पंतप्रधान कार्यालय
सरकारचे प्रमुख म्हणून 25 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल जागतिक नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन
Posted On:
07 OCT 2026 5:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2026
7 ऑक्टोबर 2026 रोजी सरकारचे प्रमुख म्हणून सलग 25 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या ऐतिहासिक टप्प्याबद्दल जगभरातील विविध खंडांतील जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांचे अभिनंदन केले आहे. 2001 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा पदभार स्वीकारल्यापासून आणि नंतर 2014 मध्ये भारतीय प्रजासत्ताकाचे पंतप्रधान म्हणून धुरा सांभाळल्यापासूनची पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, जागतिक नेत्यांनी त्यांच्या परिवर्तनकारी नेतृत्वाचे, सुशासनावरील निष्ठा आणि जागतिक शांतता, सर्वसमावेशकता व शाश्वत विकासाप्रति असलेल्या कटिबद्धतेचे विशेष कौतुक केले.
भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन करताना म्हटले आहे ;
"प्रति,पंतप्रधान @narendramodi ,
आमच्या काळातील एक अवतार"
नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद टिनूबू यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन करताना म्हटले आहे ;
नायजेरियाच्या फेडरल रिपब्लिकचे सरकार आणि तेथील जनतेच्या वतीने तसेच माझ्या वैयक्तिक वतीने, मी भारताचे पंतप्रधान महामहीम नरेंद्र मोदी @narendramodi यांना या अत्यंत ऐतिहासिक टप्प्याबद्दल मनापासून आणि बंधुभावपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो.
आज,7 ऑक्टोबर 2026 रोजी, त्यांनी 2001 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री आणि सरकारचे प्रमुख म्हणून पहिल्यांदा पदभार स्वीकारल्याला 25 वर्षे पूर्ण होत आहेत.
त्यांची जनसेवा कोणताही खंड न पडता सातत्याने सुरू आहे. गुजरातच्या जनतेची 12 हून अधिक वर्षे सेवा केल्यानंतर, ते 2014 पासून भारतीय प्रजासत्ताकाचे पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत.
कोणत्याही लोकशाहीत पाव शतक अबाधित नेतृत्व करणे ही एक दुर्मिळ कामगिरी आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात, भारतीय जनतेने त्यांच्यावर दाखवलेल्या अढळ विश्वासाची ही एक शक्तिशाली साक्ष आहे.
या 25 वर्षांच्या काळात, पंतप्रधान मोदी यांनी दूरदृष्टीने आणि विकासाप्रति असलेल्या अढळ कटिबद्धतेने नेतृत्व केले आहे. गुजरातच्या कायापालटापासून ते भारताचे जगातील सर्वात मोठ्या आणि जलद गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक म्हणून उदय होण्यापर्यंत; पायाभूत सुविधा, डिजिटल सार्वजनिक वस्तू , आर्थिक सर्वसमावेशकता आणि नवोन्मेष या क्षेत्रांतील त्यांच्या नेतृत्वाने लाखो लोकांचे जीवन उंचावले आहे आणि ग्लोबल साऊथ मधील देशांना प्रेरित केले आहे.
नायजेरिया आपल्या दोन महान राष्ट्रांमधील धोरणात्मक भागीदारीला अत्यंत महत्त्व देतो. नोव्हेंबर 2024 मधील पंतप्रधानांच्या अबुजा येथील ऐतिहासिक अधिकृत राज्य दौऱ्याची मला आवर्जून आठवण होते, जेव्हा नायजेरियाने त्यांना 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर' या सन्मानाने भूषवले होते.
त्या भेटीमुळे व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण आणि सुरक्षा, आरोग्य, शिक्षण आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांतील आमच्या सहकार्याला नवी चालना मिळाली.
सहकारी लोकशाही देश आणि ग्लोबल साउथचे (विकसनशील जगाचे) प्रमुख नेतृत्व या नात्याने, नायजेरिया आणि भारत अधिक न्याय्य, अधिक सर्वसमावेशक आणि अधिक प्रातिनिधिक आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी समान कटिबद्धता बाळगतात. मला पूर्ण विश्वास आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निरंतर नेतृत्वाखाली आपल्या जनतेमधील मैत्रीचे बंध अधिक दृढ होत जातील.
पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीला होत असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण रौप्यमहोत्सवी पर्वानिमित्त मी त्यांना उत्तम आरोग्य, निरंतर बळ आणि भारताच्या जनतेच्या सेवेमध्ये उत्तरोत्तर यश मिळो, अशा शुभेच्छा देतो.
बोला अहमद टिनुबु, जीसीएफआर
राष्ट्राध्यक्ष आणि शस्त्रदलांचे कमांडर-इन-चीफ
फेडरल रिपब्लिक ऑफ नायजेरिया
आबुजा, 7 ऑक्टोबर, 2026
फिलिपिन्सचे अध्यक्ष पंतप्रधानांचे अभिनंदन करताना म्हणतात ,
सरकारप्रमुख म्हणून सलग २५ वर्षे सार्वजनिक सेवा पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन.
गुजरातपासून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे नेतृत्व करण्यापर्यन्तचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रवास हा सुशासन, नवोन्मेष, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि विकास यांवर दिलेल्या विशेष भरामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. भारताच्या परिवर्तनात आणि जागतिक स्तरावर भारताची भूमिका अधिक प्रभावी होण्यात यामुळे मोलाचे योगदान मिळाले आहे.
पंतप्रधान मोदींना भारतातील जनतेच्या सेवेमध्ये असेच निरंतर यश मिळो, अशी मी कामना करतो.
