Posted On:
23 OCT 2026 6:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2026
राष्ट्रीय महामार्गांवर नागरिक-केंद्री सेवा वृद्धिंगत करण्याच्या महत्त्वपूर्ण पुढाकाराअंतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय), टोल प्लाझांमधल्या सार्वजनिक स्वच्छतागृह सुविधा आणि निर्धारित पार्किंग व्यवस्थांच्या सुधारणा, देखभाल आणि स्मार्ट देखरेखीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांसाठी सार्वजनिक सुविधा स्वच्छ, सुरक्षित आणि सुस्थितीत असण्याची सुनिश्चिती करण्यासाठी विद्यमान सुविधा सुधारणे, नियमित स्वछता, तंत्रज्ञान आधारित देखरेख, नागरिक अभिप्राय आणि कामगिरी आधारित उत्तरदायित्व विहित करणारी मानके या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आहेत.
व्यापक सुधारणा आणि देखभाल
विद्यमान स्वच्छतागृहांच्या दुरुस्ती व नूतनीकरणापूर्वी त्यांचे तांत्रिक मूल्यमापन करण्यात येईल. यामुळे आवश्यक दुरुस्तीची कामे आणि आवश्यक असलेले बदल निश्चित करता येतील. सुधारणांमध्ये फरशा, नळजोडणी व्यवस्था, स्वच्छताविषयक उपकरणे, प्रकाशयोजना, वायुवीजन, सांडपाणी निचरा व्यवस्था, दिशादर्शक फलक आणि इतर आवश्यक सुविधांचा समावेश असेल. स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी आवश्यक व्यवस्था आणि स्वच्छतेचे वेळापत्रक हे स्वच्छतागृहांच्या आकारमानानुसार तसेच तेथील वाहतुकीच्या प्रमाणानुसार निश्चित केले जाईल. यामुळे स्वच्छतागृहांची नियमित देखभाल सुनिश्चित होण्याबरोबरच मूलभूत सुविधाही उपलब्ध राहतील.
सुरक्षा आणि सुलभता यांवर भर
रात्रीच्या वेळेस थांबणारी कुटुंबे आणि महिला प्रवासी यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पुरेशा उपाययोजना मार्गदर्शक तत्त्वांमध्ये देण्यात आल्या आहेत. यात योग्य प्रकाशव्यवस्था, प्रवेश आणि पार्किंग क्षेत्रात सीसीसीटीव्ही पहारा, सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन्स आणि सार्वजनिक सुविधांच्या उपलब्धतेची माहिती देणारे सुस्पष्ट फलक यांचा समावेश आहे. यात समाविष्ट प्रत्येक टोल प्लाझावर दिव्यांग व्यक्तींना सहज वापरता येईल असे किमान एक सार्वत्रिक स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे आवश्यक असेल. या स्वच्छतागृहात अडथळेमुक्त प्रवेशाची व्यवस्था, योग्य प्रवेशद्वारे आणि आधारासाठी दांडा असणे आवश्यक असेल.
टोल प्लाझा अर्थात पथकर नाक्यांच्या परिसरातील वाहनतळ म्हणजे पार्किंग क्षेत्र, सुनियोजित पार्किंग बे आणि योग्य जलनिस्सारण व्यवस्था विकसित करून सुधारण्यात येणार आहे. तसेच, भविष्यातील गरजा लक्षात घेऊन इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पायाभूत सुविधा उभारण्याचीही तरतूद करण्यात येणार आहे.
स्मार्ट देखरेख प्रणाली आणि नागरिकांचा अभिप्राय
तंत्रज्ञानावर आधारित देखरेख प्रणालीमुळे पाण्याची उपलब्धता, दुर्गंध, सांडपाण्याची पातळी, गळती, विजेचा पुरवठा आणि शौचालयांची सुविधा इत्यादी गोष्टींवर नजर ठेवणे सोपे होईल. पाणी टंचाई, सांडपाणी ओसंडून वाहणे आणि बिघडलेली उपकरणे यांसारख्या समस्यांसाठी मिळणाऱ्या सूचनांमुळे वेळेवर सुधारणात्मक कारवाई करणे शक्य होईल.
स्मार्ट देखरेख विषयक माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मध्यवर्ती डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडलेली असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना डिजिटल डॅशबोर्डच्या माध्यमातून सुविधांबाबत अद्ययावत माहिती, दुरुस्ती, तक्रारी आणि संबंधित संस्थांची कामगिरी यांवर लक्ष ठेवणे शक्य होईल.
राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी राजमार्ग अॅपला लिंक केलेल्या क्यू आर कोडच्या माध्यमातून तसेच शौचालयांजवळ असलेल्या टचस्क्रीनद्वारे आपला अभिप्राय कळवू शकतात. डिजिटल पद्धतीने नोंद झालेल्या तक्रारी आणि सूचनांमुळे संबंधित अधिकाऱ्यांना समस्यांकडे लक्ष ठेवून त्यावर उपाययोजना करणे शक्य होईल.
याव्यतिरिक्त, सेप्टिक टाक्या, सोक पिट्स आणि सांडपाण्याच्या वाहिन्या यांची स्वच्छता आणि त्यातील गाळ काढण्याचे काम पूर्णपणे यांत्रिक पद्धतींचा वापर करून करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सेप्टिक टाक्या, मॅनहोल्स आणि सांडपाण्याच्या वाहिन्यांमध्ये माणसाने प्रत्यक्ष आत उतरण्यास सक्त मनाई असेल.
कामगिरीवर आधारित उत्तरदायित्व
या मार्गदर्शक सूचनांमुळे एक संरचनात्मक तपासणी आराखडा स्थापन झाला असून यामध्ये दैनंदिन पर्यवेक्षण, साप्ताहिक तांत्रिक तपासणी, मासिक संयुक्त पुनरावलोकन, त्रैमासिक लेखापरीक्षण आणि वार्षिक तृतीय-पक्ष मूल्यमापन यांचा समावेश आहे. कामगिरीचे मूल्यमापन हे प्रत्यक्ष पाहणी, डेटा देखरेख आणि नागरिकांच्या पडताळणी केलेल्या अभिप्रायायावरून केले जाईल. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्पष्ट कालमर्यादा निश्चित केल्या आहेत तसेच सुविधांची योग्य देखरेख ठेवली जात नसेल तर आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. आवश्यक मानकांची पूर्तता करण्यात वारंवार अपयशी ठरणाऱ्या संबंधित यंत्रणांवर कठोर कारवाई केली जाऊ शकते.
या सर्व उपाययोजनांच्या माध्यमातून टोलप्लाझावरील सार्वजनिक सुविधांचा दर्जा व्यवस्थित ठेवण्याच्या उद्देशाने सुधारणा करण्याचा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा उद्देश आहे तसेच पारदर्शक, तंत्रज्ञान आधारित देखरेख आणि उत्तरदायित्व याद्वारे अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सर्वांसाठी सहज उपलब्ध असलेल्या सुविधा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करत आहे.
* * *
राधिका अघोर/सोनाली काकडे/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai