गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातमधल्या एकतानगर येथे राष्ट्रीय एकता दिन 2026 आणि भारत पर्व 2026 साजरे होणार, केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांची नवी दिल्लीत पत्रकार परिषद

31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या सोहळ्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करून होणार

एकता परेडचे संचलन म्हणजे देशातल्या सशस्त्र नक्षलवादाच्या अंताची घोषणा

देशातल्या 126 जिल्ह्यांमधले सुमारे 2,000 कलाकार ‘नक्षलमुक्त भारत’ या विषयावर राष्ट्रीय नाट्य विद्यालयातर्फे सादर होणाऱ्या नाट्यप्रयोगात सहभागी होणार

एकतानगरमधल्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्ररथांचा विषय ‘वंदे मातरम्’

Posted On: 21 OCT 2026 8:17PM by PIB Mumbai

केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी गुजरातमधल्या एकतानगर येथे होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिन 2026 आणि भारत पर्व 2026 या सोहळ्यांच्या संदर्भात आज नवी दिल्ली इथे पत्रकार परिषदेला संबोधित केले.

यंदाची एकता परेड अधिक उत्साही, वैविध्यपूर्ण आणि आकर्षक असेल, असे केंद्रिय गृह सचिवांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले. मुख्य कार्यक्रमाला 31 ऑक्टोबर 2026 रोजी सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ इथे सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करतील. संध्याकाळी एकता परेड आयोजित करण्यात येईल. 2026 मध्ये भारताला सशस्त्र नक्षलवादापासून मुक्त करण्यात मिळालेले मोठे यश या परेडमध्ये अधोरेखित केले जाईल, अशी माहिती गोविंद मोहन यांनी दिली.

एकतानगर येथे राष्ट्रीय एकता दिनाचा सोहळा आयोजित करताना दोन प्रमुख उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवण्यात आली आहेत. देशातील पोलीस दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दले आणि केंद्रीय पोलीस संघटना करत असलेल्या असामान्य कार्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधणे, हे त्यातले पहिले उद्दिष्ट आहे, असे गोविंद मोहन यांनी सांगितले.

देशाच्या सर्व भागांमधल्या नागरिकांना एकतानगरच्या परिसरातली स्थानिक वैशिष्ट्ये पाहण्याची आणि त्यांचा आनंद घेण्याची संधी देणे, तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या, जगातील सर्वांत उंच पुतळ्याचे दर्शन घडवणे, हे दुसरे उद्दिष्ट आहे.

एकतानगरच्या परिसरात पर्यटकांसाठी अनेक आकर्षणे निर्माण करण्यात आली आहेत. त्यामुळे एकतानगर हे आता देशातले प्रमुख आणि सर्वाधिक आकर्षक पर्यटनस्थळांपैकी एक म्हणून उदयाला आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय गृहसचिव म्हणाले की, एकता दिवस संचलनादरम्यान आपण देशातील सशस्त्र नक्षलवादाचा  अंत झाल्याबद्दल  उत्सव साजरा करणार आहोत. त्यांनी सांगितले की, हे तीन वेगवेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणांच्या माध्यमातून केले जाईल:

1.   या वर्षीच्या संचलन पथकांमध्ये, नक्षलवादाविरोधात देशाच्या लढ्यात आघाडीवर राहिलेली  राज्य पोलीस दले आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दले (सीएपीएफ) यांचा समावेश असेल. 31 ऑक्टोबर 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरून जेव्हा प्रत्येक तुकडी संचलन करत पुढे जाईल, त्यावेळी अनेक एलईडी स्क्रीनवर एक लघुपट दाखवला जाईल, यात त्यांच्या असाधारण कामगिरीच्या ठळक वैशिष्ट्यांचा आढावा दाखवला जाईल.

2.   देशात  एकेकाळी सशस्त्र नक्षलवादाचा उपद्रव सहन केलेल्या  126 जिल्ह्यांमधील सुमारे 2,000 कलाकारांसह राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी) सादरीकरण करेल. हे कलाकार, त्यांच्या सादरीकरणातून, सशस्त्र नक्षलवाद फोफावला असताना त्यांचे जीवित आणि मालमत्ता धोक्यात आली होती, त्या वेळच्या त्यांच्या संघर्षाचे दर्शन घडवतील.

3.   या 126 जिल्ह्यांमधील सुमारे 5 हजार लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. हे सर्वजण विविध सादरीकरणांचे प्रेक्षक असतील. ते आपल्या संवादातून, सशस्त्र नक्षलवादाच्या काळातील आपले अनुभवही सांगतील.

गोविंद मोहन म्हणाले की, 'राष्ट्रीय एकता दिवस' सोहळ्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांची आणखी एक  संकल्पना 'वंदे मातरम्' ही आहे. ते म्हणाले की, वंदे मातरमचे हे 150 वे वर्ष आहे आणि या वर्षी संचलनात नव्याने समाविष्ट करण्यात आलेली अनेक वैशिष्ट्ये ‘वंदे मातरम्' या संकल्पनेवर आधारित आहेत.

ते म्हणाले की, यावर्षीच्या उत्सवाचे आणखी एक नवीन वैशिष्ट्य म्हणजे संचलन आणि सर्व सादरीकरणे संध्याकाळच्या वेळी आयोजित केली जातील.

यावेळी, MyGov प्लॅटफॉर्मद्वारे राष्ट्रीय स्तरावर तसेच गुजरातच्या प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धांच्या माध्यमातून, चित्ररथासाठी डिझाइन आणि वैशिष्ट्ये मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गोविंद मोहन यांनी सांगितले की, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमधून प्राप्त झालेल्या सर्व संकल्पना आणि डिझाईन्स एकत्र करून या डिझाईन्सवर आधारित एकूण 15 चित्ररथ तयार केले जातील. ही डिझाईन्स पूर्णपणे जनतेद्वारे तयार केली जातील, यात कोणत्याही सरकारी मंत्रालयाचा अथवा विभागाचा सहभाग नसेल.

एकता नगरमध्ये प्रथमच जनतेचा चित्ररथ पाहायला मिळणार आहे.

गोविंद मोहन यांनी सांगितले की, गेल्या वर्षापासून आम्ही राष्ट्रीय नाट्य विद्यालयाद्वारे आयोजित एक भव्य नाटक सादर करत आहोत. यंदा 'वंदे मातरम्'चे वर्ष असल्यामुळे, यावर्षीची संकल्पना 'आनंदमठ' ही असेल. ही बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांची युगप्रवर्तक कादंबरी आहे.

***

Nilima Chitale / Nikhilesh Chitre / Madhuri Pange / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2326329) अभ्यागत कक्ष : 5