Posted On:
27 OCT 2026 9:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2026
आदिवासी कार्य मंत्रालय, 1 ते 15 नोव्हेंबर 2026 या कालावधीत देशभर जनजातीय गौरव पंधरवडा साजरा करणार आहे. या पंधरवड्याचा समारोप 15 नोव्हेंबर रोजी जनजातीय गौरव दिवसाने होईल, या दिवशी धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आहे. हा पंधरवाडा केवळ एक उत्सव नसून, मंत्रालयाच्या प्रमुख योजनांना गती देण्यासाठी, त्यांचे लाभ दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आदिवासी समुदाय, विद्यार्थी व नागरिकांमध्ये विविध सरकारी योजना व हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी राबवली जाणारी एक विशेष मोहीम आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, केंद्र सरकारने 2021 मध्ये धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची जयंती, म्हणजेच 15 नोव्हेंबर हा दिवस जनजातीय गौरव दिवस म्हणून घोषित केला होता.
यावर्षी (2026) जनजातीय गौरव दिवसाच्या निमित्ताने, मंत्रालयाने पंधरा दिवसांच्या कालावधीत अनेक राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. नियोजित कार्यक्रमांची यादी खालीलप्रमाणे आहे:
1. राष्ट्रपती भवनात 12 नोव्हेंबर रोजी, एकलव्य आदर्श निवासी शाळांमधील सुमारे 200 विद्यार्थी राष्ट्रपतींशी संवाद साधतील.
2. नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय आदिवासी साहित्य महोत्सवाचे आयोजन केले जाईल, ज्यामध्ये देशभरातील आदिवासी लेखक सहभागी होतील.
3. आयआयटी दिल्ली येथे आदि वाणीला आदिवासी जिवंत वारसा आणि राष्ट्रीय आदिवासी भाषा भांडार म्हणून अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने एक राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली जाईल.
4. दिनांक 14 नोव्हेंबर रोजी राणी दुर्गावती आदिवासी महिला संमेलनाचे आयोजन केले जाईल. यामध्ये 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 500 आदिवासी महिला उद्योजक एकत्र येतील, ज्याद्वारे बाजारपेठेतील संपर्क अधिक दृढ करणे आणि महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांना चालना देणे हे उद्दिष्ट साध्य केले जाईल.
5. स्वास्थ्य-पोषण सेवा संगम द्वारे 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत पीएम-जनमन बहुउद्देशीय केंद्रांवर आरोग्य, पोषण आणि विविध सरकारी योजनांविषयक शिबिरांचे आयोजन केले जात आहे.
6. हैदराबाद येथे 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी आदिवासी पारंपरिक वैद्यांसाठी क्षमता बांधणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यात 9 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे 1,500 पारंपरिक वैद्य प्रशिक्षण घेत आहेत. हा उपक्रम एकूण 1 लाख पारंपरिक वैद्यांना प्रशिक्षित करून त्यांना प्रमाणपत्र देण्याच्या मोहिमेचा भाग आहे.
7. धरती आबा जनभागीदारी अभियान अंतर्गत आदि सेवा समय आणि आदि सेवा दिन द्वारे आदिवासी गावांमध्ये लोकसहभाग वाढवला जाणार आहे. तसेच, राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्थांमार्फत 76,963 गावांमधील सुमारे 1.54 लाख आदि कर्मयोगी स्वयंसेवकांना प्रशिक्षित केले जात आहे.
8. 73 जिल्ह्यांमध्ये स्कॉलरशिप ॲक्सेस कॅम्प अर्थात शिष्यवृत्ती संपर्क शिबीर आयोजित केले जात आहेत, जे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास आणि त्यांच्या आधार कार्डाला बँक खात्याशी जोडण्यास मदत करत आहेत.
9. ओडिशामधील कोरापुट येथे सीएसआयआर-एनबीआरआयच्या सहकार्याने 200 ते 300 औषधी वनस्पतींच्या प्रजातींचे जतन करण्यासाठी एक कार्यक्रम सुरू केला जाणार आहे.
याव्यतिरिक्त, विविध राज्यांमध्ये जनजातीय गौरव दिवसानिमित्त आदिवासी समुदायांसाठी 300 हून अधिक प्रकल्प हाती घेतले जाणार आहे; ज्यामध्ये 228 प्रकल्पांचे उद्घाटन आणि 74 प्रकल्पांची पायाभरणी केली जाईल. यामध्ये अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट ची नवीन इमारत आणि मिझोराममधील केल्सिह येथे रोपुलियानी ट्रायबल फ्रीडम फायटर म्युझियम यांचा समावेश आहे.
यासोबतच दोन राष्ट्रीय डिजिटल उपक्रमही सुरू केले जाणार आहेत. आयसीएमआर च्या सहकार्याने विकसित केलेले जन-हित – जनजातीय आरोग्य बुद्धीमत्ता आणि तंत्रज्ञान पोर्टल हे भारतातील पहिले असे व्यासपीठ आहे, जे 20 राज्यांमधील आदिवासी समुदायांच्या आरोग्यविषयक आकडेवारीचे संकलन करते. तसेच, नॅशनल एफआरए डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे वन हक्क कायदा, 2006 अंतर्गत वन हक्क दाव्यांची संपूर्ण प्रक्रिया—ग्रामसभेकडे अर्ज सादर करण्यापासून ते डिजिटल स्वाक्षरी असलेल्या हक्क पत्रांच्या वितरणापर्यंत—एकाच प्रणालीद्वारे हाताळली जाईल.
याव्यतिरिक्त, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश त्यांच्या आदिवासी संशोधन संस्थांच्या माध्यमातून पंधरवडा साजरा करत आहेत. या संस्थांनी 19 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 160 हून अधिक उपक्रमांचे नियोजन केले असून, यामध्ये 1 लाखांहून अधिक लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये सांस्कृतिक महोत्सव, प्रदर्शने आणि आदरांजलीपासून ते शाळा, ईएमआरएस व वसतिगृहांमधील स्पर्धा, तसेच कल्याण आणि उपजीविका शिबिरांपर्यंतच्या कार्यक्रमांचा समावेश आहे.
राज्ये आधार आणि शिष्यवृत्ती शिबिरे, सिकल सेल तपासणी, पीव्हीटीजींसाठी आयुष्मान कार्ड शिबिरे आणि वन हक्कांवर कायदेशीर साक्षरता शिबिरे देखील आयोजित करतील.
मंत्रालय, नागरिकांना त्यांच्या भागातील कार्यक्रमांना उपस्थित राहून, माय जीओव्ही वरील जेजेजीडी प्रश्नमंजुषा आणि शपथेमध्ये भाग घेऊन, आदिवासी कारागिरांना पाठिंबा देऊन आणि #JanjatiyaGauravDivas व #JJGD2026 या हॅशटॅगसह आपल्या कथा सामायिक करून या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करत आहे.
सोनाली काकडे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai