विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
टीडीबी-डीएसटीने स्वदेशी एआय व्हिजन सिस्टम ऑन चिप विकसित करण्यासाठी बिगएंडियन सेमीकंडक्टर्ससोबत 130 कोटी रुपयांच्या संशोधन विकास आणि नवोन्मेष निधी सहाय्याचा केला करार
प्रोजेक्ट वीरएआय सुरक्षित, ॲप्लिकेशन-विशिष्ट सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाला टीआरएल-5 वरून टीआरएल-9 पर्यंत पुढे नेणार
Posted On:
05 OCT 2026 5:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2026
महत्त्वाच्या आणि उदयोन्मुख ऍप्लिकेशन्ससाठी स्वदेशी सेमीकंडक्टर क्षमता उभारण्याच्या भारताच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत(डीएसटी) असलेल्या तंत्रज्ञान विकास मंडळाने (टीडीबी) कर्नाटकमधल्या बंगळुरू इथल्या मे. बिगएंडियन (BigEndian) सेमीकंडक्टर्ससोबत, संशोधन विकास आणि नवोन्मेष निधी (आरडीआय) अंतर्गत 130 कोटी रुपयांच्या वित्तीय साहाय्याकरिता करार केला आहे.
प्रोजेक्ट वीरएआय (Project VeerAI), या प्रकल्पाचा एकूण खर्च 260 कोटी रुपये असून याचे उद्दिष्ट संबंधित तंत्रज्ञानाला 'टेक्नॉलॉजी रेडीनेस लेव्हल' (टीआरएल)-5 वरून टीआरएल-9 पर्यंत नेणे हे आहे. यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य वैकल्पिक परिवर्तनीय कर्जाद्वारे (ओसीडी) पुरवले जाईल. सुरक्षित, बुद्धिमान आणि ऍप्लिकेशन विशिष्ट सेमीकंडक्टर उपायांची वाढती गरज लक्षात घेऊन, 'प्रोजेक्ट वीर-एआय' अंतर्गत एका स्वदेशी तंत्रज्ञान मंचावर कॅमेरा-केंद्रित 'एआय व्हिजन सिस्टम-ऑन-चिप' विकसित करण्याचे नियोजन आहे.
हा प्रकल्प, पहारा ठेवणाऱ्या ऍप्लिकेशन्ससाठी विशेषतः सीसीटीव्ही प्रणालींसाठी सुरक्षित एआय चिपच्या विकासावर केंद्रित आहे. यामागचा उद्देश बाहेर विकसित सेमीकंडक्टर आणि तंत्रज्ञान पुरवठा साखळ्यांवरील अवलंबित्व कमी करणे, हा आहे. प्रस्तावित प्लॅटफॉर्म अथवा मंच एआय प्रोसेसिंग आणि स्मार्ट वैशिष्ट्यांना सुरक्षा, गोपनीयता आणि कनेक्टिव्हिटी क्षमतांसह एकत्रित करण्यासाठी डिझाइन केले आहे. हे तंत्रज्ञान सुरुवातीला भारत आणि ग्लोबल साउथमधील सीसीटीव्ही आणि पाळत ठेवण्याच्या ऍप्लिकेशन्ससाठी विकसित केले जात आहे आणि अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा विस्तार करण्याची योजना आहे. पहाऱ्याव्यतिरिक्त संरक्षण, ऑटोमोटिव्ह, औद्योगिक आणि वैद्यकीय क्षेत्रांमध्येही या प्लॅटफॉर्मचा वापर कल्पित असून स्वदेशी एआय-सक्षम सेमीकंडक्टर सोल्यूशन्ससाठी एक व्यापक बाजारपेठ निर्माण होईल.
