पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चिन्मय अमृत महोत्सवाच्या जागतिक संमेलनाचे उद्घाटन


चिन्मय मिशन अनेक दशकांपासून समाजाची सेवा करत असून भारताचे आध्यात्मिक ज्ञान जगभर पोहोचवत आहे: पंतप्रधान

चिन्मय मिशन ही केवळ एक संस्था नाही, तर चिन्मय ऋषींनी स्थापन केलेला एक सखोल ‘चिन्मय’ विचार आहे. अनेक दशकांचा त्याचा प्रवास ‘चिन्मय’ संकल्पांनी समृद्ध झाला आहे. जे चिन्मय आहे, ते स्वाभाविकपणे अमर आणि चिरंतन अमृताने परिपूर्ण आहे: पंतप्रधान

आपला देश हे आपल्या संस्कृतीचे उगमस्थान आहे, हाच देश आपल्या अस्तित्वाचा आधार आहे: पंतप्रधान

चिन्मय मिशनच्या प्रयत्नांमुळे आज लाखो तरुण भारताचे सांस्कृतिक दूत म्हणून काम करत आहेत. हे तरुण भारतीय मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचवत आहेत: पंतप्रधान

Posted On: 23 OCT 2026 4:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 ऑक्‍टोबर 2026 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम् इथे चिन्मय अमृत महोत्सवाच्या जागतिक संमेलनाचे उद्घाटन केले. या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी संतांचे प्रेम आणि आशीर्वाद यांमुळे या कार्यक्रमात सहभागी होणे हा आपल्यासाठी एक आध्यात्मिक अनुभव असल्याचे सांगितले. चिन्मय मिशन ही केवळ एक संस्था नसून, एका ऋषींनी स्थापन केलेली आणि अनेक दशकांच्या पवित्र संकल्पांनी प्रेरित झालेली अमर चेतना आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे या सोहळ्याला दिलेले नाव अत्यंत समर्पक असल्याचेही त्यांनी सांगितले.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पूजनीय गुरुदेव स्वामी चिन्मयानंद यांच्याशी होलॉबॉटच्या माध्यमातून झालेल्या संवादामुळे या कार्यक्रमाचा भावनिक अनुभव अधिक उत्कट झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या अनुभवामुळे आपण 33 वर्षे मागे गेलो आणि 1993 मध्ये वडोदरा इथे घेतलेली आध्यात्मिक गुरूंची भेट पुन्हा अनुभवली, असे त्यांनी नमूद केले. गुरुदेवांचे प्रेमळ वागणे, त्यांच्याशी झालेला संवाद आणि त्यांचे आशीर्वाद यांमुळे आपण पुन्हा एकदा त्यांच्या प्रत्यक्ष सान्निध्यात असल्याचा अनुभव घेतला, असे त्यांनी सांगितले. हा हृदयस्पर्शी सन्मान घडवून आणल्याबद्दल त्यांनी मिशनच्या सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले. आपल्यासाठी हा अत्यंत भावनिक अनुभव होता, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

फेब्रुवारी आणि मार्च 1993 मध्ये आपण स्वामी चिन्मयानंद यांना शिकागो इथे जागतिक धर्म संसदेच्या शताब्दी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यासाठी भेटलो होतो, अशी आठवण पंतप्रधानांनी सांगितली. स्वामी विवेकानंद यांच्या ऐतिहासिक भाषणाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी गुरुदेवांनी संपूर्ण अमेरिकेत लोकांना एकत्र आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यानंतर 3 ऑगस्ट रोजी सॅन दिएगो येथे त्यांचे निधन झाले.

11 सप्टेंबर रोजी शिकागो इथे झालेल्या कार्यक्रमात गुरुदेवांची अनुपस्थिती किती प्रकर्षाने जाणवली, याची आठवणही पंतप्रधानांनी सांगितली. त्यांच्याशी झालेल्या अखेरच्या संवादात युवा शक्तीच्या विकासावर भर देण्यात आला होता, असे त्यांनी नमूद केले. या संवादाचा मुख्य गाभा युवा शक्तीची उभारणी आणि तरुणांच्या सामर्थ्याच्या बळावर एक मजबूत व सक्षम भारत घडवणे हा होता,असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

त्या भेटीनंतर काही वर्षांनी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून सरकारप्रमुख म्हणून अखंड सेवा करण्याच्या आपल्या 25 वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करताना, देशातले तरुण हे नेहमीच आपल्या धोरणांच्या केंद्रस्थानी राहिले आहेत असे पंतप्रधानांनी सांगितले. चिन्मय अमृत महोत्सवाच्या युवा स्वयंसेवकांनी मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. या स्वयंसेवकांनी 300 दिवसांत 40,000 किलोमीटरचा प्रवास करून 1 लाखांहून अधिक तरुण नागरिकांशी संवाद साधला आहे. या उत्कृष्ट प्रयत्नासाठी मी संपूर्ण चमूचेही अभिनंदन करतो, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

