अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डीआरआयने पूर्व विभागात बांगलादेशातून होणाऱ्या सोन्याच्या तस्करीवर केली कारवाई 7.8 किलोहून अधिक विदेशी सोने जप्त; सहा जणांना अटक


गुप्तचर यंत्रणेच्या आधारे केलेल्या कारवाईत बनपूर सीमावर्ती भागातून आणि त्रिपुराला कोलकाताशी जोडणाऱ्या मार्गांवरून कार्यरत असलेल्या सोन्याच्या तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश

Posted On: 11 OCT 2026 10:26AM by PIB Mumbai
 
महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात डीआरआय बांगलादेशातून होणाऱ्या सीमापार सोन्याच्या तस्करीविरोधात आपली कारवाई तीव्र केली असून, 08-09 ऑक्टोबर 2026 रोजी पूर्व भागात केलेल्या गुप्तचर माहितीवर आधारित कारवाईत 11.50 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सुमारे 7.8 किलो विदेशी सोने जप्त केले आहे. या कारवाईमुळे सीमावर्ती भागातून कोलकाताच्या दिशेने तस्करीचे सोने वाहून नेण्यासाठी रस्ते आणि रेल्वे मार्गांचा वापर होत असल्याचे उघडकीस आले, परिणामी सहा जणांना अटक करण्यात आली.

 

डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी डंकुनी टोल प्लाझा येथे एक चारचाकी वाहन अडवले. बांगलादेश सीमेजवळील बनपूर येथून कोलकाताच्या दिशेने प्रवास करणाऱ्या या वाहनातून चार जण प्रवास करत होते. वाहनाची आणि त्यातील प्रवाशांची झडती घेतली असता, सुमारे 6.8 किलो वजनाच्या आणि अंदाजे 10 कोटी रुपये किमतीच्या 50 सोन्याच्या विटा जप्त करण्यात आल्या. काही सोन्याच्या विटांवर परदेशी खुणा होत्या. वाहनातील व्यक्ती सोन्याच्या कायदेशीर ताब्याचे कोणतेही कायदेशीर दस्तऐवज सादर करू शकले नाहीत आणि त्यांनी आपल्या जबाबात, बांगलादेशमार्गे भारतात परदेशी सोन्याची तस्करी करण्यात आपला सहभाग असल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे, बनपूर सीमा परिसरात कार्यरत असलेल्या टोळीचा म्होरक्या अटक केलेल्या चार जणांमध्ये होता.

त्याच दिवशी, पश्चिम बंगाल राज्यात, डीआरआयच्या पथकांनी मालदा टाऊन रेल्वे स्टेशन आणि न्यू जलपाईगुडी रेल्वे स्टेशन या दोन रेल्वे स्थानकांवर ट्रेनमधून उतरणाऱ्या प्रवाशांना अडवले आणि सुमारे 1 किलो परदेशी सोने जप्त केले, ज्याची किंमत अंदाजे 10 कोटी रुपये आहे. त्यांच्या ताब्यातून 1.5 कोटी रुपये जप्त करण्यात आले. कायदेशीर खरेदी सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करण्यात अयशस्वी ठरल्याने त्या दोन प्रवाशांना अटक करण्यात आली. तपासात असे दिसून आले की, बांगड्या आणि सोन्याच्या विटांच्या स्वरूपात जप्त केलेले सोने, त्रिपुरातील भारत-बांगलादेश सीमेवरून तस्करी करून आणलेल्या सोन्यापासून बनवले होते.

या कारवाया, तस्करीच्या सोन्याच्या वाहतुकीसाठी बांगलादेशच्या सीमेवरील भागांचा, तसेच ईशान्य भारताला कोलकातासारख्या प्रमुख बाजारपेठांशी जोडणाऱ्या रस्ते आणि रेल्वे मार्गांचा सातत्याने होणारा वापर स्पष्ट करतात. गुप्तचर माहितीवर आधारित अंमलबजावणी आणि समन्वित कारवाईद्वारे संघटित तस्करी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी डीआरआय कटिबद्ध आहे.

***

नितीन फुल्लुके / राजेश शिरभाते/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2321936) अभ्यागत कक्ष : 21