हा प्रकल्प, देशाच्या वाढत्या VLSI डिझाईन आणि सेमीकंडक्टर प्रतिभेचा उपयोग करून घेण्याचा आणि स्वदेशी डिझाईन क्षमता मोठ्या उत्पादन मंचावर रूपांतरित करण्याचा प्रयत्न करतो. सर्वसाधारण उपयोगांसाठीच्या चिप्सऐवजी अप्लिकेशन विशिष्ट सिस्टीम ऑन चिप्सवर लक्ष केंद्रित करून, हा कार्यक्रम विशिष्ट औद्योगिक गरजा पूर्ण करण्याबरोबरच तंत्रज्ञानाचा जलद वापर आणि व्यापारीकरण सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. कनेक्टेड उपकरणे आणि बुद्धिमान प्रणाली महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांमध्ये अधिकाधिक अंतर्भूत होत असल्याने, स्वदेशी एआय आणि सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाच्या विकासाला वाढते महत्त्व प्राप्त होत आहे. सुरक्षित आणि ऍप्लिकेशन विशिष्ट चिप्स डेटा सुरक्षा, गोपनीयता, उपकरणस्तरीय बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान सार्वभौमत्वाशी संबंधित गरजा पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
संशोधन विकास आणि नवोन्मेष निधी साहाय्याच्या माध्यमातून बिगएंडियन सेमीकंडक्टर्स, प्रोजेक्ट वीरएआयला टीआरएल -5 वरून टीआरएल-9 पर्यंत प्रगतीपथावर नेण्यासाठी आवश्यक असणारे पुढील तंत्रज्ञान विकास, प्रमाणीकरण, एकीकरण, चाचणी आणि स्केल-अप उपक्रम हाती घेईल.
तंत्रज्ञान विकास मंडळाचे सचिव राजेश कुमार पाठक म्हणाले, ''सेमीकंडक्टर्स हा जवळपास प्रत्येक उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा पाया आहेत आणि ऍप्लिकेशन विशिष्ट एआय चिप्समध्ये स्वदेशी क्षमता उभारणी, हा देशाची तंत्रज्ञान परिसंस्था बळकट करण्यातला एक महत्त्वपूर्ण भाग आहे. प्रगत विकासाकडून व्यावसायिक तैनातीकडे जाण्यात भरीव गुंतवणुकीची आवश्यकता असलेल्या तंत्रज्ञानांना सातत्यपूर्ण पाठबळ संशोधन विकास आणि नवोन्मेष निधीमुळे शक्य होते. बिगएंडियन सेमीकंडक्टर्सला दिलेले साहाय्य, तंत्रज्ञान विकास मंडळाचा भारतीय कंपन्यांना धोरणात्मक सेमीकंडक्टर क्षमता विकसित करण्यास आणि देशांतर्गत डिझाइन कौशल्याचे उपयोजनीय उत्पादनांमध्ये रूपांतर करण्यास सक्षम करण्यावर असलेला भर प्रतिबिंबित करतो. ''
बिगएंडियन सेमीकंडक्टर्सच्या प्रवर्तकांनी सांगितले, ''तंत्रज्ञान विकास मंडळाकडून मिळणाऱ्या आरडीआय पाठबळामुळे वीरएआय प्रकल्पाच्या विकास आणि प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेला गती देणे तसेच आपले एआय व्हिजन सिस्टीम ऑन चिप्स, व्यावसायिक सज्जतेकडे नेणे शक्य होईल. भारताच्या स्वदेशी सेमीकंडक्टर डिझाइन क्षमतांचा लाभ घेत, पाळत ठेवणे आणि इतर महत्त्वपूर्ण क्षेत्रांच्या गरजा पूर्ण करू शकेल अशा सुरक्षित आणि ऍप्लिकेशन विशिष्ट सेमीकंडक्टर मंचाची उभारणी करण्यावर आमचा भर आहे. ही भागीदारी तंत्रज्ञानाला टीआरएल -9 पर्यंत नेण्यास आणि देशांतर्गत अधिक सक्षम सेमीकंडक्टर परिसंस्थेच्या विकासात योगदान देण्यास आम्हाला मदत करेल.”

नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2319261)
अभ्यागत कक्ष : 8