Posted On:
27 OCT 2026 4:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2026
शिक्षण मंत्रालय उद्या 28 ऑक्टोबर 2026 रोजी नवी दिल्ली येथे 'विकसित भारत बिल्डाथॉन (VBB) 2025' चा भव्य समारोप आणि सत्कार समारंभ आयोजित करणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी विजेत्या विद्यार्थी संशोधकांचा सत्कार करतील.
भारतातील शालेय शिक्षण आणि तळागाळातील नवोन्मेषासाठी एक ऐतिहासिक टप्पा गाठत, VBB 2025 ने अधिकृतपणे “सर्वात मोठी नवोन्मेषी उपाय स्पर्धा” म्हणून 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स' प्रमाणपत्र मिळवले आहे, ज्यामुळे भारताच्या युवा पिढीला जागतिक स्तरावर स्थान मिळाले आहे.

या कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावरील 10 विजेत्या संघांचा आणि नवोन्मेषकर्त्यांचा सत्कार केला जाईल, जिथे त्यांच्या परिवर्तनकारी शोधांचे आणि मॉडेल्सचे प्रदर्शन केले जाईल. या कार्यक्रमात अधिकृत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रदान करण्याचा सोहळा देखील पार पडेल.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील समस्या निवारण, उद्योजकता आणि वैज्ञानिक कुतूहल वाढवण्यासाठी 'शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग', 'अटल इनोव्हेशन मिशन', 'नीती आयोग' आणि 'अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद' यांच्या सहकार्याने 'विकसित भारत बिल्डाथॉन (VBB) 2025' चे आयोजन करण्यात आले होते. आत्मनिर्भर भारत, स्वदेशी, व्होकल फॉर लोकल आणि समृद्ध भारत या चार पायाभूत स्तंभांवर आधारित या उपक्रमाला तळागाळातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, आयडिया आणि प्रोटोटाईप या दोन्ही ट्रॅक्समध्ये 2,87,967 प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. VBB भारताच्या वाढत्या शालेय नवोन्मेषी व्यवस्थेला बळ देत आहे आणि लहान मुलांना चार भिंतीच्या वर्गखोलीतले विद्यार्थी म्हणून मर्यादित न ठेवता, समस्या निवारक, पेटंटधारक आणि विकसित भारताच्या संकल्पनेला पुढे नेणारे भविष्यातील उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या 'शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागा'द्वारे या कार्यक्रमात 'उल्लास - नव भारत साक्षरता कार्यक्रम' अंतर्गत शिक्षक शिक्षण संस्थांसाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली जातील.
सोनाली काकडे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai