शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी आणि फ्रान्सचे उच्च शिक्षण, संशोधन आणि अंतराळ मंत्री महामहीम फिलिप बाप्टिस्ट यांच्यात नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक संपन्न


उभय मंत्री महोदयांनी शैक्षणिक आदान-प्रदान, संस्थात्मक संबंध, संशोधन सहकार्य, नवोन्मेष आणि सहकार्याच्या उदयोन्मुख क्षेत्रांवर चर्चा केली

फ्रान्सचे मंत्री महामहीम फिलिप बाप्टिस्ट 28 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

Posted On: 28 SEP 2026 9:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2026

 

केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज नवी दिल्लीत  फ्रान्सचे उच्च शिक्षण, संशोधन आणि अंतराळ मंत्री महामहीम  फिलिप बॅप्टिस्ट यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली. शिक्षण, संशोधन, नवोन्मेष, शैक्षणिक आदान-प्रदान आणि संस्थात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील भारत आणि फ्रान्स यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उपायांवर या दोन्ही मंत्र्यांनी चर्चा केली.

फ्रान्सचे मंत्री आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत करताना प्रल्हाद जोशी यांनी भारत-फ्रान्स दरम्यानच्या दीर्घकालीन भागीदारीचा विशेषत्वाने उल्लेख करून, शिक्षण क्षेत्रातील सहकार्य हा द्विपक्षीय संबंधांचा महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे अधोरेखित केले. ते म्हणाले की, भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026 शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्याची एक योग्य संधी उपलब्ध करून देत आहे.

   

बैठकीदरम्यान, दोन्ही देशांनी उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील संभाव्य सहकार्याबाबत सखोल चर्चा केली. यात, उभय देशांतील संस्थात्मक संबंध अधिक दृढ करणे, विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधकांचे आदान-प्रदान आणि संयुक्त शैक्षणिक कार्यक्रम आणि देवाण-घेवाणीच्या संधींचा विस्तार करण्यासह उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील संभाव्य सहभाग यांचा समावेश होता. तसेच, संस्थात्मक संवाद, संयुक्त शैक्षणिक उपक्रम आणि संशोधन यांवर भर देत जीवन विज्ञान, सामाजिक शास्त्रे आणि मानव शास्त्र या क्षेत्रांत अधिक सहकार्य करण्याबाबतच्या संधींचा यावेळी धांडोळा घेण्यात आला.

उभय देशांमधील संशोधन, नवोन्मेष  आणि ज्ञान-विषयक भागीदारीला अधिक चालना देण्याबाबत मंत्र्यांनी विचार-विनिमय केला. तसेच, विद्यमान संस्थात्मक सहकार्याचा विस्तार करण्याच्या आणि संयुक्त शैक्षणिक आणि  संशोधन उपक्रमांसाठी नवीन वाटा निर्माण करण्याच्या संधींवरही त्यांनी चर्चा केली. भारतात, विशेषतः गुजरातच्या 'गिफ्ट सिटी'मध्ये (GIFT City) आणि जिथे फ्रेंच कंपन्या कार्यरत आहेत आणि  त्यांना तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे अशा ठिकाणी शैक्षणिक संकुले सुरू करण्याच्या शक्यतेचा विचार करण्याचे फ्रान्समधील उच्च शिक्षण संस्थांना आवाहन करण्यात आले.

लोकांमधील परस्पर संबंधांचे महत्त्व ओळखून, दोन्ही देशांनी भाषा शिक्षण आणि शिक्षक शिक्षण मजबूत करण्याच्या, शैक्षणिक कौशल्य सामायिक करण्याच्या आणि तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाला  प्रोत्साहन देण्यासाठीच्या संधींचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. 

   

 

* * *

सुषमा काणे/सविता म्‍हस्‍कर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2316271) अभ्यागत कक्ष : 8