Posted On:
26 OCT 2026 6:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2026
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 28 ते 29 ऑक्टोबर 2026दरम्यान फिलिपिन्स मधील सेबू येथे होणाऱ्या 13 व्या आग्नेय आशियाई राष्ट्रांच्या संघटनेच्या (आसियान) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत (एडीएमएम-प्लस) भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. या बैठकीत ते प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा मुद्द्यांवरील चर्चासत्रात आपले विचार मांडतील.
आसियान संरक्षण मंत्री बैठकीच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह विविध राष्ट्रांच्या संरक्षण मंत्र्यांशी द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. यादरम्यान ते विविध देशांबरोबर असलेल्या भारताच्या संरक्षण विषयक संबंधांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतील तसेच धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्यासाठीच्या संधींचा वेध घेतील.
आसियान संरक्षण मंत्री बैठक ही आसियान मधील संरक्षण क्षेत्रातील सर्वोच्च सल्लागार आणि सहकारी यंत्रणा आहे. आसियान संरक्षण मंत्री बैठक ही आसियान सदस्य राष्ट्र (ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओ पीडीआर, मलेशिया, म्यानमार, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड, तिमोर-लेस्ते आणि व्हिएतनाम) आणि त्याचे आठ संवाद भागीदार (भारत, अमेरिका, चीन, रशिया, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड) यांच्यासाठी सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य वृद्धिंगत करण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे.
भारत 1992 मध्ये आसियान चा संवाद भागीदार बनला आणि 12 ऑक्टोबर 2010 रोजी व्हिएतनाममधील हनोई येथे पहिली एडीएमएम-प्लस बैठक आयोजित करण्यात आली होती. 2017 पासून, आसियान आणि 'प्लस' देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी 'एडीएमएम-प्लस'चे मंत्री दरवर्षी एकत्र येतात.
वर्ष 2026 साठी फिलिपिन्स एडीएमएम-प्लस च्या अध्यक्षस्थानी आहे. एडीएमएम-प्लस अंतर्गत भारत 2024-2027 या कालखंडासाठी मलेशिया सोबत दहशतवाद विरोधी तज्ञ कार्यकारी गटाचे सहअध्यक्षपद भूषवत आहे. एडीएमएम-प्लस यंत्रणेमध्ये भारताचा सक्रिय सहभाग हा ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणांतर्गत आग्नेय आशियातील संरक्षणविषयक राजनैतिक संबंध अधिक दृढ होत असल्याचे दर्शवतो. या धोरणाचा उद्देश या प्रदेशात शांतता, स्थैर्य आणि सामूहिक विकास सुनिश्चित करणे हा आहे.
निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai