भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

राजकीय शिष्टमंडळांच्या भेटींबाबतच्या नियमावलीबद्दल भारतीय निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण, मंगळवारी 6 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत कोणत्याही पक्षाने भेटीसाठी वेळ मागितलेली नसल्याचे भारतीय निवडणूक आयोगाने केले स्पष्ट

Posted On: 06 OCT 2026 10:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2026

 
1. मंगळवारी 6 ऑक्टोबर 2026 रोजी काही राजकीय पक्षांनी भारतीय निवडणूक आयोगावर काढलेल्या मोर्चादरम्यान, काही खासदार त्यांच्या शिष्टमंडळासह निवडणूक आयोगाची भेट घेऊ इच्छितात, अशी माहिती माध्यमांद्वारे मिळाली होती. या घडामोडींच्या संदर्भात असे स्पष्ट केले जात आहे की, या दिवशी दुपारी 4.00 वाजेपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक आयोगाकडे भेटीसाठी कोणतीही वेळ मागितली नव्हती.

2. त्यानंतर दुपारी सुमारे 4.00 वाजता दिल्ली पोलिसांकडून माहिती मिळाली की, लोकसभेचे सन्माननीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील खासदारांचे एक शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करू इच्छिते.

3. सन 2025 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या भेटीबाबतची एक निश्चित कार्यपद्धती ठरवून दिली होती. सर्व राजकीय पक्षांना याबाबत माहिती देण्यात आली असून ते या कार्यपद्धतीचे पालन करतात. जेव्हा जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाचे शिष्टमंडळ किंवा विविध पक्षांचे संयुक्त शिष्टमंडळ आयोगाची भेट घेऊ इच्छिते, तेव्हा ते त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीद्वारे भेटीसाठी वेळ मागतात. त्यानंतर दोन्ही बाजूंनी परस्पर सहमतीने निश्चित केलेल्या सोयीस्कर वेळेत ही भेट आयोजित केली जाते.

4. मंगळवारी दुपारी 4.00 वाजल्यानंतर, निवडणूक आयोग खासदारांबरोबरच्या बैठकीबाबतच्या वरील प्रस्तावावर विचार करत होते, तेव्हा दिल्ली पोलिसांच्या उपायुक्तांनी अशी माहिती दिली की, ही नियोजित बैठक 240 खासदारांच्या गटाबरोबर होणार आहे आणि त्यासाठी प्रस्तावित ठिकाण 'संसद भवन ॲनेक्स' हे आहे. निवडणूक आयोगाला ही विनंती असामान्य वाटली आणि त्यामुळे ती स्वीकारता आली नाही; कारण निवडणूक आयोगाच्या प्रोटोकॉलनुसार, अशा बैठका केवळ 'भारतीय निवडणूक आयोगाच्या' आवारातच घेतल्या जातात.                                                                  

5. भारतीय निवडणूक आयोगाने प्रस्ताव मांडला की, खासदारांचे निवेदन स्वीकारण्यासाठी आपल्या कर्तव्यावर असलेल्या आयोगाच्या सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याला बैठकीच्या ठिकाणी पाठवले जावे. हे एक अभूतपूर्व पाऊल ठरले असते. मात्र, हा प्रस्तावही  खासदारांनी नाकारला.

6. भारतीय निवडणूक आयोग देशाच्या संसदीय आणि लोकशाही प्रक्रियांचा, तसेच स्वतःच्या कार्यपद्धती आणि संकेतांचा आदर करत असून, हे सर्व अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणताही राजकीय पक्ष कोणत्याही वेळी निवडणूक आयोगाकडे भेटीची विनंती करू शकतो आणि आयोग सोयीची वेळ पाहून भेटीसाठी तारीख आणि वेळ निश्चित करतो. ही एक नियमित प्रक्रिया आहे. 


शैलेश पाटील/राजश्री आगाशे/तुषार पवार/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2319876) अभ्यागत कक्ष : 15