इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे जागतिक बँक समुहाच्या 'वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट 2026: द प्रॉमिस ऑफ आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' या विकास आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक अहवालाचे प्रकाशन


या अहवालात अवलंब, अनुकूलता आणि प्रगतीच्या माध्यमातून देशांनी विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा वापर करावा, यासंबंधीचा एक मार्गदर्शक आराखडाही अंतर्भूत

Posted On: 08 OCT 2026 8:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2026

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, रेल्वे तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज जागतिक बँक समुहाच्या (World Bank Group) वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट 2026: द प्रॉमिस ऑफ आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (World Development Report 2026: The Promise of Artificial Intelligence) या विकास आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक अहवालाचे प्रकाशन झाले. या अहवालात विकसनशील अर्थव्यवस्थांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण होणाऱ्या संधी आणि आव्हानांची विश्लेषणात्मक मांडणी केलेली आहे. यासोबतच अवलंब, अनुकूलता आणि प्रगतीच्या माध्यमातून देशांनी विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा वापर करावा, याचा एक मार्गदर्शक आराखडाही या अहवालात मांडलेला आहे. 

नवी दिल्लीतील द ओबेरॉय येथे हा प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारितील इंडिया एआय मिशन (IndiaAI Mission) आणि जागतिक बँक समुहाच्या वतीने संयुक्तपणे या अहवाल प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

या निमित्ताने भारत कशारितीने कृत्रिम बुद्धिमत्तेपासून मिळणारे विकासात्मक लाभ कमाल पातळीवर नेऊ शकतो आणि त्याचवेळी त्याअंतर्गत सुरक्षितताही राखू शकतो, यावर चर्चा करण्यासाठी वरिष्ठ धोरणकर्ते, जागतिक पातळीवरील विकास तज्ञ, तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची व्यक्तीमत्वे आणि अभ्यासक या कार्यक्रमात एकत्र आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्टेट एआय शोकेस या देशभरातील राज्यांच्या प्रदर्शन उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विविध राज्ये आणि नवोन्मेषकांनी देशभरातील कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाययोजनांचे सादरीकरण केले.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान हे विकसनशील अर्थव्यवस्थांसाठी तज्ञांच्या सेवेची उपलब्धता विस्तारू शकते, उत्पादकता वाढवू शकते आणि सेवा वितरण प्रणालीत सुधारणा घडवून आणू शकते असा निष्कर्ष या अहवालात मांडला आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्य संबोधन केले आणि औपचारिकरित्या अहवाल सादर केला. केंद्रीय मंत्र्यांनी तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्याबाबतच्या भारताच्या दृष्टिकोनावर भर दिला, जेणेकरून कृत्रिम बुद्धिमत्तेचे लाभ देशभरातील नागरिक, उद्योगधंदे आणि संस्थांपर्यंत पोहोचतील.

“ए आय मुळे सामान्य लोकांचे जीवनमान बदलत आहे. बारामतीमध्ये, ज्या शेतकऱ्यांनी कधीही संगणक वापरला नव्हता, त्यांनी केवळ फोनवरील आवाजाच्या माध्यमातून 30 टक्के कमी पाणी आणि खत वापरून उसाच्या उत्पादनात  40 टक्क्यांनी वाढ केली. आरोग्यसेवा क्षेत्रात क्षयरोगाच्या  निदानात 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा  उदाहरणांमुळे ग्लोबल साउथ आणि जगभरातील लोकांच्या जीवनमानात बदल घडू शकतो, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

उपग्रह, आयओटी आणि हवामानाच्या संकलित माहितीवर बारामती उपक्रम आधारित आहे आणि त्यामुळे मजुरीचा खर्चही कमी झाला आहे, असेही केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले . गुजरातमध्ये, 5 लाख शेतकरी ॲग्रीस्टॅकचा वापर करत आहेत आणि पशू आरोग्यासाठी सरलाबेनच्या माध्यमातून ए आय च्या मदतीने 3 कोटी जनावरे आणि त्यांच्या शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे, असे ते म्हणाले.

ए आय चा विकास आणि उपयोजनाच्या दृष्टीने भारत एक महत्त्वपूर्ण परिसंस्था म्हणून उदयास आला आहे, ज्याचा वापर आरोग्यसेवा, कृषी, शिक्षण, प्रशासन, वित्तीय सेवा आणि इतर सार्वजनिक तसेच आर्थिक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये केला जात आहे.

संगणकीय क्षमता, माहिती संकलन आणि प्रारुपांची उपलब्धता सर्वांसाठी खुली करणे, भारतापुढील विशिष्ट आव्हानांना सामोरे जाणे आणि आर्थिक तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर सरकारने दृष्टिकोन केंद्रित केला आहे. सुरक्षित आणि विश्वसनीय ए आय स्तंभानुसार सरकार जबाबदारीपूर्ण ए आयसाठी स्वदेशी साधने आणि कार्यप्रणालींच्या विकासाला पाठिंबा देत आहे, ज्याअंतर्गत  ए आयबाबत पूर्वग्रहावर नियंत्रण आणणे, कार्यप्रणालीचे लेखापरीक्षण, स्पष्टीकरणक्षम एआय, गोपनीयता जपणारे एआय आणि डीपफेक उघडकीस आणणे यांचा समावेश आहे.  ए आय प्रशासन आणि सुरक्षेसाठी संस्थात्मक यंत्रणाही स्थापित केली गेली आहे.