2025 मधील आमच्या धोरणात्मक भागीदारीपासून ते गेल्या महिन्यात फिलीपिन्स सीडीआरआय मध्ये सामील होण्यापर्यंत, आमचे संबंध अधिकाधिक दृढ होत आहेत. नोव्हेंबरमध्ये आसियान-भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदींचे मनिलामध्ये स्वागत करण्यास मी उत्सुक आहे.
नेपाळचे पंतप्रधान अभिनंदन करताना म्हणतात ,
समर्पित जनसेवेची 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल भारताचे पंतप्रधान @narendramodi यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा.
तुम्हाला आणि तुमच्या सरकारला आगामी काळात निरंतर यश आणि समृद्धीसाठी नेपाळ सरकार शुभेच्छा देत आहे.
बोत्स्वानाचे अध्यक्ष अभिनंदन करताना म्हणतात ,
सरकारच्या प्रमुखपदी 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान @narendramodi यांचे अभिनंदन.
भारतातील जनतेप्रती असलेल्या तुमच्या समर्पण आणि सेवेबद्दल आम्ही तुमची प्रशंसा करतो.
आम्ही आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि आपल्या देशांमधील चिरकाल टिकणाऱ्या मैत्रीची अपेक्षा करतो.
बेल्जीयमचे पंतप्रधान अभिनंदन करताना म्हणतात ,
गुजरातपासून नवी दिल्लीपर्यंतच्या सरकारी नेतृत्वाच्या 25 वर्षांच्या अखंड प्रवासाबद्दल मी पंतप्रधान @narendramodi यांचे मनापासून अभिनंदन करतो. गेल्या महिन्यात माझ्या फलदायी आणि यशस्वी भारत दौऱ्यानंतर, आपल्या दोन्ही देशांमधील मजबूत भागीदारी अधिक दृढ करण्यास मी उत्सुक आहे.
जपानचे पंतप्रधान अभिनंदन करताना म्हणतात ,
"पंतप्रधान मोदींच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाला आज 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.
गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही तुमचे आयुष्य भारतीय समाज आणि लोकांच्या विकासाकरता समर्पित केले आहे आणि 2001 पासून मुख्यमंत्री पदाच्या तुमच्या प्रदीर्घ कारकिर्दीत राजकीय पटलावरील अतिशय अद्वितीय नेतृत्वगुणांचे दर्शन घडावले आहे. भारताच्या विकासातील प्रगती आणि आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये भारताचे स्थान उंचावण्यासाठी तुम्ही केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा मी पूर्ण सन्मानाने आदर करतो.
याशिवाय यावर्षी जुलै महिन्यातील माझ्या भारत दौऱ्यात मला अत्यंत जिव्हाळ्याच्या आदरातिथ्याचा लाभ झाला ज्यासाठी मी पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
भारताची खाद्यसंस्कृती आणि संगीताचा अनुभव घेताना, जपान-भारत यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीला एका नव्या टप्प्यावर नेण्याच्या उपायांवर मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ठोस चर्चा करता आली, ज्यामुळे माझी ही भेट अत्यंत फलदायी ठरली. पुढील वर्षी जपान आणि भारत यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत.
मुक्त आणि खुल्या भारत प्रशांत क्षेत्राची कल्पना सत्यात आणताना सामायिक धोरणात्मक दिशा लाभलेले भारत आणि जपान हे देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आणखी जवळून काम करून आपली भागीदारी अधिक मजबूत करतील.
डॉमिनिका चे पंतप्रधान म्हणतात,
सरकारचे प्रमुख या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कारकिर्दीची 25 वर्षे पूर्ण करत असताना, माझ्या हार्दिक शुभेच्छा.
हा प्रवास गुजरातमध्ये सुरू झाला आणि भारतात आजही तुमच्या नेतृत्वाअंतर्गत तो पुढेही सुरू राहिलेला आहे.
आपण हा महत्त्वाचा टप्पा साजरा करत असताना, आपण डोमिनिकाला दिलेल्या मैत्रीबद्दल आणि आमच्या लोकांप्रति दाखवलेल्या जिव्हाळ्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. मी आपल्या राष्ट्रांमधील संबंधांना अतिशय महत्त्व देतो आणि येत्या काळात ते अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहे.
डोमिनिकाचे सरकार आणि तेथील लोकांच्या वतीने, तसेच वैयक्तिकरित्या, मी तुम्हाला उत्तम आरोग्य, सामर्थ्य आणि भारतीय जनतेच्या सेवेत यशस्वीपणे निरंतर रहाण्यासाठी शुभेच्छा देतो.
सर्बियाचे माजी अध्यक्ष म्हणतात,
अभिनंदन; नरेंद्र मोदी सर्वोच्च स्तरावरून 25 वर्षांची लोकसेवा पूर्ण केल्याबद्दल आपले अभिनंदन.
प्रथम गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून आपण आपल्या देशाच्या सेवेसाठी पंचवीस वर्षे समर्पित केली आहेत, अशी संधी फार कमी लोकांना मिळाली असेल.
तुम्हाला भारताची आणि त्याच्या भविष्याची किती मनापासून काळजी आहे हे मला माहीत आहे, आणि तुम्ही भारताला किती उंचीवर नेले आहे हे जग पाहू शकते. महान भारतीय जनतेची सेवा करण्याकरीता तुम्हाला उत्तम आरोग्य, शक्ती आणि अनेक वर्षे यश लाभो अशी माझी सदिच्छा आहे.
तुम्ही भारताला लाभला आहात, हे भारताचे सद्भाग्य आहे.
सुषमा काणे/शैलेश पाटील/सविता म्हसकर/भक्ती सोनटक्के/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2320303)
अभ्यागत कक्ष : 30