Posted On:
23 OCT 2026 5:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2026
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी भारत-जर्मनी व्यापार, गुंतवणूक आणि औद्योगिक सहकार्य मजबूत करण्यासाठी 22 ऑक्टोबर रोजी बर्लिनमध्ये उच्चस्तरीय बैठकांची मालिका आयोजित केली. यामध्ये जर्मनीच्या आर्थिक व्यवहार आणि ऊर्जा विभागाच्या केंद्रीय मंत्री कॅथरीना रायशे यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक, 'जर्मन कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स' (DGAP) येथील इंडिया सेंटरचे उद्घाटन, भारत-जर्मनी बिझनेस राउंडटेबल आणि बर्लिन ग्लोबल डायलॉग मधील सहभाग यांचा समावेश होता.
द्विपक्षीय बैठकीदरम्यान, पीयूष गोयल आणि रायशे यांनी अधिक निकटच्या औद्योगिक सहकार्याच्या संधींवर आणि द्विपक्षीय व्यापार व गुंतवणुकीचा विस्तार करण्यासाठी भारत-ईयू मुक्त व्यापार कराराच्या क्षमतेवर चर्चा केली. दोन्ही मंत्र्यांनी बर्लिनमधील डीजीएपी च्या 'इंडिया सेंटर'चे संयुक्तपणे उद्घाटन केले. भारत-जर्मनी संबंधांवर धोरणात्मक संशोधन आणि संवादाला प्रोत्साहन देणे हा या केंद्राचा उद्देश आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी डीजीएपी आणि 'एशिया-पॅसिफिक कमिटी ऑफ जर्मन बिझनेस' (एपीए) द्वारे आयोजित भारत-जर्मनी बिझनेस राउंडटेबलचे सह-अध्यक्षपद भूषवले, ज्यामध्ये जर्मन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवसाय क्षेत्रातील नेते सहभागी झाले होते. आपल्या प्रमुख भाषणात, मंत्री गोयल यांनी विकासाला गती देणे आणि एका नव्या व्यापार युगाची निर्मिती करण्यावर मार्गदर्शन केले, तर रायशे यांनी मुक्त व्यापार कराराचे औद्योगिक वास्तवात रूपांतर करण्याविषयी भाष्य केले. त्यानंतर झालेल्या चर्चेत संभाव्य भारत-ईयू मुक्त व्यापार कराराचे प्रत्यक्ष व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधींमध्ये रूपांतर करण्यावर भर देण्यात आला.
बर्लिन ग्लोबल डायलॉगमध्ये, पीयूष गोयल यांनी "न्यू ईरा, न्यू अलायन्सेस: द थर्ड पाथ?" हे शीर्षक असलेल्या पॅनेल चर्चेत सहभाग घेतला. यामध्ये जर्मन चान्सलरचे गुंतवणुकीसाठीचे वैयक्तिक प्रतिनिधी मार्टिन ब्लेसिंग; सिंगापूरचे मनुष्यबळ मंत्री आणि ऊर्जा व विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रभारी मंत्री डॉ. टॅन सी लेंग; आणि मार्सेगालिया स्टीलच्या अध्यक्षा आणि सीईओ एम्मा मार्सेगालिया यांचा समावेश होता, तर या सत्राचे संचालन प्रा. डॉ. लार्स-हेंड्रिक रोलर यांनी केले. गोयल यांनी आंतरराष्ट्रीय भागीदारीत विश्वास, परस्परपूरक आर्थिक ताकद आणि लवचिक पुरवठा साखळीचे महत्व अधोरेखित केले
व्यवसाय आणि गुंतवणूक सहकार्याच्या संधी शोधण्यासाठी पीयूष गोयल यांनी बायर एजी च्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि तिच्या फार्मास्युटिकल्स विभागाचे अध्यक्ष स्टीफन ओएलरिच; नाउफ समूहाचे व्यवस्थापकीय भागीदार मुरत अकीलडीझ; आणि फ्रेसेनियस एसई अँड कंपनी केजीएए चे सीईओ मायकेल सेन यांच्याशी वैयक्तिक बैठकाही घेतल्या.
जर्मनी आणि नेदरलँड्सच्या या दौऱ्यात गोयल यांच्यासोबत सुमारे 100 भारतीय व्यावसायिक आणि स्टार्टअप्सचे शिष्टमंडळही आहे. बर्लिनमधील या बैठका भारत-जर्मनी धोरणात्मक भागीदारी, विशेषतः व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि औद्योगिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहेत.
* * *
सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai