Posted On:
24 OCT 2026 12:32PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑक्टोबर 2026 रोजी उत्तर प्रदेश आणि ओदिशाला भेट देतील. सकाळी 11 च्या सुमारास, पंतप्रधान वाराणसीमध्ये नवीन तयार कपडे शिवणाऱ्या (गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग) सुविधेचे उद्घाटन करतील. दुपारी 1 च्या सुमारास, ते मुख्य अतिथी म्हणून वाराणसीतील नमो घाटावर 'वायुसेना दिन हवाई प्रात्यक्षिक-2026' ची पाहणी करतील.
त्यानंतर, पंतप्रधान ओदिशाला रवाना होतील आणि तिथे संध्याकाळी 4:45 च्या सुमारास ते भुवनेश्वरमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेटा सेंटर आणि सायबर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन करतील. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.
वाराणसीत पंतप्रधान
पंतप्रधान उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे अरविंद लिमिटेडच्या नवीन तयार कपडे उत्पादन सुविधेचे उद्घाटन करतील. ही सुविधा भारतातील वस्त्रोद्योग आणि परिधान उत्पादन परिसंस्था मजबूत करण्याच्या तसेच या क्षेत्रातील औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.
आधुनिक उत्पादन पद्धतींवर भर देणारी ही सुविधा विशेषतः महिलांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करेल आणि या क्षेत्राच्या आर्थिक प्रगतीत योगदान देईल. हे उद्घाटन औद्योगिक गुंतवणूक आणि उत्पादन-केंद्रित विकासाचे केंद्र म्हणून उत्तर प्रदेशची वाढती भूमिका देखील अधोरेखित करत आहे. जागतिक ग्राहकवर्ग असल्यामुळे, वाराणसीत तयार झालेली उत्पादने जगभरात कशा प्रकारे पोहोचतील याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. मुख्यत्वे महिलांच्या नेतृत्वाखालील उपक्रम असल्याने, हा महिला-प्रणित विकासाचे एक शक्तिशाली प्रतीक आहे.
पंतप्रधान वाराणसीतील नमो घाटावर 'वायुसेना दिन हवाई प्रात्यक्षिक-2026' या हवाई प्रात्यक्षिकांची पाहणी करतील. हा कार्यक्रम भारतीय हवाई दलाच्या 94 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केला जाणार असून तो 'विंग्स ओव्हर गँजेस' या संकल्पनेवर आधारित आहे.
या हवाई प्रात्यक्षिकामध्ये तेजस, लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) प्रचंड, सुखोई-30MKI आणि राफेल यांसारख्या लढाऊ विमानांसह मालवाहतूक करणाऱ्या विमानांचाही समावेश असेल. मोहिमांमधील संयुक्तता प्रदर्शित करण्यासाठी भारतीय नौदल आणि भारतीय लष्कराची विमानेही यामध्ये सहभागी होतील. या कार्यक्रमात सूर्य किरण एरोबॅटिक टीम आणि सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले टीमसह भारतीय हवाई दलाच्या प्रमुख प्रात्यक्षिक टीम्स सहभागी होतील. या प्रात्यक्षिकामधून अचूक उड्डाण, समन्वय आणि परिचालनामधील उत्कृष्टतेचे प्रदर्शन केले जाईल .
भुवनेश्वरमध्ये पंतप्रधान
भारताच्या आर्थिक व्यवस्थेचा तांत्रिक पाया बळकट करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत, पंतप्रधान भुवनेश्वरमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नव्याने स्थापन झालेल्या डेटा सेंटर आणि सायबर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन करतील. बँकेच्या संगणकीय गरजा पूर्ण करण्यासाठी आणि बँक आणि व्यापक आर्थिक क्षेत्रासाठी एक सुरक्षित, लवचिक, विस्तारयोग्य आणि भविष्यासाठी सज्ज असलेली संगणकीय प्रणाली प्रदान करण्यासाठी यांची रचना करण्यात आली आहे.
चार अद्ययावत डेटा सेंटर्स अतिशय महत्त्वाच्या पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टीम्ससह इतर आघाडीच्या उपक्रमांची हाताळणी करतील. या सुविधेला डेटा सेंटर पायाभूत सुविधांसाठी मह्त्त्वाचे मानले जाणाऱ्या अपटाइम इन्स्टिट्यूट टियर IV या जागतिक मानकाने प्रमाणित करण्यात आले आहे, ज्यामुळे या सुविधेचा कार्यक्षमतेच्या सर्वोच्च श्रेणीत समावेश आहे. जागतिक स्तरावर बँकिंग, आर्थिक सेवा आणि विमा (BFSI) या क्षेत्रातील टियर IV प्रमाणित सर्वात मोठ्या सुविधांपैकी ही एक सुविधा आहे. डिजिटल आर्थिक सेवांची पोहोच, कार्यक्षमता आणि विश्वासार्हता वाढवण्यास ती हातभार लावेल आणि भारताची तंत्रज्ञानावर आधारित वाढती आर्थिक व्यवस्था विकसित होऊ शकेल असा सुरक्षित डिजिटल पाया तयार करेल. मध्यवर्ती बँकिंग समुदायामध्ये डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये आघाडीवर असलेली संस्था म्हणून रिझर्व्ह बँकेचे असाधारण स्थान अधिक बळकट करण्यास देखील ती हातभार लावेल.
सायबर सुरक्षा प्रशिक्षण संस्था क्षमता निर्मितीला प्रोत्साहन देईल, सायबर सुरक्षा आणि एंटरप्राइझ-तंत्रज्ञान प्रशिक्षण, संशोधन आणि क्षेत्रव्यापी क्षमता विकासासाठी एक समर्पित संस्थात्मक मंच प्रदान करेल. ही संस्था क्वांटम कंप्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर प्रगत तंत्रज्ञानासह BFSI क्षेत्राशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करेल.
***
आशिष सांगळे/शैलेश पाटील/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com