‘वयम् अमृतस्य पुत्राः या उपनिषदातल्या वचनाचा उल्लेख करत पंतप्रधानांनी याविषयी उलगडून सांगितले. भारत हजारो वर्षांपासून आपल्या अमर चेतना आणि प्रज्ञेमुळे ज्ञान आणि प्रकाशाचा शोध घेणारा देश म्हणून चिरंतन वाटचाल करत आहे.  यातूनच स्वातंत्र्याच्या 75 व्या  वर्धापनदिनाला अमृतमहोत्सव म्हणण्याची प्रेरणा आपल्याला मिळाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. हा महोत्सव  विकसित भारत निर्माणासाठी प्रेरणामंच ठरण्याबरोबरच मानवतेच्या कल्याणाविषयी भारताच्या सहस्रावधी वर्षांपासूनच्या चिंतनशील परंपरेचे पुनरुज्जीवन करणारा ठरावा,अशी त्यामागील भूमिका होती.  अनेक आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थांनी यात सहभागी होऊन  पवित्र संकल्प घेतला.  चिन्मय मिशननेही ‘अमृत काळ' अभियानात सहभागी होऊन योगदान दिले. खऱ्या अर्थाने आपण ‘अमृतस्य पुत्राः’ असल्याचे यातून  सप्रमाण दिसून येते, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. 

‘वयम् राष्ट्रे जागृयाम पुरोहिताः’ अर्थात राष्ट्रहित इच्छिणारे आपण सदैव राष्ट्राला जागृत आणि प्रगतीपथावर ठेवू, असे आवाहन आपल्या वेदांमध्ये असून स्वामी चिन्मयानंद यांनी आध्यात्मिक विषयांइतक्याच ठामपणे राष्ट्रीय प्राधान्यांच्या मुद्द्यांवरही आपले विचार मांडले, असे पंतप्रधानांनी सांगितले. राष्ट्र हीच आपल्या संस्कृतीची जन्मभूमी आहे आणि आपल्या अस्तित्वाचा आधार असून आध्यात्मिक उन्नतीतून व्यक्ती  विकास आणि राष्ट्रीय प्रगतीला चालना मिळायला हवी, अशी शिकवण स्वामीजींनी दिली. राष्ट्रीय स्वाभिमानाची भावना जागृत करण्यासाठी स्वामीजींनी गीता ज्ञानयज्ञाची सुरुवात केली. उपनिषदे, वेदांत आणि शास्त्रांमधले ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा त्यामागील उद्देश होता. परिणामी आज चिन्मय मिशनचे लाखो युवा, भारतीय मूल्यांचे सांस्कृतिक राजदूत म्हणून कार्यरत आहेत. “पूज्य गुरुदेवांचे हे योगदान भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पुनर्जागरणातील एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केले. 

गुरुदेवांच्या जन्मशताब्दीनिमित्त 2015 मध्ये अनावरण करण्यात आलेल्या स्मृती नाण्याच्या अनावरणाची आठवण पंतप्रधानांनी व्यक्त केली. पंतप्रधानांनी स्वामीजींच्या जीवनाचे वर्णन 'ज्ञान, कर्म आणि भक्ती' यांचा अद्भुत  संगम असे केले. हे जीवन त्यांच्या गुरू, स्वामी शिवानंद यांनी दिलेल्या "जा, सिंहासारखी गर्जना कर" या आशीर्वादाची पूर्तता करणारे होते. स्वामीजींची आंतरिक शक्ती, ऐकणाऱ्यांच्या मनावर खोलवर ठसा उमटवत असे, तर त्यांचा 'आर्ट ऑफ मॅन मेकिंग'  हा रेडिओ कार्यक्रम असंख्य जीवनांना दिशा देणारा ठरला, असे पंतप्रधानांनी सांगितले. ''त्यांच्या आवाजातला आत्मविश्वास, आंतरिक शक्ती प्रत्येकाच्या हृदयावर त्यांच्या विचारांचा ठसा उमटवत असे,'' असे पंतप्रधान म्हणाले.

महान व्यक्तींचे कार्य त्यांच्या जीवनानंतरही टिकून राहते, असे सांगून चिन्मय मिशनच्या व्यापक शिक्षण कार्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. देशभरात 100 हून अधिक चिन्मय शैक्षणिक संस्था लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देत आहेत. ''या संस्थांमधून मुलांना आधुनिक शिक्षण मिळत आहे आणि मुले भारतीय मूल्येही आत्मसात करत आहेत,'' असे पंतप्रधानांनी नमूद केले. 

स्वातंत्र्यानंतर स्वामी चिन्मयानंद यांच्यासारख्या दूरदर्शी व्यक्तींनी मांडलेल्या विचारांनुरूप आम्ही कर्तव्य निभावत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. नवभारतासाठी शिक्षणाचे आधुनिकीकरण करण्याचे कर्तव्य देश सक्रियपणे निभावत आहे, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी त्यांनी सांगितले. या धोरणात, भारतीय ज्ञान परंपरा, मातृभाषेतून शिक्षण, आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मेळ घातला गेला आहे. ''नव्या शैक्षणिक धोरणात या सर्वांना महत्त्व दिले गेले आहे,''असे पंतप्रधानांनी सांगितले. 

