ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
देशात वाजवी दरात कांद्याची पुरेशी उपलब्धता
कांद्याची उपलब्धता आणि खरीप कांद्याची सद्यस्थिती
Posted On:
07 OCT 2026 7:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2026
कांद्याच्या उपलब्धतेची स्थिती आता पूर्वीपेक्षा खूपच चांगली झाली आहे. खरीप हंगामातील कांद्याची जास्त क्षेत्रफळावर झालेली लागवड, चांगले उत्पादन होण्यासाठी अनुकूल स्थिती, बाजारातील मुबलक आवक आणि खरीप पिकाचा नवीन माल बाजारात येण्यास झालेली सुरुवात यामुळे बाजारपेठेची स्थिती अतिशय समाधानकारक झाली आहे. पुरवठ्यातील या सुधारणेमुळे घाऊक बाजार आणि प्रमुख ग्राहक बाजारपेठांमध्ये कांद्याच्या दरात आधीच्या तुलनेत घसरण पाहायला मिळत आहे.

कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या प्रमुख उत्पादक राज्यांतून खरीप कांद्याची नवीन आवक सुरू झाली आहे, तर यापूर्वी जी साठवणूक केली होती त्या साठ्यातून उपलब्ध होणारा कांदा देखील बाजारपेठेतील मागणीची पूर्तता करत आहे. येत्या काही आठवड्यांत या उत्पादक प्रदेशांतून होणारी आवक आणखी वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात ग्राहक बाजारपेठांमधील एकंदरीत उपलब्धतेत अधिक सुधारणा अपेक्षित आहे.
महाराष्ट्रातील घाऊक बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव
पुरवठ्यातील सुधारणेचे स्पष्ट प्रतिबिंब घाऊक बाजारात दिसून येत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख कांदा बाजारपेठांमध्ये आवक भक्कम राहिली असून, 16 सप्टेंबर रोजी प्रति क्विंटल सुमारे ₹ 4,030 असलेला महाराष्ट्रातील घाऊक बाजारातील सरासरी भाव 3 ऑक्टोबरपर्यंत जवळपास 13 टक्क्यांनी घसरून प्रति क्विंटल सुमारे ₹ 3,475 वर आला आहे. घाऊक बाजारातील भावात ही सातत्याने होणारी घसरण, बाजारातील वाढलेली आवक थेट पुरवठ्याच्या स्थितीतील सुधारणेत परावर्तित झाल्याकडे निर्देश करत आहे.
राखीव सरकारी साठ्याचे सुयोग्य वितरण
सरकार राखीव साठ्यातील कांदा बाजारात आणून प्रमुख ग्राहक केंद्रांमधील पुरवठा वाढवत आहे. आतापर्यंत सरकारने 123 शहरांमध्ये 8 'कांदा एक्सप्रेस' आणि 467 ट्रक्सच्या माध्यमातून 2.0 लाख क्विंटलपेक्षा जास्त कांद्याचे वितरण केले आहे. जास्त खप असणाऱ्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा पोहोचवण्यासाठी अतिरिक्त रेल्वे रॅक तैनात करण्याचे नियोजन सुरू आहे.
सणासुदीच्या काळात पुरवठ्याचा वेग आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी अतिरिक्त रेल्वे फेऱ्यांचे नियोजन करून या प्रयत्नांना आणखी बळ दिले जात आहे.
नवीन खरीप कांद्याची आवक, साठवणूक केलेल्या कांद्याची उपलब्धता आणि राखीव साठ्यामधून ग्राहक केंद्रांपर्यंत कांद्याची सतत होणारी वाहतूक, यामुळे बाजाराला पुरवठ्याचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. सरकार आवक, साठा आणि दरांमधील चढ-उतारांवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि आवश्यक असेल तिथे सुरळीत वितरण व पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करत आहे.
माधुरी पांगे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2320368)
अभ्यागत कक्ष : 11