्रोत्साहन देण्याची जबाबदारी सोपवली जाते. 

किशोरावस्था आणि तरुणपणाचा प्रारंभ हा तंबाखू सेवनाचे व्यसन लागण्याच्या तसेच दीर्घकालीन आरोग्यविषयक सवयी विकसित होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याची जाणीव ठेवून, या अभियानांतर्गत तरुणांना या वयातच सहभागी करून घेण्यावर भर दिला जातो. या टप्प्यावर सातत्यपूर्ण जनजागृती आणि समवयस्कांकडून मिळणारे सकारात्मक प्रोत्साहन यांचा त्यांच्या जीवनावर दीर्घकालीन आणि सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

उच्च शिक्षण संस्थांवर विशेष लक्ष केंद्रित करून, टीएफवायसी 4.0 चा उद्देश तंबाखूमुक्त परिसर अधिक सक्षम करणे, तंबाखू आणि निकोटिनच्या घातक परिणामांविषयी जागरूकता वाढवणे, विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी योग्य निर्णय घेण्यास प्रोत्साहित करणे आणि तंबाखू नियंत्रणाच्या मोहिमेत शैक्षणिक संस्थांना सक्रिय भागीदार बनवणे हा आहे.

विद्यापीठे व महाविद्यालयांना विविध जनजागृती उपक्रम राबवण्यासाठी, तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्यासाठी, विद्यार्थ्यांमधील परस्पर संवादाला चालना देण्यासाठी तसेच तंबाखू प्रतिबंधक प्रयत्नांमध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापकांना सक्रियपणे सहभागी करून घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

TFYC 4.0 मोहीम देशभरात प्रभावीपणे राबवण्यासाठी 6 प्रमुख धोरणे

या मोहिमेची उद्दिष्टे प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी, टीएफवायसी 4.0 हे जनजागृती, संस्थात्मक सहभाग, समुदाय मोहीम, कायदेशीर अंमलबजावणी आणि डिजिटल संपर्क या सर्वांचा मेळ घालून 6 प्रमुख धोरणांद्वारे राबवले जाईल.

ही मोहीम खालील बाबींवर विशेष भर देईल:

  1. सार्वजनिक जनजागृती तीव्र करणे: तंबाखू आणि निकोटीनच्या व्यसनामुळे होणाऱ्या घातक परिणामांबद्दल विशेषतः बालके, किशोरवयीन आणि तरुणांमध्ये जनजागृती वाढवणे व त्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणणे; तसेच तंबाखूचे सेवन करणाऱ्यांना व्यसनमुक्तीसाठी प्रोत्साहन देणे.
  2. तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थांचे सक्षमीकरण: 'तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था' मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास प्रोत्साहन देणे आणि शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये तंबाखूमुक्त वातावरण तयार करून ते टिकवून ठेवण्यास पाठींबा देणे.
  3. तंबाखूमुक्त गावांचा विस्तार करणे: स्थानिक प्रशासन, पंचायती राज संस्था आणि गावातील घटक यांच्या सक्रिय सहभागाद्वारे 'तंबाखूमुक्त गाव' ही संकल्पना अधिकाधिक समुदायांपर्यंत आणि खेड्यांपर्यंत पोहोचवणे.
  4. तंबाखू नियंत्रण कायद्यांची अंमलबजावणी कडक करणे: 'सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा, 2003' आणि 'ई-सिगारेट प्रतिबंध कायदा 2019' यांची परस्पर समन्वयातून प्रभावीपणे व कडक अंमलबजावणी करणे.
  5. सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करणे: डिजिटल संदेशवहन, सोशल मीडिया मोहिमा आणि तरुणांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या उपक्रमांद्वारे तंबाखूविरोधी संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे व लोकसहभाग वाढवणे.
  6. विद्यापीठे आणि महाविद्यालयांना सहभागी करून घेणे: उच्च शैक्षणिक संस्थांवर विशेष भर देऊन तेथील परिसर तंबाखूमुक्त करणे, विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील जनजागृतीला प्रोत्साहन देणे आणि कॅम्पसमधील आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये तंबाखू नियंत्रणाचा समावेश करणे.

तंबाखू नियंत्रणाच्या सक्षमीकरणासाठी 'समन्वित  शासन पद्धती'चा अवलंब

तरुणांचे तंबाखूपासून रक्षण करण्यासाठी आरोग्य, शिक्षण, युवा विकास, स्थानिक स्वराज्य संस्था, कायदा अंमलबजावणी, माहिती व प्रसारण यांसारख्या विविध क्षेत्रांच्या समन्वित कृतीची गरज आहे, हे लक्षात घेऊन टीएफवायसी 4.0 मध्ये 'समन्वित  शासन पद्धती'चा सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारला जाईल. या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय हे प्रमुख केंद्रीय मंत्रालयांशी असलेले सहकार्य अधिक मजबूत करेल. तसेच राज्ये व केंद्रशासित प्रदेश, अंमलबजावणी यंत्रणा, शैक्षणिक संस्था आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील समन्वय हा या मोहिमेचा मुख्य आधार असेल.

हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि लोकांचा शाश्वत सहभाग सुनिश्चित करण्यासाठी ही मोहीम विकास भागीदार, स्वयंसेवी संस्था, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ आणि समुदाय-आधारित संस्थांसोबतचा सहभाग अधिक दृढ करेल.

विविध भागधारकांना एकत्र आणून, तंबाखू प्रतिबंध ही सर्वांची सामायिक जबाबदारी आहे ही भावना दृढ करणे आणि देशभरातील संस्था व समुदायांमध्ये तंबाखू नियंत्रणाचे प्रयत्न रुजवणे हे टीएफवायसी 4.0 चे मुख्य उद्दिष्ट आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी यावेळी संबोधित केले. भारतातील तंबाखू नियंत्रणाचे प्रयत्न पुढे नेण्यासाठी सततची बांधिलकी, संस्थांची समन्वित कृती आणि समुदायाचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

* * *

निलिमा चितळे/सुषमा काणे/भक्‍ती सोनटक्‍के/वैभवी जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2329768) अभ्यागत कक्ष : 9