वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी जागतिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि रोजगारनिर्मिती या दोन्हींवर समान भर देण्याच्या दुहेरी दृष्टिकोनावर दिला जोर


केंद्रीय मंत्र्यांनी ‘दिल्ली संवाद : भविष्याच्या आव्हानांसाठी सज्ज भारत घडविण्यासाठीची धोरणे’ या कार्यक्रमाला केले संबोधित

Posted On: 12 OCT 2026 7:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2026

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आणि रोजगारनिर्मिती तसेच व्यवसायाच्या मोठ्या संधी असलेल्या क्षेत्रांची ओळख पटवणे, अशा दुहेरी दृष्टिकोनावर भर दिला.

आज नवी दिल्ली येथे आयोजित ‘दिल्ली संवाद : भविष्याच्या आव्हानांसाठी सज्ज भारत घडविण्यासाठीची धोरणे’ या कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी उद्योग, स्टार्टअप्स आणि तरुणांसाठी संधी निर्माण करण्याच्या महत्त्वावर भर दिला. आम्हाला जागतिक बाजारपेठेचा भाग व्हायचे आहे. लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, स्टार्टअप्सना संधी देणे आणि तरुणांना नवनवीन कल्पना मांडून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रोत्साहन देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे, असे गोयल म्हणाले.

मुक्त व्यापार करारांच्या (FTAs) माध्यमातून जागतिक बाजारपेठांशी भारताचा वाढता संपर्क यावर त्यांनी प्रकाश टाकला. या करारांमुळे भारतीय उद्योग आणि तरुणांसाठी नव्या संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. विकसित अर्थव्यवस्थांशी भारताच्या भागीदारीमुळे दोन्ही बाजूंना लाभ होऊ शकतो, असे नमूद करताना त्यांनी सांगितले की, भारत कापड उद्योग, पादत्राणे, कृषी आणि अन्नप्रक्रिया या क्षेत्रांतील आपली बलस्थाने जागतिक बाजारपेठेसमोर मांडू शकतो, तर दुसरीकडे प्रगत तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाची इलेक्ट्रॉनिक उपकरणे मिळवण्याची संधीही भारताला उपलब्ध होऊ शकते.

जागतिक स्तरावर सहभाग वाढवतानाच आत्मनिर्भरतेवर भर देण्याच्या भारताच्या दृष्टिकोनाविषयी बोलताना पीयूष गोयल म्हणाले, “भारताची दारे आम्ही जगासाठी बंद करत नाही आहोत, तर ती अधिक व्यापकपणे खुली करत आहोत.”

गोयल यांनी रोजगारनिर्मिती आणि व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याची मोठी क्षमता असलेले क्षेत्र म्हणून पर्यटनाचा उल्लेख केला. पर्यटनाच्या प्रचार-प्रसाराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होऊ शकतो;मात्र या क्षेत्रात मानवी अनुभवांना नेहमीच केंद्रस्थानी महत्त्व राहील, असे त्यांनी सांगितले.

भारताचा समृद्ध पाककला वारसा आणि प्रादेशिक विविधता यांचाही पीयूष गोयल यांनी उल्लेख केला. भारतीय खाद्यपरंपरा तसेच फिल्टर कॉफी, रसम, इडली आणि डोसा यांसारख्या खाद्यपदार्थांमध्ये जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळवण्याची मोठी क्षमता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

भारत जागतिक स्तरावरील वाहननिर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास पीयूष गोयल यांनी व्यक्त केला. बाजारपेठेतील मागणी पुरेशा प्रमाणात वाढून उत्पादन आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरू लागल्यावर आंतरराष्ट्रीय वाहननिर्मिती कंपन्या भारतात अधिकाधिक वाहने तयार करतील, असे त्यांनी सांगितले.

युनायटेड किंगडम आणि युरोपीय संघाकडून होणाऱ्या कार आयातीसाठी मंजूर करण्यात आलेल्या कोट्यांचा संदर्भ देताना गोयल यांनी स्पष्ट केले की, या कोट्यांमध्ये प्रामुख्याने महागड्या कारचा समावेश आहे; कमी किमतीच्या कारचे क्षेत्र मात्र आयातीसाठी खुले करण्यात आलेले नाही.

सुरुवातीला भारतीय बाजारपेठेची चाचपणी केल्यानंतर काही लक्झरी कारनिर्मिती कंपन्यांनी पुण्यात उत्पादन प्रकल्प सुरू केल्याची उदाहरणे देत, भारतात जागतिक वाहननिर्मिती कंपन्यांना आकर्षित करण्याची मोठी क्षमता असल्याचे गोयल यांनी अधोरेखित केले. तसेच, जागतिक वाहननिर्मिती क्षेत्रातील भारताचे स्थान अधिक बळकट होऊ शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शैलेश पाटील/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2322454) अभ्यागत कक्ष : 6