अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महसूल गुप्तचर संचालनालयाने पाकिस्तानमध्ये उत्पादित होणाऱ्या 73 लाख किलोहून अधिक खडेमिठाच्या अवैध आयातीचा केला पर्दाफाश‌ ;चौघांना अटक

Posted On: 14 OCT 2026 6:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2026

पाकिस्तानमध्ये उत्पादित होणाऱ्या किंवा पाकिस्तानमधून निर्यात होणाऱ्या वस्तूंच्या आयातीवरील भारताच्या बंदीला बगल देण्याच्या एका मोठ्या योजनेचा,महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)पुन्हा एकदा पर्दाफाश केला आहे. ही योजना “ऑपरेशन दीप मॅनिफेस्ट” अंतर्गत राबवली जात होती.

पाकिस्तानातील 7,311 मेट्रिक टन औद्योगिक/हिमालयीन खडे मीठाच्या  295 कंटेनर्सची भारतात झालेली आयात डीआरआयने उघडकीस आणली, ज्याचे  बाजारातील अंदाजे मूल्य सुमारे 30 कोटी रुपये आहे.मूळ देशाची ओळख लपवण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीत (UAE) असलेल्या संस्थांद्वारे  जारी  बनावट प्रमाणपत्रे आणि पावत्या वापरून मालाच्या मूळच्या ठिकाणाची खोटी माहिती दाखवत, तो माल श्रीलंकेतील कोलंबो बंदरातून पाठवण्यात आला.

विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआयने 26 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2026 या कालावधीत पंधरा दिवसांची एक समन्वयीत मोहीम राबवली, ज्याअंतर्गत गांधीधाम, आदिपूर, वेरावळ, पानिपत, पुणे, पतियाळा, दिल्ली आणि मुंबई येथील संबंधित परिसरांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली.

नऊ आयातदारांनी मार्च 2026 पासून बंदीचे उल्लंघन करून मुंद्रा आणि कांडला बंदरांमार्फत 295 कंटेनर आणले होते, असे तपासात उघड झाले आहे.एकूण 295 कंटेनर्सपैकी, कांडला बंदरात  24.41 लाख रुपये किमतीचे 140 मेट्रिक टन औद्योगिक/हिमालयीन रॉक सॉल्ट असलेले पाच कंटेनर्स जप्त करण्यात आले आहेत.याव्यतिरिक्त, आयातदारांच्या बँक खात्यांमध्ये असलेली 20.96 लाख रुपयांची विक्री रक्कम जप्त करण्यात आली आहे.

प्राथमिक तपासात पाकिस्तानी, संयुक्त अरब अमिराती, श्रीलंकन आणि भारतीय नागरिकांच्या मालकीच्या संस्थांचा समावेश असलेले एक आंतरराष्ट्रीय नेटवर्क उघडकीस आले आहे. या नेटवर्कने मालाचे पाकिस्तानी मूळ लपवण्यासाठी मालाची पाठवणी आणि संबंधित कागदपत्रांमध्ये फेरफार केला  असल्याचा आरोप आहे. या व्यवहारांना आधार देण्यासाठी दुबईस्थित कंपन्यांनी जारी केलेल्या बनावट पावत्यांचा वापर करण्यात आला.

सीमाशुल्क कायदा, 1962 च्या तरतुदींनुसार या गुन्ह्यात चार जणांना अटक करण्यात आली आहे: आयात करणाऱ्या कंपन्यांचे दोन मालक/भागीदार, एक सीमाशुल्क विभागातील जी-कार्ड धारक दलाल आणि ज्याने आपल्या वडिलांच्या नावाने एक आयात करणारी कंपनी स्थापन करून चालवणारा दुबईस्थित एका पुरवठादार यांचा  समावेश आहे.

गेल्या महिन्यात अशाच एका कारवाईत, डीआरआयने नाशिकच्या सीएफएस अंबड येथे मुंबईस्थित एका कंपनीने आयात केलेले, पाकिस्तानातून आणण्यात आलेले  13 कंटेनर भरून  362,000 किलोहून अधिक सुके खजूर जप्त केले होते .

ही प्रकरणे,तिसऱ्या देशातून माल पाठवणे, मालाच्या मूळ उगमाबद्दल खोटी घोषणापत्र तयार करणे, बनावट व्यापारी कागदपत्रे आणि अपारदर्शक आर्थिक व्यवस्था यांसारख्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कद्वारे पाकिस्तानी बनावटीच्या मालावरील भारताच्या आयात बंदीला बगल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बदलत्या पद्धतींवर प्रकाश टाकतात. डीआरआय.अशा नेटवर्कना ओळखून त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आणि भारताच्या आर्थिक व राष्ट्रीय सुरक्षा हितांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे.

सुषमा काणे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 2323498) अभ्यागत कक्ष : 21