संरक्षण मंत्रालय
ऑपरेशन सिंदूर, बालाकोट एअरस्ट्राइक आणि सर्जिकल स्ट्राइक या कारवाया म्हणजे दहशतवादी हल्ल्यांचा केवळ राजनैतिक निषेध करून गप्प राहण्याऐवजी, दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याच्या भारताच्या बदलत्या मानसिकतेचे प्रतीक: संरक्षण मंत्री
“पाकिस्तानने कोणताही दहशतवादी हल्ला केला तर यापेक्षा जास्त मोठे प्रत्युत्तर मिळेल”- राजनाथ सिंह
“भारताच्या शांततेशी असलेल्या वचनबद्धतेला कोणी दुबळेपणा समजण्याची चूक करू नये; देशाचे सार्वभौमत्व, एकात्मता आणि राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी आम्ही पुरेपूर सज्ज आहोत”
“तथाकथित पांढरपेशा लोकांकडून होणारा दहशतवाद आणि लोन वुल्फ अटॅक्स यांसारख्या नव्याने निर्माण होणाऱ्या धोक्यांचा संरक्षणमंत्र्यांनी दिला इशारा, अधिक दक्ष राहण्याचे केले आवाहन.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रगत शस्त्रास्त्रे, एआय आणि किफायतशीर संरक्षण तंत्रज्ञानाचा मेळ घालणाऱ्या ‘स्मार्ट पॉवर’ दृष्टिकोनाचा अंगिकार करण्याचे केले आवाहन
Posted On:
15 OCT 2026 4:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2026
ऑपरेशन सिंदूर, बालाकोट एअरस्ट्राइक आणि सर्जिकल स्ट्राइक या केवळ लष्करी कारवाया नव्हत्या; तर दहशतवादी हल्ल्यांचा केवळ राजनैतिक म्हणजेच शाब्दिक निषेध करून गप्प राहण्याऐवजी, दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने त्याच्या स्रोतांनाच नष्ट करण्यासाठी निर्णायक पाऊल उचलण्याच्या भारताच्या बदलत्या मानसिकतेचे ते प्रतीक आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. ते आज 15 ऑक्टोबर 2026 रोजी नवी दिल्लीइथे आयोजित ‘ संरक्षण परिषदेत बोलत होते. सीमापार दहशतवादाबाबत भारताची भूमिका पुन्हा स्पष्ट करताना ते म्हणाले की, पाकिस्तानमधून यापुढच्या काळात कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर यापेक्षाही अधिक कठोर आणि चोख प्रत्युत्तर दिले जाईल. भारताच्या सांस्कृतिक मूल्यांमध्ये संवाद, सहअस्तित्व आणि विवादांचे शांततापूर्ण निवारण यांना प्राधान्य दिले जात असले, तरी भारताच्या शांततेविषयीच्या वचनबद्धतेला कोणी दुबळेपणा समजण्याची चूक करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. 2014 पासून बहुतांश दहशतवाद्यांचे आयुष्य एक वर्षापेक्षा कमी झाले असून, भारताच्या विरोधात शस्त्रे हातात घेतल्यानंतर वर्षभरात सुरक्षा दलांनी त्यांना ठार केले आहे.
शांतता कायम ठेवण्यासाठी, ताकद आणि क्षमता आवश्यक असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले आणि भारत शांततेची आशा बाळगत असला तरीही, राष्ट्राच्या रक्षणासाठी वेळप्रसंगी आवश्यक असणाऱ्या युद्धासाठीही सज्ज राहत असल्याचे अधोरेखित केले. आमचे ध्येय एका अशा भारताची निर्मिती करण्याचे आहे, जो शांततेचा पुरस्कार करत असतानाच सुरक्षेच्या बाबतीत दक्ष राहील आणि आपले सार्वभौमत्व, अखंडता आणि राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे सक्षम असेल,” असे ते म्हणाले.
