अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डीआरआयने कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सुमारे 13.5 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या 55,000 ई-सिगारेट्स जप्त केल्या

Posted On: 28 OCT 2026 11:04AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑक्‍टोबर 2026 

 

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अवैध व्यापाराविरोधात आपली धडक कारवाई सुरू ठेवली असून, 24 ऑक्टोबर 2026 रोजी कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरात तस्करी करून आणलेल्या 55,000 हून अधिक ई-सिगारेट्स जप्त केल्या आहेत.

डीआरआय अधिकाऱ्यांनी विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, नेपाळला जाणारे दोन ट्रान्सशिपमेंट कंसाइनमेंट कंटेनर जप्त केले, ज्यामध्ये ई-सिगारेट्स असल्याचा संशय होता. एका कंटेनरमध्ये  ई-सिगारेट्सना  'पाण्याचा ग्लास' आणि  दुसऱ्या कंटेनरमध्ये 'सिरॅमिक मग' म्हणून चुकीच्या पद्धतीने घोषित केले होते. पहिल्या कंटेनरच्या सखोल तपासणीत, घोषित मालामध्ये लपवलेल्या 'आयजीईटी' (IGET) ब्रँडच्या विविध फ्लेवर्सच्या 40,000 ई-सिगारेट्स जप्त करण्यात आल्या. तर, दुसऱ्या कंटेनरच्या सखोल तपासणीत, घोषित मालामध्ये लपवलेल्या 'व्हीटीव्ही' (VTV), 'वोको' (VOKO), 'बँग' (Bang) आणि 'ईजॉय' (Ejoy) यांसारख्या विविध ब्रँड्सच्या सुमारे 15,000 ई-सिगारेट्स जप्त करण्यात आल्या.

सीमा शुल्क कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत, कवर कार्गोसह एकूण सुमारे 55000 ई-सिगारेट्स जप्त करण्यात आल्या आहेत, ज्यांचे मूल्य 13.50 कोटी रुपये इतके आहे.

भारतात सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि लोकांना होणाऱ्या हानीपासून वाचवण्यासाठी 'इलेक्ट्रॉनिक सिगारेट्स प्रतिबंध  (उत्पादन, निर्माण, आयात, निर्यात, परिवहन, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात) कायदा 2019 अंतर्गत  ई-सिगारेट्स आणि सर्व प्रकारच्या 'इलेक्ट्रॉनिक निकोटिन डिलिव्हरी सिस्टम्स' (ENDS) वर बंदी घालण्यात आली आहे.

चालू आर्थिक वर्ष  2026-27 मध्ये, महसूल गुप्तचर संचालनालयाने महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील विविध बंदरे, विमानतळ आणि इनलँड कंटेनर डेपो (ICDs) येथे सुमारे  3,00,000 ई-सिगारेट्स जप्त केल्या आहेत, ज्यांचे मूल्य 120 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

 

* * *

आशिष सांगळे/सुषमा काणे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2329457) अभ्यागत कक्ष : 14