भारतीय संस्कृतीचे चिरंतन जतन करण्यासाठी स्वामींजींनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले हे अधोरेखित करत पंतप्रधानांनी सांगितले की कन्याकुमारी येथे समुद्रात स्वामी विवेकानंदांचे पाषाणातील स्मारक उभारण्याच्या एकनाथजी रानडे यांच्या संकल्पाला गुरुदेवांनी ठाम पाठिंबा दिला आणि या प्रकल्पासाठी सर्वात पहिले आर्थिक योगदान देखील त्यांनी दिले. आता हे स्मारक जगातील लाखो लोकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरत आहे, असे ते म्हणाले. स्वामीजींच्या आयुष्यातील आणखी एक ध्येय म्हणजे भारतीय वारशाप्रती असलेला अभिमान आणि त्याचे जतन होय, असे पंतप्रधान म्हणाले.

देशभरात उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम अशा सर्व दिशांना पसरलेल्या व्यापक सांस्कृतिक पुनर्जागरणाचे सविस्तर वर्णन करताना पंतप्रधानांनी काशी विश्वनाथ धाम, अयोध्येतील श्री राम मंदिर, उज्जैन येथील महाकाल महालोक, केदारनाथ आणि बद्रीनाथ या मंदिरांचा पुनरुद्धार तसेच युनेस्को च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारतातील अनेक स्थळांचा समावेश याकडे लक्ष वेधले. पूर्वीच्या काळाच्या अगदी उलट ज्यावेळी भारतातील कलाकृतींची चोरी करुन त्यांची परदेशात राजरोसपणे विक्री केली जात असे त्या उलट गेल्या बारा वर्षांमध्ये त्या भारतीय कलाकृती मोठ्या प्रमाणात भारतात परत आणण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले. गेल्या 12 वर्षांत आम्ही अशा सहाशे पन्नासहून अधिक प्राचीन मूर्ती परत आणल्या आहेत," असे त्यांनी सांगितले.

स्वामीजींनी भारतीय तत्त्वज्ञान संपूर्ण जगभरात पोहोचवले त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय योगदिन आता जगाला भारताशी जोडत आहे यातील साम्य पंतप्रधानांनी अधोरेखित केले. देशाला आपला वारसा आणि वसाहतवादी मानसिकतेतून मिळालेली मुक्ती यांविषयी नव्याने जागृत झालेला स्वाभिमान हेच दाखवतो की भारत, प्राचीन संत आणि देशभक्तांनी दाखवलेल्या मार्गवरच पुढील वाटचाल करत आहे, असे ते म्हणाले. या प्रवासात त्यांचा बौद्धिक वारसा हीच देशाची सर्वात मोठी ताकद आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्या वारशाच्या अभिमानामुळे मिळालेला आत्मविश्वास आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतून मिळालेली मुक्ती हेच दर्शवतात की देश आता उज्ज्वल भविष्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

देशातील वेगवेगळ्या संघटना विविध उद्दिष्टांसाठी कार्य करत असल्या तरी सरतेशेवटी सर्वांचे अंतिम ध्येय एकच आहे आणि ते म्हणजे राष्ट्राचा विकास आणि सन्मान, असे ते म्हणाले. ज्याप्रमाणे स्वामी चिन्मयानंद यांनी त्यांच्या काळातील आव्हानांनुसार आपले ध्येय निश्चित केले त्याप्रमाणे आताच्या पिढीने देखील सामाजिक विकृती आणि आव्हाने लक्षात घेऊन त्यांच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.  विभाजनकारी शक्तींपासून समाजाचे रक्षण करणे, आत्मनिर्भरता वाढवणे आणि प्रत्येक नागरिकाला 2047 पर्यंत देशाला विकसित करण्याच्या ध्येयाशी जोडणे यासाठी सक्रिय प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे पंतप्रधान म्हणाले.  "आज आपल्याला समाजात फूट पाडणाऱ्या विभाजनकारी शक्तींविरुद्ध एकत्र यायचे आहे," असे पंतप्रधानांनी सांगितले.

वर्ष 2047 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीचे शताब्दी वर्ष आणि चिन्मय मिशन चे शताब्दी वर्ष हा एक ऐतिहासिक योगायोग जुळून येणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. हे दोन्ही प्रवास एकसमान उद्दिष्टांच्या दिशेने सुरु झाले असून त्यांनी एकमेकांच्या सोबतीने पुढे जायला हवे. मिशनच्या जागतिक स्तरावरील आचार्य, साधक आणि स्वयंसेवकांचा परिवार गुरुदेवांचा वारसा आणि अनेक दशकांचा अनुभव यांचा उपयोग करून विकसित भारताच्या निर्मितीत योगदान देईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. तसेच, आगामी सणानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. याचाच अर्थ चिन्मय मिशनचा शताब्दीपूर्तीचा प्रवास आणि विकसित भारताचा प्रवास दोन्ही एकत्रितपणे पुढे वाटचाल करतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

 

 

 

* * *

राधिका अघोर/निखिलेश चित्रे/सोनाली काकडे/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2327401) अभ्यागत कक्ष : 18