युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2027 : देशव्यापी प्रश्नमंजुषेत 1,45,26,013 जणांचा सहभाग; निवड झालेले युवा निबंध फेरीसाठी पात्र
Posted On:
06 OCT 2026 8:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2026
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या 'मेरा युवा भारत' (MY Bharat) या उपक्रमाद्वारे आयोजित 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग (VBYLD) 2027' या प्रमुख युवा सहभाग उपक्रमाने 'विकसित भारत प्रश्नमंजुषा' यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या निवड प्रक्रियेदरम्यान 1,45,26,013 प्रयत्नांची नोंद झाली असून, या स्पर्धेला देशभरातील भारतीय तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
'VBYLD 2027' चा मुख्य उद्देश 'विकसित भारत @2047' या संकल्पनेच्या दिशेने युवा नागरिकांना त्यांच्या कल्पना, दृष्टिकोन आणि नाविन्यपूर्ण उपाय मांडण्यासाठी एक सुटसुटीत व गुणवत्तेवर आधारित व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. गुणवंत तरुणांना सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची आणि राष्ट्रउभारणीत आपले योगदान देण्याची संधी निर्माण करून देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाशी हा उपक्रम तंतोतंत सुसंगत आहे.
गुणवत्तेवर आधारित राष्ट्रीय युवा नेतृत्वाची वाटचाल
'VBYLD 2027' ही उपक्रमप्रणाली तळागाळापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंतच्या युवा नेतृत्वाचा शोध घेऊन त्यांना घडवण्यासाठी आखण्यात आलेल्या टप्प्याटप्प्यांच्या आणि सुटसुटीत निवड प्रक्रियेचा अवलंब करते. 'विकसित भारत चॅलेंज'चा प्रवास पुढील टप्प्यांत पार पडतो:
विकसित भारत प्रश्नमंजुषा → विकसित भारत निबंध स्पर्धा → जिल्हास्तरीय पीपीटी (PPT) चॅम्पियनशिप → राज्य/केंद्रशासित प्रदेश स्तरीय VBYLD → राष्ट्रीय VBYLD
'VBYLD 2027' निवड प्रक्रियेचा पहिला टप्पा असलेली 'विकसित भारत प्रश्नमंजुषा' 17 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत 'माय भारत' (MY Bharat) पोर्टलवर आयोजित करण्यात आली होती, तसेच याला समांतर अशी प्रश्नमंजुषा 'मायगव्ह' (MyGov) प्लॅटफॉर्मवरही घेण्यात आली होती. या प्रश्नमंजुषेत 20 प्रश्नांचा समावेश होता, ज्यासाठी जास्तीत जास्त 20 गुण आणि 10 मिनिटांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली होती.
प्रश्नमंजुषा फेरीत उत्तीर्ण झालेले सुमारे 5.7 लाख तरुण आता पुढच्या टप्प्यात म्हणजे विकसित भारत निबंध स्पर्धेमध्ये प्रवेश करतील. या टप्प्यात त्यांना आपापल्या क्षेत्रासाठी निश्चित केलेल्या विषयावर 'माय भारत' (MY Bharat) पोर्टलवर 500 शब्दांचा निबंध सादर करावा लागेल. निबंध आणि सादरीकरणाच्या (प्रेझेंटेशन) फेऱ्यांसाठी ठरवण्यात आलेले विषय खालीलप्रमाणे आहेत. (राज्यांनुसार विषयांची सविस्तर मांडणी 'माय भारत' पोर्टलवर उपलब्ध आहे):
1. भविष्यातील शासनप्रणाली, नागरी परिवर्तन आणि नागरिक सेवा
2. हवामान सुरक्षा, सीमावर्ती भाग आणि शाश्वत पर्वतीय विकास
3. लोकसंख्याशास्त्रीय लाभांश आणि मानवी भांडवल विकास
4. शाश्वत औद्योगिकीकरण आणि संसाधन-आधारित विकास
5. 'ॲक्ट ईस्ट' धोरण, दळणवळण आणि सांस्कृतिक नेतृत्व
6. उत्पादन क्षेत्र, उद्योजकता आणि हरित विकास
7. आदिवासी नेतृत्व, नैसर्गिक संसाधने आणि सर्वसमावेशक विकास
8. नवकल्पना अर्थव्यवस्था, पर्यटन आणि सर्जनशील उद्योग
9. तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि भविष्याची सज्जता
10. नील अर्थव्यवस्था, मानवी भांडवल आणि जागतिक स्पर्धात्मकता
'माय भारत' पोर्टलवर 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत कोणत्याही 23 भाषांपैकी एका भाषेत निबंध लिहिता येतील. उत्कृष्ट निबंध सादर करणाऱ्या युवकांची जिल्हास्तरीय प्रत्यक्ष सादरीकरण फेरीसाठी निवड केली जाईल; ही फेरी सर्व जिल्ह्यांमध्ये प्रथमच आयोजित केली जात आहे. त्यानंतर निवडलेले सहभागी आपापल्या राज्य/केंद्रशासित प्रदेश स्तरीय VBYLD मध्ये सादरीकरणासाठी पात्र ठरतील. 10 प्रादेशिक विषयांतर्गत सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून निवडलेले सहभागी 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग' (VBYLD) च्या राष्ट्रीय पथकाचा भाग बनतील.
शैलेश पाटील/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2319842)
अभ्यागत कक्ष : 10