संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील माउंटेन गार्डियन 2026 या संयुक्त लष्करी सरावाला उत्तराखंडमध्ये प्रारंभ

Posted On: 05 OCT 2026 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2026

भारत आणि संयुक्त अरब अमिराती मधील माउंटेन गार्डियन 2026 या संयुक्त लष्करी सरावाला आज उत्तराखंडमधील चौबटिया इथल्या परदेशी प्रशिक्षण केंद्रात प्रारंभ झाला. हा सराव 18 ऑक्टोबर 2026 पर्यंत चालणार आहे. या सरावात पर्वतीय युद्धशास्त्रावर भर दिला जाणार आहे. त्याअंतर्गत परस्पर समन्वयीत कार्यान्वयन, परस्पर आकलन आणि सहकार्य वृद्धींगत करणे हा या सरावाचा उद्देश आहे. 

या युद्धसरावात दोन्ही देशांच्या सैन्याचे समान प्रतिनिधित्व असून, दोन्ही देशांचे एकूण 92 सैनिक यात सहभागी झाले आहेत. भारतीय लष्कराच्या पथकात भैरव बटालियनच्या सैनिकांचा समावेश आहे. तर संयुक्त अरब अमिरातीच्या लष्करी पथकात माउंटेन इन्फंट्री बटालियनचे सैनिक सहभागी झाले आहेत. या सरावात विशिष्ट भूमिकांसाठी दोन्ही देशांच्या महिला अधिकारी आणि महिला सैनिक देखील सहभागी झाल्या आहेत.

या सरावादरम्यान दोन्ही देशांच्या सैन्याचे जवान संयुक्त नियोजन, रणनीतीविषयक सराव, गोळीबाराचा सराव, टेहळणी व्यवस्थेची उभारणी, ड्रोनचा वापर, शारीरिक क्षमता वाढवणारे प्रशिक्षण, पर्वत चढाई, अडथळ्यांच्या प्रदेशातील सराव आणि एकात्मिक क्षेत्रीय सरावात भाग घेणार आहेत. या प्रशिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. तसेच आव्हानात्मक पर्वतीय भागात उपयुक्त ठरणारी युद्धकौशल्ये, तंत्रज्ञान आणि कार्यपद्धतींची परस्परांसोबत देवाणघेवाणही केली जाणार आहे.

माउंटेन गार्डियन 2026 या सरावामुळे दोन्ही देशांच्या सैन्याला व्यावसायिक तज्ञतेचे अनुभव परस्परांसोबत सामायिक करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच आपापली लष्करी कौशल्ये वृद्धींगत करता येणार आहेत. या सरावामुळे भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील लष्करी सहकार्य अधिक दृढ होईल, तसेच दोन्ही देशांमधील मैत्री आणि विश्वासाचे नाते अधिक वृद्धींगत होणार आहे.


निलिमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2319382) अभ्यागत कक्ष : 6