अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नॅबकिसानकडून भारतातील पहिले ‘वॉश’ आधारित सामाजिक रोखे जारी, ₹180 कोटींचा निधी संकलित

Posted On: 03 OCT 2026 12:01PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) उपशाखा असलेल्या नॅबकिसान फायनान्स लिमिटेडने 1 ऑक्टोबर 2026 रोजी भारतातील पहिल्या सामाजिक रोख्यांची मुंबईच्या राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसइ) नोंदणी केली. हे रोखे केवळ पाणी, स्वच्छता आणि आरोग्य क्षेत्राला समर्पित आहेत.   

हे रोखे जारी करताच त्याला गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आणि 1.8 पटींनी त्याची विक्री झाल्यामुळे नॅबकिसानकडे ₹180 कोटींचा निधी जमा झाला. पाच वर्षांच्या म्हणजेच सप्टेंबर 2031 पर्यंतच्या मुदतीच्या या रोख्यांचा व्याजदर 8.10 टक्के असून त्याला क्रिसिल एएए (स्टेबल) व केअर एएए (स्टेबल) हे सर्वोच्च देशांतर्गत पतमानांकन मिळाले आहे.  ग्रामीण व वंचित समाजातील आरोग्य, उपजीविका व राहणीमान सुधारण्यासाठी सुरक्षित पाण्याची उपलब्धता, स्वच्छता आणि आरोग्य पर्यायांसाठी हा निधी उपयोगात आणला जाईल.

या नोंदणी समारंभामध्ये नाबार्ड, नॅबकिसान, वॉटर डॉट ओआरजी, ट्रस्ट ग्रुप व एनएसइच्या प्रतिनिधींनी आपले विचार मांडले. त्यानंतर पारंपरिक घंटा वाजवण्यात आली.

नाबार्डचे अध्यक्ष डॉ. शाजी कृष्णन व्ही. म्हणाले की, विकासाच्या प्रमुख घटकांसाठी निधी उभारण्याची नावीन्यपूर्ण वित्त यंत्रणांची क्षमता ‘वॉश’ रोख्यांच्या यशस्वी नोंदणीद्वारे दिसून आली. सुरक्षित पाण्याची उपलब्धता व स्वच्छता यातील सुधारणेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य, उपजीविका व राहणीमान चांगले होईल. विकास संस्था बँकांसाठी असे प्रकल्प आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.   

नॅबकिसानचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी इमॅन्युएल गणेशन यावेळी म्हणाले की, भांडवली बाजारातील घटकदेखील उल्लेखनीय सामाजिक काम करत विकास क्षेत्रांसाठी कशाप्रकारे संसाधने उपलब्ध करुन देऊ शकतात हे वॉश रोख्यांनी दाखवून दिले. गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद हा समावेशी व शाश्वत ग्रामीण विकासाचे साधन म्हणून शाश्वत वित्तपुरवठ्यावरील वाढता विश्वास आहे, असे ते म्हणाले.

या आर्थिक व्यवहारांना वॉटर डॉट ओआरजी कंपनीचे तांत्रिक सल्लागार व माहिती भागीदार म्हणून सहकार्य मिळाले तसेच हे रोखे जारी करण्यामधे व त्यांच्या नोदणी प्रक्रियेत योगदान देणाऱ्या शेअर बाजारातील संस्था, सल्लागार, विश्वस्त आणि व्यवस्थापकांचाही पाठिंबा मिळाला.

भारतातील पहिल्या वॉश आधारित सामाजिक रोख्यांच्या नोंदणीने नाबार्ड व नॅबकिसानची नावीन्यपूर्ण वित्तपुरवठा पर्यायांप्रतीची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली. या वित्त पुरवठ्यामुळे शाश्वत व समावेशी ग्रामीण विकासाला मदत मिळेल तसेच देशाच्या शाश्वत वित्तीय बाजाराचे दृढीकरण होईल.    

***

शिल्पा पोफळे/सुरेखा जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2318604) अभ्यागत कक्ष : 15
Read this releasein: English , Gujarati , Urdu