युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्याकडून खुल्या ब्रिक्स पारंपरिक व स्वदेशी प्रदर्शनीय क्रीडा स्पर्धेची घोषणा


ब्रिक्स पारंपरिक व स्वदेशी प्रदर्शनीय क्रीडा स्पर्धा 2026 अहमदाबाद इथे 12 ऑक्टोबर रोजी होणार

ब्रिक्स सदस्य देश त्यांच्या पारंपरिक व स्वदेशी खेळांचे आणि सांस्कृतिक वारशाचे अहमदाबाद येथील क्रीडा स्पर्धेत दर्शन घडविणार

Posted On: 10 OCT 2026 11:27AM by PIB Mumbai

 

केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय गुजरात सरकारच्या सहकार्याने अहमदाबाद येथील वीर सावरकर क्रीडा संकुलामध्ये 12 ऑक्टोबर 2026 रोजी ब्रिक्स देशांची प्रदर्शनीय सामन्यांची पारंपरिक व स्वदेशी क्रीडा स्पर्धा 2026 आयोजित करणार आहे. ही स्पर्धा भारताच्या ब्रिक्स संघटनेच्या अध्यक्षतेअंतर्गत आयोजित करण्यात आली आहे.

केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया या स्पर्धेचे उद्घाटन करतील. उद्घाटनाला गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि गुजरातचे क्रीडा मंत्री डॉ. जयराम गमित हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

 

या स्पर्धेनिमित्त ब्रिक्स सदस्य देश व भागीदार देशांची शिष्टमंडळे एकत्र येणार असून ते आपल्या देशांचे पारंपरिक व स्वदेशी खेळ सादर करतील आणि सांस्कृतिक देवाणघेवाण, वारसा जतन व खेळांच्या माध्यमातून नागरिकांमधील परस्पर सहकार्य वाढविण्याला प्रोत्साहन देतील.

हा बिगर-स्पर्धात्मक क्रीडामंच असून पारंपरिक खेळांचे प्रदर्शन, दस्तावेजीकरण आणि देवाणघेवाण हा स्पर्धेच्या आयोजनाचा उद्देश आहे. यामध्ये सांस्कृतिक महत्त्व, स्पर्धकांचा संवाद व ज्ञानाची देवाणघेवाण यावर भर दिला जाईल. 

 

सहभागी देश या स्पर्धेत त्यांच्या वैविध्यपूर्ण पारंपरिक व स्वदेशी खेळांचे आणि संस्कृतीचे सादरीकरण करतील  अशी अपेक्षा आहे.

बेलारुस – गोरोड्की

बोलिविया – लुचा डी चोलितास, टिंकू, रायुला, ट्रोम्पो, कचिनास व करेरा डी साकोस

ब्राझील – झरबटना (स्वदेशी ब्लोपाइप), कोरिडा डी तोरस (लॉग रेस), ब्राझिलियन पॅरा-जिउ-जित्सु आणि कॅपोरिया

चीन – वुशु, लायन डान्स व हेल्थ क्विगाँग

इथिओपिया -  इथिओपियन कुस्ती (टेगेल), इथिओपियन जेना (शेतातील हॉकी) आणि सेलस गेबेटा/18-12/बूब/शाहे

भारत – मल्लखांब, योगासने, कलरीपयट्टू

इराण – झूरकानेह, हफ्त सँग व घानेइ

कझाकस्तान – असिक अटु, टोग्झकुमलक व कझाक कुरेसी

रशिया – गोरोडकी व साम्बो

दक्षिण अफ्रिका – क्गती व लिन्टोन्गा

संयुक्त अरब अमिराती – अल तब्बाह

या स्पर्धेनिमित्त भारताला भेट देणाऱ्या शिष्टमंडळांसोबत क्रीडा क्षेत्रातील सहकार्य बळकट करण्याच्या संधी शोधण्यासाठी आणि पारंपरिक व स्वदेशी खेळांना ब्रिक्स आराखड्याअंतर्गत प्रोत्साहन देण्यासाठी द्विपक्षीय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

सहभागी देशांचा समृद्ध क्रीडा वारसा साजरा करतानाच परस्पर सामंजस्य वाढविणे, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि ब्रिक्स देशांच्या नागरिकांमधील मजबूत बंध यासाठी ही स्पर्धा एक वैशिष्ट्यपूर्ण मंच ठरेल.

***

शैलेश पाटील/सुरेखा जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2321841) अभ्यागत कक्ष : 7