कायदा आणि न्याय मंत्रालय
अबू धाबी इथे झालेल्या 15 व्या संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताचे न्याय सुधारणा आणि जागतिक कायदेशीर भागीदारी विषयक सादरीकरण
Posted On:
30 SEP 2026 6:38PM by PIB Mumbai
विधी आणि न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अर्जुन राम मेघवाल यांनी अबू धाबी इथे झालेल्या 15 व्या संयुक्त राष्ट्र परिषदेदरम्यान संयुक्त अरब अमिरातीचे न्यायमंत्री अब्दुल्ला सुलतान बिन अवद अल नुईमी यांची भेट घेतली. या भेटीत भारताची तंत्रज्ञानावर आधारित न्यायव्यवस्था, नवीन फौजदारी कायदे आणि जागतिक कायदे विषयक सहकार्य यांवर प्रकाश टाकण्यात आला.
‘गुन्हे प्रतिबंध, फौजदारी न्याय आणि कायद्याचे राज्य याला गती: डिजिटल युगात लोक आणि पृथ्वीचे संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी 2030 च्या उद्दिष्टांची पूर्तता’, या संकल्पनेवर, अबू धाबी इथे आयोजित पंधराव्या संयुक्त राष्ट्र गुन्हे प्रतिबंध आणि फौजदारी न्याय परिषदेत, भारताने आधुनिक, नागरिक-केंद्रित, तंत्रज्ञान-सक्षम आणि जागतिक स्तरावर जोडलेली न्यायव्यवस्था उभारण्यासाठी केलेले आपले प्रयत्न जगासमोर आणले.
संयुक्त राष्ट्र परिषदेला संबोधित करताना, अर्जुन राम मेघवाल यांनी भारतातील नवीन गुन्हेगारी कायदे- भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम, आणि तंत्रज्ञान, जलद न्याय, न्यायवैद्यक तपास आणि डिजिटल-प्रथम प्रक्रियेवर असलेला त्याचा भर अधोरेखित केला. इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (आय4सी) आणि नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलद्वारे सायबर गुन्हांना दिला जाणारा भारताचा डिजिटल प्रतिसाद, यावर त्यांनी प्रकाश टाकला. यामुळे गुन्ह्याची त्वरित माहिती, नोंद फसवणूक प्रतिबंध आणि बनावट खाती गोठवणे शक्य होते.
मेघवाल यांनी दहशतवादाविरोधात भारताच्या शून्य-सहिष्णुतेच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आणि दहशतवाद, अमली पदार्थांची तस्करी, आंतरराष्ट्रीय वन्यजीव गुन्हे, अवैध वृक्षतोड, विषारी कचरा टाकणे तसेच इतर संघटित आणि पर्यावरणीय गुन्ह्यांविरोधात जागतिक सहकार्याच्या गरजेवर भर दिला.
भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील वाढत्या कायदेशीर भागीदारीवरही, विशेषतः आंतरराष्ट्रीय लवाद आणि पर्यायी विवाद निवारण क्षेत्रातील भागीदारीवरही यावेळी प्रकाश टाकण्यात आला. इंडिया इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटर (आयआयएसी) आणि दुबई इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटर (डीआयएसी) यांच्यातील भागीदारी ज्ञानाची देवाणघेवाण, व्यावसायिक प्रशिक्षण, संयुक्त कार्यक्रम, संशोधन आणि डिजिटल विवाद-निराकरण यंत्रणा मजबूत करत आहे. डीआयएसी एईडी 80 अब्ज (सुमारे 21.8 अब्ज डॉलर्स) पेक्षा जास्त मूल्याच्या जवळजवळ 5,000 प्रकरणांची हाताळणी करते.





***
राधिका अघोर/राजश्री आगाशे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2317367)
अभ्यागत कक्ष : 9