Posted On:
06 OCT 2026 1:03PM by PIB Mumbai
राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्या नेतृत्त्वाखालील भारताचे संसदीय शिष्टमंडळ टांझानिया मधील अरुषा येथे होत असलेल्या 153 व्या आंतर-संसदीय युनियन असेंब्ली मध्ये सहभागी झाले आहे. या असेंब्लीच्या उदघाटनप्रसंगी, पाच ऑक्टोबर रोजी शिष्टमंडळाच्या सदस्यांनी विविध बैठका आणि इतर उपक्रमांमध्ये भाग घेतला.
लोकसभेचे खासदार आणि आंतर-संसदीय युनियनच्या आरोग्य समितीचे सदस्य डॉ. संजय जयस्वाल यांनी या समितीच्या विविध सत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
याशिवाय राज्यसभेचे उपसभापती आणि शिष्टमंडळाचे सदस्य आशिया प्रशांत भूराजकीय गटाच्या बैठकांमध्ये सहभागी झाले. या बैठकीदरम्यान, लोकसभेतील खासदार आणि आंतर-संसदीय युनियनच्या कार्यकारी समितीच्या सदस्य अपराजिता सरनागी यांनी कार्यकारी समितीने अलीकडेच हाती घेतलेले उपक्रम आणि विविध कार्यक्रमांविषयी गटातील सदस्यांना माहिती दिली.
याशिवाय महिला संसदपटुंच्या मंचाने देखील एका सत्राचे आयोजन केले होते. यावेळी लोकसभेच्या खासदार कमलजीत सेहरावत यांनी "सर्वांसाठी सर्वसमावेशक सामाजिक विकास: दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण आणि त्यांच्या हक्कांना चालना देण्याच्या दृष्टीने संसदीय धोरणे" या विषयीच्या वादविवाद सत्रात सहभाग घेतला आणि यासंदर्भातील भारताचा दृष्टिकोन विशद केला. लोकसभेच्या खासदार बिजुली कलिता मेधी यांनी 'महिला नेतृत्व' या विषयावरील मंचाच्या दुसऱ्या सत्रात सहभाग घेतला.

राज्यसभेचे खासदार डॉ. सस्मित पात्रा 'आशियाई संसदीय असेंब्ली'च्या बैठकीला उपस्थित होते.
लोकसभेच्या खासदार आणि आंतर संसदीय युनिअनच्या, दहशतवाद आणि हिंसक कट्टरतावाद विरोधी उच्चस्तरीय सल्लागार समितीच्या सदस्य लता वानखेडे यांनी या गटाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सहभाग घेतला.
राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांच्या नेतृत्त्वाखालील भारताच्या संसदीय शिष्टमंडळाने खालील मान्यवरांशी द्विपक्षीय बैठकीदरम्यान संवाद साधला आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.
1. मिल्टन डिक, अध्यक्ष, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज, ऑस्ट्रेलिया
2. मुसा अझान झुंगू, अध्यक्ष, युनायटेड रिपब्लिक ऑफ टांझानियाची संसद
टांझानियाच्या संसदेने देखील 153 व्या आंतर-संसदीय युनियन असेम्ब्लीसाठी एक औपचारिक उदघाटन समारंभ आयोजित केला होता. या समारंभात टांझानियाच्या संयुक्त प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्ष डॉ. सामिया सुलुहू हसन यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि 153 व्या अधिवेशनाचे उद्घाटन केले.

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश आणि खासदार अपराजिता सारंगी, अनुराग सिंग ठाकूर, एन.के. प्रेमचंद्रन आणि डॉ. सस्मित पात्रा यांनी उद्घाटन समारंभाला उपस्थिती लावली; तसेच टांझानियाच्या परराष्ट्र मंत्र्यांसह विविध मंत्र्यांशी संवाद साधला.
***
NehaKulkarni / Bhakti Sontakke / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai