माहिती आणि प्रसारण मंत्रालय
आयआयसीटी -यू ट्यूबच्या सहकायोगातून ‘क्रिएट विथ एआय’ कार्यक्रमांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने निर्मित 4 चित्रपट सादर
तंत्रज्ञान, मार्गदर्शन आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून आयआयसीटीकडून भारतातील एआय-आधारित चित्रपट निर्मितीला चालना
Posted On:
07 OCT 2026 8:03PM by PIB Mumbai
मुंबई, 7 ऑक्टोबर, 2026
भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था (आयआयसीटी) आणि यू ट्यूब यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये जाहीर केलेल्या ‘क्रिएट विथ एआय’ या कार्यक्रमात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या क्षमता बळकट करण्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता - एआयवर आधारित सर्जनशील प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने निर्मित पहिले 4 लघुपट सादर करण्यात आले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात भारताला जागतिक नेतृत्व स्थान मिळवून देऊ शकणारी व्यवस्था उभारण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

मुंबईतील आयआयसीटीच्या चित्रपटगृहात आज सादर केलेले हे 4 चित्रपट संबंधित चित्रपट निर्मात्यांनी त्याच वेळी त्यांच्या यू ट्यूब वाहिन्यांवरही प्रदर्शित केले. या चित्रपटांमध्ये इतिहास, पौराणिक कथा, मानवी भावना आणि अंतराळ संशोधन अशा विविध विषयांचा व कथाकथनाच्या विविध प्रकारांचा समावेश आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने चित्रपट निर्मितीच्या सर्जनशील शक्यतांचे दर्शनही या चित्रपटांमधून घडते.
‘चेकावर’ हा 1741 मधील ऐतिहासिक कोलाचेलच्या लढाईच्या पार्श्वभूमीवर आधारित काल्पनिक चित्रपट एवियम स्टुडिओजची निर्मिती आहे. या चित्रपटासाठी त्या काळातील भूमी, लोकजीवन, शौर्य आणि युद्धकलेच्या परंपरांपासून प्रेरणा घेण्यात आली आहे.
इलेवन्थ डोअर स्टुडिओचा ‘चाणक्य – द माइंड ऑफ ॲन एम्पायर’ हा ऐतिहासिक महाकाव्यासारखा चित्रपट आहे. तत्त्वज्ञ, रणनीतीकार आणि मौर्य साम्राज्याचे शिल्पकार चाणक्य यांच्या आजवर प्रकाशात न आलेल्या प्रवासाचा वेध या चित्रपटातून घेतला आहे.
कल्पनिक फिल्म्सचा ‘देवी - द नाईन अस्त्राज्’ हा चित्रपट शक्तीच्या दैवी प्रकटण्याची आणि वैश्विक संतुलन पुनर्स्थापित करण्यासाठी तिने केलेल्या महाकाव्यात्मक संघर्षाची कथा मांडतो.
कार्तिक कल्ट क्रिएशन्सचा ‘लायका’ हा अंतराळात पाठविण्यात आलेल्या एका कुत्र्याच्या भावनिक प्रवासाची कथा मांडतो. अंतराळ संशोधनाच्या पार्श्वभूमीवर धैर्य, त्याग आणि माणूस व प्राणी यांच्यातील भावनिक नातेसंबंध या पैलूंचा वेध या चित्रपटातून घेतला आहे.

चित्रपट निर्मितीच्या कथाकथन प्रक्रियेच्या केंद्रस्थानी चित्रपट निर्माता ठामपणे राहतो, तेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता सर्जनशील शक्यतांचा विस्तार करण्यासाठी सर्वाधिक प्रभावी ठरते, हे या चित्रपटांतून दिसून येत आहे. ‘क्रिएट विथ एआय’ हा कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवातून प्रयोग म्हणून राबविण्यात आला. या माध्यमातून गूगल आणि यू ट्यूबच्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा, आयआयसीटीतील पायाभूत सुविधांचा आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचा, तसेच चित्रपट निर्मात्यांच्या कल्पनाशक्तीचा एकत्रित वापर करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना आयआयसीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विश्वास देवस्कर यांनी सांगितले, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चित्रपट निर्मितीच्या पुढील पर्वाचे नेतृत्व करण्याची संधी भारतासमोर आहे. ‘क्रिएट विथ एआय’ हा कार्यक्रम संस्थात्मक मार्गदर्शन आणि प्रगत एआय साधनांची उपलब्धता यांना एकत्र आणतो. त्यामुळे भारतीय सर्जनशील स्टुडिओंना प्रयोग करण्याची, क्षमता बांधणीची आणि चित्रपट निर्मितीच्या नव्या कार्यपद्धती विकसित करण्याची संधी मिळते. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कथाकथनाच्या क्षेत्रात भारताला अग्रणी आणू शकणारी व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असेही ते म्हणाले.
निर्मात्यांसाठी जनरेटिव्ह एआयच्या क्षमतेवर प्रकाश टाकताना, यूट्यूब इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक गुंजन सोनी म्हणाल्या, “भारत नेहमीच असामान्य कथाकथन करणारा देश राहिला आहे, परंतु आता आपण स्वतंत्रपणे निर्मिती करणाऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या अटींवर निर्मिती करण्याची ताकद उभी करताना पाहत आहोत. निर्भीड भारतीय कथाकथन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान एकत्र येतात, तेव्हा स्वतंत्र स्तरावर जागतिक दर्जाचे सिनेमा कसे तयार होतात,हे आयआयसीटीसोबतची आमची भागीदारी दर्शवते”, असे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या महासंचालक (पश्चिम विभाग) स्मिता वत्स शर्मा, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव सेंथिल राजन, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (एनएफडीसी) व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन महामंडळाचे (सीबीएफसी) मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सिंह यांचा समावेश होता.
कार्यक्रमात दाखवण्यात आलेल्या एआय आधारित चित्रपटांविषयी अधिक माहितीसाठी, कृपया खालील लिंक पाहा.

जनरेटिव्ह एआय मुळातच निर्मितीतील अडथळे दूर करते, त्यामुळे निर्मात्यांना लेखन, विश्वनिर्मिती आणि रचनात्मक निर्मिती यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अमूल्य वेळ मिळतो.
पब्लिक फर्स्ट आणि गूगल यांच्या 'जेन मीडिया इंडिया'च्या नवीन अहवालानुसार, जनरेटिव्ह मीडिया टूल्स भारतातील सर्जनशील कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेत 20% वाढ करतात. याचा अर्थ दरवर्षी अंदाजे 390 तासांची बचत होते, ज्यामुळे निर्मात्यांना केवळ लेखन, विश्वनिर्मिती आणि आपली कला अधिक परिष्कृत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी जवळजवळ दहा आठवड्यांचा अवधी उपलब्ध होतो.
पीआयबी मुंबई |माधुरी पांगे/रेश्मा बेडेकर/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2320374)
अभ्यागत कक्ष : 20