युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून 'राष्ट्रीय क्रीडा महासंघांना सहाय्य देण्याच्या सुधारित योजने'साठी परिचालन मार्गदर्शक तत्त्वे जारी


भारताचे दीर्घकालीन क्रीडा व्हिजन, तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 आणि 2036 मधील ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदाच्या दाव्यासाठी नवीन धोरणात्मक घटकांचा समावेश यात आहे

Posted On: 16 OCT 2026 7:24PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 ऑक्‍टोबर 2026

 

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 'राष्ट्रीय क्रीडा महासंघांना सहाय्य देण्याच्या सुधारित योजने'साठी परिचालन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये योजनेच्या विविध घटकांसाठी सहाय्य देण्याचे सुधारित निकष समाविष्ट आहेत. सरकारने 2026-27 ते 2030-31 या कालावधीसाठी (16 व्या वित्त आयोगाचे चक्र) 7,386.74  कोटी रुपयांच्या एकूण खर्चासह  ही योजना सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे.

ही योजना ऑलिम्पिक स्पर्धा, आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, पॅरालिम्पिक स्पर्धा आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धा यांसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीसाठी भारताच्या खेळाडूंना सहाय्य पुरवणारी  प्रमुख यंत्रणा आहे.

ही योजना राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन, अकादमींमधील प्रशिक्षण आणि खेळाडूंसाठी निवास, भोजन व्यवस्था, क्रीडा साहित्य, विमा आणि क्रीडा विज्ञान सेवा यांसारखे सहाय्य, परदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती, निपुण संचालक आणि फिजिओथेरपिस्ट, क्रीडा शास्त्रज्ञ व डॉक्टर यांसारखे सहाय्यक कर्मचारी, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण आणि स्पर्धांच्या माध्यमातून परदेशातील अनुभव, वरिष्ठ, कनिष्ठ आणि उप-कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन, तळागाळातील आणि कनिष्ठ पातळीवरील खेळाडूंचा विकास आणि राष्ट्रीय क्रीडा संघटनांना  प्रशासकीय व शासनविषयक मदतीसाठी सहाय्य पुरवते.

सुधारित योजनेत अनेक नवीन धोरणात्मक घटकांचा समावेश करण्यात आला आहे, जे भारताच्या दीर्घकालीन क्रीडाविषयक दृष्टिकोनाशी आणि 2036 च्या ऑलिम्पिक यजमानपदाच्या दाव्यासाठी तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 च्या तयारीशी सुसंगत आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी मिळणाऱ्या सहाय्य रकमेत वाढ: सुधारित योजनेअंतर्गत, भारतात आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. आता, एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे स्वरूप, तिचे महत्त्व, तसेच त्यात सहभागी होणारे देश आणि खेळाडूंची संख्या लक्षात घेऊन, राष्ट्रीय क्रीडा महासंघांना  50 कोटी रुपयांपर्यंत  आर्थिक सहाय्य दिले जाऊ शकते. राष्ट्रीय क्रीडा महासंघांकडून प्राप्त प्रस्तावांचे मूल्यांकन क्रीडा सचिवांच्या  अध्यक्षतेखालील एका विशेष समितीद्वारे केले जाईल.

ऑलिम्पिक प्रशिक्षण केंद्रांमध्ये  प्रशिक्षण: सध्या, ऑलिम्पिकसह विविध मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांची तयारी करणाऱ्या खेळाडूंना 'राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र (NCOEs), विविध अकादमी, खाजगी क्रीडा सुविधा आणि परदेशातील प्रशिक्षण सुविधांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. उच्च दर्जाचे विशेष प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी, अत्याधुनिक क्रीडा विज्ञान उपकरणांनी सज्ज अशी 'ऑलिम्पिक प्रशिक्षण केंद्रे'  उभारण्याचे नियोजन आहे. ही केंद्रे विशिष्ट खेळासाठी समर्पित असतील आणि तिथे सर्वोत्तम आधुनिक प्रशिक्षण सुविधा व तज्ज्ञ उपलब्ध असतील. यामुळे भारतीय खेळाडूंचे परदेशातील प्रशिक्षणावरील अवलंबित्व कमी होईल. या ऑलिम्पिक प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या भारताच्या सर्वोत्तम  खेळाडूंना प्रशिक्षक, तांत्रिक कर्मचारी, क्रीडा विज्ञान सेवा, तसेच विशेष उपकरणे आणि तांत्रिक सहाय्य पुरवले जाईल.