_20261015130948_0b32ed.jpeg)
बदलत्या सुरक्षा परिदृश्याबाबत बोलताना, राजनाथ सिंह यांनी हायब्रिड, हाय-टेक आणि हायपर युद्धाच्या युगात वाढती दक्षता आणि सज्जता राखण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी डिजिटल युगातील सुरक्षा धोक्यांची वाढती जटिलता अधोरेखित केली आणि त्यांनी याचे वर्णन ‘5D सुरक्षा धोके’ म्हणजे चुकीच्या माहितीचा प्रसार , अस्थिरता निर्माण करणे , विस्कळीत करणे, फसवणूक आणि विनाश असे केले. दहशतवाद आता केवळ संघटित गटांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्यात 'लोन-वुल्फ' (lone-wolf) , म्हणजेच एकट्याने केलेले हल्ले आणि 'तथाकथित पांढरपेशा लोकांकडून दहशतवाद' (white-collar terrorism) यांसारख्या उदयोन्मुख धोक्यांचा समावेश आहे, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांना मूलतत्त्ववादी व्यक्तींची ओळख पटवणे आणि संभाव्य हल्ले रोखणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
संरक्षणमंत्र्यांनी, प्रवासी विमान पाडण्याचा कथित प्रयत्न करणाऱ्या एका सह-वैमानिकाचा आणि एक मोठा दहशतवादी हल्ला टाळण्यासाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांच्या अलीकडील घटनेचा उल्लेख केला. या घटनेने एकट्याने हल्ला करणाऱ्यांकडून म्हणजेच लोन-वुल्फ यांच्याकडून निर्माण होणारा धोका अधोरेखित केला, तसेच एका व्यक्तीचे धैर्य आणि वचनबद्धता द्वेषाने प्रेरित लोकांचे मनसुबे कसे हाणून पाडू शकते हे दाखवून दिले. एक सतर्क आणि धाडसी व्यक्ती संपूर्ण दहशतवादी कट उधळून लावण्यास मदत करू शकते. दहशतवादाविरुद्धच्या लढ्यासाठी केवळ सुरक्षा यंत्रणांची क्षमताच नव्हे, तर जागरूक आणि जबाबदार नागरिकांचा सक्रिय सहभागही आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
_20261015130958_d93401.jpeg)
संरक्षण सज्जतेवर बोलताना, राजनाथ सिंह यांनी हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर यांचा मेळ घालण्याच्या आवश्यकतेवर भर दिला आणि स्मार्ट पॉवरकडे वळण्याचे आवाहन केले. “विकसित होत असलेल्या सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी आधुनिक संरक्षण धोरणांनी किफायतशीर शस्त्रास्त्रांसोबत अचूक-मार्गदर्शित शस्त्रे आणि हवेत तरंगणारी शस्त्रे, कृत्रिम बुद्धिमत्तेसोबत मानवी बुद्धिमत्ता आणि कमी किमतीच्या, चपळ व जुळवून घेणाऱ्या तंत्रज्ञानासोबत प्रगत प्रणाली यांचा समन्वय साधला पाहिजे, असे ते म्हणाले.
संरक्षण मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सुधारणा, कार्यपद्धतीतील बदल आणि बदललेल्या मानसिकतेमुळे भारताचा आपल्या संरक्षण क्षमतेवरील आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, गेल्या साडेबारा वर्षांत सरकारने तात्काळ संरक्षण गरजा पूर्ण करण्याऐवजी आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज अशी परिपूर्ण संरक्षण व्यवस्था उभारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. परवाना नियमांमधील सुधारणा आणि व्यवसाय सुलभता सुधारण्याच्या उपायांमुळे देशाचा संरक्षण उत्पादन आधार विस्तारण्यास मदत झाली आहे, ज्यामुळे आता या क्षेत्रात 500 हून अधिक कंपन्या कार्यरत आहेत आणि शेकडो नवीन औद्योगिक परवाने जारी करण्यात आले आहेत, हे ही त्यांनी अधोरेखित केले.