“भारतात विकासासाठी एआयचा वापर कसा करावा” या विषयावर एक उच्चस्तरीय सामुहिक चर्चा झाली. यामध्ये तीन प्रश्नांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली : भारतात ए आय स्वीकारण्यामधील आव्हाने, भारत ए आयचा वापर करून त्याला स्थानिक संदर्भ आणि गरजांनुसार कसा जुळवून घेऊ शकतो आणि ए आयमुळे निर्माण होणारे धोके रोखण्यासाठी आवश्यक धोरणे. एआयचे लाभ मिळवण्यासाठी अशा धोरणांची आवश्यकता असेल, जी त्याचे फायदे सर्वदूर पोहोचवतील आणि त्याचे धोके कठोरपणे नियंत्रित केले जातील, याबाबत या चर्चेत भर देण्यात आला. 

वैविध्यपूर्ण दृष्टिकोन, उदयोन्मुख प्रारूपे आणि विविध भौगोलिक प्रदेशांमध्ये स्वीकृती क्षमता असलेले उपाय अधोरेखित करण्यावर या कार्यक्रमात भर देण्यात आला.

या कार्यक्रमात जागतिक बँक समूहाचे प्रतिनिधी, विविध राज्यांचे अधिकारी आणि तंत्रज्ञान तज्ञांचा सहभाग असलेली महत्त्वाची सत्रेही आयोजित केली होती. 

 
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक सत्रात इंडिया एआय मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदीप श्रीवास्तव आणि जागतिक बँकेचे संचालक डॉ. सोमिक लाल सहभागी झाले होते. या सत्रात डॉ. सोमिक लाल यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केवळ काहीतरी तयार करण्यासाठी करण्यापेक्षा, तयार केलेल्या बाबींची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि वापर करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. 
 
एआय पायलट ते व्याप्ती: 'भारतातील एआयचे भवितव्य' या सत्रात जागतिक बँक समूहाचे मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. मायकेल क्रेमर यांनी मार्गदर्शन केले. भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची प्रगती ही संपूर्ण विकसनशील जगासाठी मार्गदर्शक असल्याचे ते म्हणाले. त्यांनी भारतातील मान्सूनच्या अंदाजासाठी वापरल्या गेलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेलचे उदाहरणही मांडले. केंद्र सरकारच्या हवामान यंत्रणांनी आणि कृषी मंत्रालयाने विविध कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेलचे एकात्मिकीकरण करत कोट्यवधी शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवल्याचे त्यांनी सांगितले. 2025 च्या अनपेक्षित मान्सूनचा अचूक अंदाज वर्तवणाऱ्या या भारतीय मॉडेलचे अनुकरण आता इथिओपियासारखे देश करत असल्याचे त्यांनी नमूद केले. यानंतर अहवालाचे संचालक डॉ. गौरव नय्यर यांनी या जागतिक अहवालाबद्दल सादरीकरण केले. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे विकसनशील देशांमध्ये नोकऱ्यांवर गदा येण्याचा धोका सध्या तरी कमी असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.
 
'विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा वापर' या चर्चासत्रात जागतिक बँकेचे नीलकंठ मिश्रा आणि माहिती तंत्रज्ञान सचिव एस. कृष्णन यांनी सहभाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार भारतात एआय टॅलेंट मिशनवर काम सुरू असल्याचे सांगत, भारत 'ग्लोबल साऊथ' मधील इतर देशांना यात मोठे सहकार्य करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
'स्टेट एआय शोकेस : भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता नवोन्मेष' या सत्रात देशभरातील विविध राज्यांनी स्थानिक आव्हानांवर मात करण्यासाठी विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताधारीत उपाययोजनांचे सादरीकरण केले. यात आंध्र प्रदेशाने मुलांमधील वाढीतील विलंब ओळखण्यासाठी नवचेतना या उपक्रमाचे सादरीकरण केले. तर महाराष्ट्राने पोकरा प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांसाठी महाविस्तार एआय या एकात्मिक व्यासपीठांवरील सादरीकरण केले. मेघालयाने शिक्षण क्षेत्रासाठी एडस्कग्रिड प्रणाली आणि आरोग्य क्षेत्रात व्ह्यूहा-सर्व्हिआय या वैद्यकीय साधनाचे सादरीकरण केले.
 
इंडिया एआय मिशनचे संचालक महंमद वाय. सफिरुल्ला के. यांनी उपस्थितांचे आभार मानले.
 
 

माधुरी पांगे/तुषार पवार/संदेश नाईक/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2320996) अभ्यागत कक्ष : 4