उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती  सी. पी. राधाकृष्णन यांनी भारत मंडपम येथे ICSIच्या 58 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित.


“सुशासन ही गुंतवणूकदारांचा विश्वास टिकवून ठेवणारी अदृश्य पायाभूत सुविधा आहे”: उपराष्ट्रपती

“कंपनी सचिव हे सुशासनाचे संरक्षक आणि भारत इंकच्या विश्वासाच्या संरचनेचे केंद्रबिंदू आहेत”: उपराष्ट्रपती

“आयसीएसआय, आयसीएआय आणि आयसीएमएआय हे विकसित भारताचे प्रमुख संस्थात्मक आधारस्तंभ आहेत”: उपराष्ट्रपती

“तंत्रज्ञान निर्णय प्रक्रियेत परिवर्तन घडवू शकते, मात्र सचोटी आणि उत्तरदायित्व मानवीच राहतात”: उपराष्ट्रपती

Posted On: 04 OCT 2026 2:54PM by PIB Mumbai

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे भारतीय कंपनी सचिव संस्थेच्या (आयसीएसआय) 58व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. आयसीएसआयच्या संपूर्ण समुदायाला शुभेच्छा देताना त्यांनी पारदर्शक, नैतिक आणि सर्वसमावेशक कॉर्पोरेट प्रशासन बळकट करण्याच्या संस्थेच्या जवळपास सहा दशकांच्या वाटचालीचे कौतुक केले.

सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले की, संस्थेतील परिवर्तन हे या व्यवसायाच्या उत्क्रांतीचे प्रतिबिंब आहे. आज कॉर्पोरेट क्षेत्रातील पारदर्शकता, गुंतवणूकदारांचा विश्वास आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताचे स्थान बळकट करण्यात या व्यवसायाची महत्त्वाची भूमिका आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रगत डेटा विश्लेषण आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या व्यावसायिक प्रारूपांनी प्रभावित झालेल्या या युगात “सुशासनाचे संरक्षक” म्हणून कंपनी सचिवांनी भारत इंकच्या कायदेशीर, धोरणात्मक आणि नैतिक पायाभूत तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले. “तंत्रज्ञानामुळे माहिती निर्माण करण्याच्या आणि निर्णयांना पाठबळ देण्याच्या पद्धतीत परिवर्तन होऊ शकते; मात्र सचोटी, उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि जबाबदारी या मानवीच राहतात,” असे त्यांनी सांगितले.

विश्वास, पारदर्शकता आणि कंपनी प्रशासन ही आधुनिक अर्थव्यवस्थेची अदृश्य पायाभूत व्यवस्था असल्याचे राधाकृष्णन म्हणाले. अर्थव्यवस्थेच्या सातत्यपूर्ण प्रगतीसाठी गुंतवणूकदारांचा विश्वास आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कंपनी सेक्रेटरी या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आहेत. उद्योग, स्टार्ट-अप, कौटुंबिक व्यवसाय आणि नोंदणीकृत कंपन्यांना जबाबदारीने प्रगती करण्यास मदत करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले. विकसित भारत घडवण्यासाठी बळकट संस्था आणि चांगले प्रशासन हे भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांइतकेच महत्त्वाचे असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले. भारताच्या विकसित भारत @2047 या प्रवासात आयसीएआय, आयसीएमएआय आणि आयसीएसआय या संस्थांची भूमिका एकमेकांना पूरक असल्याचे त्यांनी सांगितले. मजबूत कंपनी आणि आर्थिक व्यवस्था उभारण्यासाठी या व्यावसायिक संस्था महत्त्वाच्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

या क्षेत्रात तरुणांना अधिक संधी मिळाव्यात, असे आवाहन राधाकृष्णन यांनी केले. आयसीएसआयच्या शुल्कमाफीच्या उपक्रमाचे कौतुक करत, विद्यार्थ्यांपर्यंत अधिक पोहोचण्याचे काम सुरू ठेवावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी एमएसएमई अनुपालन दिनदर्शिका 2027 चे उद्घाटन केले. एमएसएमई आणि स्टार्ट-अपसाठी आयसीएसआयने घेतलेल्या उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले. यात आयसीएसआय एमएसएमई अँड स्टार्ट-अप कॅटॅलिस्ट या उपक्रमाचाही समावेश आहे. शहीद की बेटी या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय संरक्षण निधी आणि संरक्षण मंत्रालयाच्या सशस्त्र दल ध्वज दिन निधीला आयसीएसआयने दिलेल्या योगदानाचेही त्यांनी कौतुक केले. उद्देश चांगला असेल, तर सर्व काही चांगले होईल, असे राधाकृष्णन म्हणाले.

भाषणाचा समारोप करताना, उपराष्ट्रपतींनी आयसीएसआयला या व्यवसायावर ठेवलेला विश्वास कायम राखण्यासोबतच बळकट, आत्मनिर्भर आणि विकसित भारत @2047 घडवण्यासाठी योगदान देत राहावे, असे आवाहन केले. भारताने जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचे ध्येय ठेवावे, असे उपराष्ट्रपती म्हणाले. इतर देशांवर आपल्या अटी लादण्यासाठी नव्हे, तर कोणालाही आपल्यावर नको असलेल्या अटी लादता येऊ नयेत, या उद्देशाने भारताने हे ध्येय ठेवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सत्यम् वद, धर्मम् चर या चिरंतन विचाराचाही त्यांनी उल्लेख केला. आयसीएसआयच्या स्थापना दिनानिमित्त त्यांनी आयसीएसआय परिवाराला शुभेच्छा दिल्या. यावेळी आयसीएसआयचे अध्यक्ष सी. एस. पवन चंडक, राज्यसभेच्या माजी खासदार डॉ. सोनल मानसिंग आणि आयसीएसआयचे सचिव सी. एस. आशीष मोहन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

***

नेहा कुलकर्णी/गजेंद्र देवडा /राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2318900) अभ्यागत कक्ष : 16