राष्ट्रपती कार्यालय
नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या 66 व्या अभ्यासक्रमाचे प्राध्यापक आणि प्रशिक्षणार्थी सदस्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
Posted On:
13 OCT 2026 3:58PM by PIB Mumbai
नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या(राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय) 66 व्या अभ्यासक्रमाचे प्राध्यापक आणि प्रशिक्षणार्थी सदस्यांनी आज 13 ऑक्टोबर 2026 रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

सुरक्षा आणि तंत्रज्ञानाचे क्षेत्र वेगाने बदलत असून त्यामुळे नवीन आणि गुंतागुंतीची आव्हाने निर्माण होत आहेत, असे या प्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी सांगितले. या घडामोडींमुळे अधिक सज्जता, धोरणात्मक दूरदृष्टी आणि बदलत्या परिस्थितीनुसार जुळवून घेण्याच्या क्षमतेची गरज निर्माण झाली आहे. पारंपरिक क्षेत्रांव्यतिरिक्त आधुनिक युद्धाचे तंत्र आता सायबर सुरक्षा, अंतराळ तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये विस्तारल्यामुळे जलद निर्णय घेण्याची यंत्रणा अधिक महत्त्वाची ठरत आहे, यावर त्यांनी भर दिला.
आज राष्ट्रीय सुरक्षा केवळ लष्करी क्षमतेपुरती मर्यादित राहिलेली नाही. नवोन्मेषाचे व्यावहारिक उपायांमध्ये रूपांतर करण्यासाठी वैज्ञानिक संस्था आणि सशस्त्र दलांमध्ये निकट सहकार्याची गरज आहे. अलीकडील संघर्षांनी अशा किफायतशीर तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे, जे प्रगत संरक्षण प्रणालींना पूरक ठरतात आणि उपलब्ध संसाधनांचा उत्तम वापर करतात, असे त्या म्हणाल्या. नवोन्मेष आणि राष्ट्रीय सुरक्षा यांच्यातील दुवा मजबूत करण्यासाठी त्यांनी संशोधन, विकास आणि नवोन्मेष योजना यांसारख्या सरकारी उपक्रमांच्या महत्त्वावर भर दिला.

विज्ञान, राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक घडामोडींच्या विविध क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत आहे. मात्र निर्णय प्रक्रियेचे काम पूर्णपणे या तंत्रज्ञानावर सोपवले जाऊ शकत नाही, असे सांगून राष्ट्रपतींनी यासाठी संतुलित दृष्टिकोन बाळगण्याची गरज व्यक्त केली.
राष्ट्रीय सुरक्षा संरचनेचा आर्थिक लवचिकता हा एक अविभाज्य भाग असल्याचे राष्ट्रपतींनी अधोरेखित केले. त्या म्हणाल्या की, भारतीय अर्थव्यवस्थेने बाह्य घटकांमुळे निर्माण होणारे अडथळ्यांना तोंड देण्याची आपली क्षमता सिद्ध केली आहे. भारताने आपल्या धोरणात्मक निर्णय स्वातंत्र्यासोबत तडजोड न करता हे यश प्राप्त केले आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
***
Sushma Kane / Sonali Kulkarni / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2322831)
अभ्यागत कक्ष : 11