संरक्षण मंत्रालय
भारत आणि मंगोलिया यांच्यातल्या 14 व्या संयुक्त कार्यगट बैठकीत संरक्षण सहकार्य बळकट करण्यावर भर
Posted On:
16 OCT 2026 6:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2026
भारत आणि मंगोलियाच्या संरक्षण मंत्रालयांमधली चौदावी संयुक्त कार्यगट बैठक 16 ऑक्टोबर 2026 रोजी उलानबातर इथे झाली. या बैठकीत दोन्ही देशांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्याचा सविस्तर आढावा घेतला. विद्यमान उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेऊन परस्पर सहमतीने निश्चित केलेल्या क्षेत्रांमध्ये सहकार्याचा विस्तार करण्याबाबत या प्रसंगी चर्चा करण्यात आली. सातत्यपूर्ण संवादाच्या माध्यमातून दीर्घकालीन भागीदारी अधिक बळकट करण्याची कटिबद्धता दोन्ही देशांनी पुन्हा व्यक्त केली. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींविषयीही त्यांनी आपापली मते मांडली.
_20261016164246_1e022b.jpeg)
भारत आणि मंगोलिया यांच्यातल्या संरक्षण सहकार्याचे दर्शन घडवणारा ‘नोमॅडिक एलिफंट’ हा संयुक्त लष्करी सराव यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केले. मंगोलियाच्या सशस्त्र दलांमधल्या कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी भारताकडून मिळत असलेल्या सातत्यपूर्ण सहकार्याची मंगोलियाने प्रशंसा केली.
भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव डॉ. इशिता गांगुली त्रिपाठी आणि मंगोलियाचे संरक्षण उपराज्य सचिव ब्रिगेडियर जनरल गान्सुख ई. यांनी या बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवले.
डॉ. इशिता गांगुली त्रिपाठी यांनी मंगोलियाच्या सशस्त्र दलांच्या सर्वसाधारण कर्मचारी विभागाचे उपप्रमुख मेजर जनरल उशुखबायर जे. यांचीही भेट घेतली. या भेटीत दोन्ही देशांच्या संरक्षण दलांमधल्या सहकार्याच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. संरक्षण संबंध अधिक दृढ करणे, परस्पर सहकार्य वाढवणे आणि भारत-मंगोलिया धोरणात्मक भागीदारीसाठी भविष्यातले कृती कार्यक्रम निश्चित करणे, याबाबत यावेळी चर्चा झाली.
_20261016164257_6590bd.jpeg)
भारतीय शिष्टमंडळाने मंगोलियाच्या राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठालाही भेट दिली. भारताच्या मदतीने स्थापन करण्यात आलेल्या सायबर सुरक्षा प्रशिक्षण केंद्राच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. भाषा प्रशिक्षण आणि सायबर सुरक्षा क्षेत्रांत भारताकडून मिळत असलेल्या सातत्यपूर्ण सहकार्याची मंगोलियाने प्रशंसा केली. क्षमता विकास, ज्ञानाची देवाणघेवाण आणि संरक्षण क्षेत्रातले अधिक दृढ सहकार्य यांमुळे दोन्ही देशांमधल्या धोरणात्मक भागीदारीला बळ मिळत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
भारत आणि मंगोलिया यांच्यात ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सभ्यताविषयक दीर्घकालीन संबंध आहेत. या संबंधांमुळे दोन्ही देशांच्या समकालीन भागीदारीचा भक्कम पाया तयार झाला आहे. या भेटीत समान श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा यांची दोन्ही देशांना जवळ आणण्यात महत्त्वाची भूमिका असल्याचेही अधोरेखित झाले.
* * *
राधिका अघोर/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2324499)
अभ्यागत कक्ष : 8