_20261015131008_44729c.jpeg)
संरक्षण खरेदीतील सुधारणांवर बोलताना, राजनाथ सिंह म्हणाले की, संरक्षण खरेदी प्रक्रिया आणि भारतात तयार केलेल्या, विकसित आणि उत्पादित वस्तू खरेदी करा यांसारख्या उपायांद्वारे संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणासाठी देशांतर्गत उद्योगांना प्राधान्य दिले जात आहे. आधुनिकीकरणाच्या अर्थसंकल्पातील 75 टक्के रक्कम भारतीय उद्योगांकडून खरेदीसाठी राखून ठेवण्यात आली आहे. तसेच, या सुधारणांमुळे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांमधील सहकार्य अधिक मजबूत झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. देश संपूर्ण शासन दृष्टिकोनाकडून संपूर्ण देश दृष्टिकोनाकडे आणि हळूहळू संपूर्ण लोक दृष्टिकोनाकडे वाटचाल करत आहे, ज्यामध्ये राष्ट्र प्रथम या भावनेअंतर्गत स्टार्ट-अप्स, एमएसएमई, वैयक्तिक नवोन्मेषक आणि मोठ्या कंपन्या राष्ट्रीय संरक्षणात योगदान देत आहेत, असे ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या वाढत्या तांत्रिक क्षमतांचे, त्याचबरोबर आकाश क्षेपणास्त्र प्रणाली आणि ब्रह्मोस यांसारख्या अत्याधुनिक उपकरणांसह प्रगत स्वदेशी प्रणालींवरील संरक्षण दलांच्या विश्वासाचे प्रतिबिंब होते, असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. या मोहिमेचे यश हे भारताच्या देशांतर्गत संरक्षण उद्योगावरील आणि राष्ट्रीय सुरक्षेतील त्याच्या योगदानावरील वाढत्या विश्वासाचे प्रतीक आहे, असेही त्यांनी सांगितले. “सशस्त्र दलांनी संरक्षण उपकरणे, शस्त्रप्रणाली आणि विविध प्लॅटफॉर्मसह 509 वस्तूंचा समावेश असलेल्या स्वदेशीकरणाच्या पाच सकारात्मक याद्या प्रसिद्ध केल्या असून, सहावी यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्याचप्रमाणे, संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी (डीपीएसयू) लाइन रिप्लेसमेंट युनिट्स, उप-प्रणाली, सुटे भाग आणि घटकांसह 5,012 वस्तू स्वदेशीकरणासाठी निश्चित केल्या होत्या, त्यापैकी 3,255 वस्तूंचे स्वदेशीकरण करण्यात आले आहे,” असे त्यांनी सांगितले. संरक्षण उत्पादन 2014 मधील 40,000 कोटी रुपयांवरून आता विक्रमी 1.78 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. त्यासोबतच संरक्षण निर्यात 2013-14 मधील 686 कोटी रुपयांवरून आता 39,000 कोटी रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. भारताची संरक्षण उत्पादने जवळपास 100 देशांपर्यंत पोहोचली आहेत, असे राजनाथ सिंह यांनी सरकारच्या प्रयत्नांमुळे संरक्षण क्षेत्रात झालेल्या प्रगतीबाबत बोलताना सांगितले.
देश यावर्षी 2 लाख कोटी रुपयांचे तर 2029 पर्यंत 3 लाख कोटी रुपयांचे संरक्षण उत्पादनाचे लक्ष्य साध्य करेल, तसेच 2029 पर्यंत 50,000 कोटी रुपयांच्या संरक्षण उपकरणांची निर्यात करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारत आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करेल, तेव्हा तो ‘विकसित भारत’ बनेल तसेच तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि संरक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये जगाला नेतृत्व प्रदान करेल, असा विश्वास, संरक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या समारोपात व्यक्त केला.
राधिका अघोर/शैलेश पाटील/राजेश शिरभाते/श्रद्धा मुखेडकर /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2323903)
अभ्यागत कक्ष : 5