कृषी मंत्रालय
सरकार आता मोबाईलवर सतत उपलब्ध असणार : शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांसाठी नवीन पोर्टलचा केला प्रारंभ
शेतकऱ्यांना मोबाईल फोनवर सर्व कृषी योजनांची मिळणार माहिती : शिवराज सिंह चौहान
शेतकऱ्यांना कार्यालयांमध्ये न जाता थेट सरकारी मदतीचा लाभ मिळणार : शिवराज सिंह चौहान
Posted On:
19 OCT 2026 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'डिजिटल इंडिया'च्या संकल्पनेला आणि शेतकरी कल्याणाच्या वचनबद्धतेला अनुसरून, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज अद्ययावत 'कृषी कल्याण वेल्फेअर पोर्टल'चे औपचारिक उद्घाटन केले. मध्यस्थांची भूमिका आणि तांत्रिक अडचणी दूर करून, देशातील शेतकऱ्यांना थेट त्यांच्या मोबाईल फोनवर सरकारी योजना, आर्थिक मदत आणि विश्वासार्ह कृषी माहिती सहज उपलब्ध करून देणे हा या पोर्टलचा उद्देश आहे.

आपले सरकार मोबाईल फोनच्या माध्यमातून नागरिक आणि शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी सहज उपलब्ध असावे, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्पष्ट दृष्टीकोन आहे, असे ते या उद्घाटन कार्यक्रमात म्हणाले. ज्यावेळी तंत्रज्ञान शेतापर्यंत आणि ग्रामीण समुदायांपर्यंत पोहोचेल आणि शेतकऱ्यांचे जीवन अधिक सुकर करेल, त्याचवेळी तंत्रज्ञानाचा खरा उद्देश पूर्ण होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. या अद्ययावत पोर्टलमुळे, शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती मिळवण्यासाठी किंवा अर्ज सादर करण्यासाठी यापुढे अनेक सरकारी कार्यालयांना किंवा वेगवेगळ्या संकेतस्थळांना भेट देण्याची गरज भासणार नाही. हे व्यासपीठ शेतकरी उत्पादक संघटना, प्राथमिक कृषी पतसंस्था, कृषी शास्त्रज्ञ, संशोधक आणि स्टार्टअप्स यांना एकत्रित आणेल, ज्यामुळे व्यापक कृषी परिसंस्थेसाठी एक सामायिक डिजिटल व्यासपीठ तयार होईल. विश्वासार्ह माहितीच्या महत्त्वावर भर देत, चौहान यांनी अधिकाऱ्यांना हे पोर्टल अचूक आणि नियमितपणे अद्ययावत राहील याची खात्री करण्याचे निर्देश दिले. जुनी किंवा अपूर्ण माहिती व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी करू शकते, ज्यामुळे याचे यश सातत्याने माहिती अद्ययावत ठेवण्यावरच अवलंबून आहे, असे ते म्हणाले. मर्यादित औपचारिक शिक्षण असलेल्या अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या मंचाचे योग्य प्रकारे आकलन होणे आणि सहज वापरणे शक्य व्हावे, यासाठी भाषा आणि प्रक्रिया अत्यंत सोपी असणे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला.
शेतकऱ्यांना या पोर्टल सह अन्य डिजिटल उपकरणांचा कार्यक्षम पद्धतीने वापर करता यावा, यासाठी देशभरातील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये एक विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाईल.
विशिष्ट कालमर्यादेत हे अद्ययावत पोर्टल विकसित केल्याबद्दल चौहान यांनी तांत्रिक टीमच्या सर्व सदस्यांचे कौतुक केले. या पोर्टलच्या माध्यमातून एक असे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे ज्यामुळे केंद्र सरकारच्या पी एम किसान, ऍग्री स्टॅक आणि प्रधान मंत्री पीक विमा योजना यांसारख्या सर्व प्रमुख उपक्रमांसाठी एकल खिडकी उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांना एकाच माध्यमाद्वारे संबंधित सेवा आणि माहिती मिळवणे सोपे होईल.

ऍग्री कल्याण पोर्टलचे प्रमुख लाभ
सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध: मंत्रालयाच्या सर्व योजनांविषयीची माहिती, अनुदान, नियम आणि डिजिटल सेवा या सर्व गोष्टी एकाच पोर्टल वर उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांचा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर माहिती शोधण्यात लागणारा वेळ आणि श्रम कमी होतील.
अधिक पारदर्शकता आणि कमी हस्तक्षेप: ऑनलाईन पात्रता तपासणी, थेट अर्ज सुविधा आणि थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे आर्थिक लाभाचे वितरण यांमुळे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक झाली असून मध्यस्थांची भूमिका नगण्य झाली आहे.
ग्रामीण कनेक्टिव्हिटी लक्षात घेऊन केलेली रचना: ग्रामीण भागातील वापरकर्त्यांचा विचार करुन हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. हे पोर्टल हलके, वापरण्यास सोपे आणि वापरकर्ता-अनुकूल आहे. त्यामुळे सामान्य स्मार्टफोनवर तसेच इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमी असलेल्या भागांमध्येही ते सहजपणे वापरता येते.
वेळेत दिली जाणारी विश्वासार्ह कृषीविषयक माहिती: शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, शास्त्रीय कृषी पद्धती, बियाणे आणि खतांची उपलब्धता आणि कृषी उत्पादनांचे बाजारातील प्रचलित दर याबाबत अचूक आणि विश्वासार्ह माहिती मिळू शकेल.

दिव्यांग व्यक्तींसाठी देखील हे पोर्टल सुलभ आहे: हे पोर्टल केंद्र सरकारच्या आधुनिक सुलभता मानकांनुसार विकसित केले आहे. या पोर्टलमध्ये स्क्रीन रीडरची सुविधा उपलब्ध आहे, तसेच, या पोर्टलवरील विविध पर्याय आणि सेवांपर्यंत सहज पोहोचता येते. त्यामुळे दृष्टिदोष असलेल्या व्यक्तींना तसेच इतर दिव्यांग व्यक्तींना पोर्टलवरील सेवा अधिक सहजपणे आणि सुलभतेने वापरता येतात.
* * *
सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2325260)
अभ्यागत कक्ष : 6