राष्ट्रीय क्रीडास्पर्धांसाठी मदत – राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे महत्त्व आणि त्यांचे मोठ्या प्रमाणात व पद्धतशीर आयोजन होण्याची गरज लक्षात घेऊन सुधारित योजनेत यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी आवश्यक क्रीडा साहित्य, वेळापत्रक, गुण व निकाल (टीएसआर), सेवा, तांत्रिक अधिकाऱ्यांचे वेतन आणि तंत्रज्ञान सहाय यासाठी वापरला जाईल.

देशी खेळांना जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी एनएसएफला मदत – देशी खेळांना जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी एनएसएफच्या प्रयत्नांसाठी सुधारित योजनेत एक घटक समाविष्ट करण्यात आला आहे. ऑलिम्पिक्स, आशियाई क्रीडा स्पर्धा किंवा राष्ट्रकुल स्पर्धा यासारख्या जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये देशी खेळांचा प्रदर्शनीय खेळ म्हणून समावेश करण्याच्या एनएसएफच्या प्रयत्नांना बळ देणे, जगभरातील अन्य देशांमध्ये राष्ट्रीय महामंडळे स्थापन करणे, देशी खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघटनांना त्यांची कार्यालये भारतात सुरू करण्यासाठी आवश्यक सहायता पुरवणे इत्यादी कामांसाठी हा निधी उपयोगात आणला जाईल.   

ग्लोबल साऊथ देशांसोबत आंतरराष्ट्रीय क्रीडा महामंडळ उपक्रम – भारतात साई सेंटर्स व अन्य क्रीडा केंद्रांमध्येही उच्च कार्यक्षमता व प्रशिक्षण सुविधा आहेत. या संस्था खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे प्रशिक्षण यासाठी शिष्यवृत्ती व सवलतीच्या दरात सुविधांचा लाभ देऊन ग्लोबल साऊथ देशांमध्ये आघाडीचा भागीदार म्हणून भारताला स्थान मिळवून देऊ शकतात. आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी सहाय्य पुरवण्याची तरतूद या सुधारित योजनेत समाविष्ट करण्यात आली आहे.

ब्रिक्स, बिमस्टेक यासारख्या बहुदेशीय संस्थांनी आयोजित केलेल्या  क्रीडा स्पर्धांना मदत – या सुधारित योजनेअंतर्गत ब्रिक्स, बिमस्टेक किंवा यासारख्या अन्य बहुदेशीय संघटनांना क्रीडा स्पर्धा, क्रीडाविषयक परिसंवाद, बैठका, संशोधन, कार्यशाळा आयोजित करण्यासाठी आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे.

मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय/आंतरखंडीय संस्थांना भारतात त्यांची कार्यालये सुरू करण्यासाठी सहाय्य – मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय / आंतरखंडीय संस्थांना भारतात मदत करण्यासाठी सुधारित योजनेमध्ये एनएसएफ / एनओसी यांना निधीचा काही भाग उपयोगात आणता येईल. यातून क्रीडा सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीच्या शिफारसींनुसार प्रत्येक प्रकरणानुसार आवश्यक मदत देता येईल.  

अधिक तपशील जाणून घेण्यासाठी कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्या: 

https://sports.yas.gov.in/public-file/guidelines/guidelines_20261016161054_21f5fbfc9465.pdf

 

* * *

निलिमा चितळे/सुषमा काणे/सुरेखा जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2324535) अभ्यागत कक्ष : 12