अंतराळ विभाग
azadi ka amrit mahotsav

मानवी अंतराळ मोहिमा, स्टार्ट-अप्स आणि नवीन अंतराळ परिसंस्थेवर लक्ष केंद्रित करत भारत-फ्रान्स अंतराळ सहकार्य नव्या टप्प्यात दाखल : डॉ. जितेंद्र सिंह


फ्रान्सचे उच्च शिक्षण, संशोधन आणि अंतराळ मंत्री फिलिप बॅप्टिस्ट यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधीमंडळाने नवी दिल्लीत डॉ. जितेंद्र सिंह यांची घेतली भेट

भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026 मुळे वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान सहकार्य अधिक दृढ करण्याचे नवीन मार्ग खुले झाले : डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 28 SEP 2026 6:44PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2026

 

भारत-फ्रान्स अंतराळ सहकार्य 1960 च्या दशकातील सुरुवातीच्या साउंडिंग रॉकेट प्रयोगांकडून आता संयुक्त उपग्रह मोहिमा, प्रक्षेपण यान तंत्रज्ञान, मानवी अंतराळ मोहिमा आणि उदयोन्मुख अंतराळ अनुप्रयोगांचा समावेश असलेल्या एका व्यापक आणि विस्तारणाऱ्या भागीदारीत रूपांतरित झाले आहे, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले.

दोन्ही देशांमधील दीर्घकालीन संबंधांमुळे आता वेगाने विस्तारणाऱ्या अंतराळ क्षेत्रात अधिक सखोल सहभागासह, सरकारे, संशोधन संस्था, उद्योग आणि स्टार्ट-अप्स यांना एकत्र आणून एक मोठी परिसंस्था निर्माण करण्याची संधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.

फ्रान्सचे उच्च शिक्षण, संशोधन आणि अंतराळ मंत्री, प्रा. फिलिप बाप्टिस्ट यांच्या नेतृत्वाखालील एका उच्चस्तरीय फ्रेंच प्रतिनिधीमंडळाने आज नवी दिल्लीत डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. या बैठकीत अंतराळ शिखर परिषद, भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026 तसेच अंतराळ, सेफिप्रा (CEFIPRA) आणि ब्लू इकॉनॉमी (नील अर्थव्यवस्था) यासह वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्यातील प्राधान्यक्रमांवर चर्चा झाली. प्रतिनिधीमंडळाची व्यापकता हीच विविध विज्ञान क्षेत्रांमधील भारत-फ्रान्स सहकार्याच्या विस्तृत स्वरूपाचे प्रतिबिंब आहे, असे सिंह म्हणाले.

भारताच्या अंतराळ क्षेत्रात सुरू असलेल्या परिवर्तनामुळे दोन्ही देशांना सरकारी संस्था आणि पारंपरिक अंतराळ संस्थांच्या पलीकडे सहकार्य वाढवण्यासाठी नवीन संधी निर्माण झाल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. भारताच्या अंतराळ क्षेत्रातील सुधारणा आणि खाजगी परिसंस्थेच्या वाढीचा संदर्भ देत ते म्हणाले की, 400 हून अधिक भारतीय अंतराळ स्टार्टअप्स आता रॉकेट निर्मिती, उपग्रह निर्मिती आणि अंतराळ अनुप्रयोग यांसारख्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. भारत-फ्रान्स सहकार्याच्या पुढील टप्प्यात दोन्ही बाजूंच्या सरकारी संस्था, उद्योग आणि स्टार्टअप्सना एकत्र आणून एक मोठी परिसंस्था आणि व्यापक संसाधन साठा तयार करता येईल, असे ते म्हणाले.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन झालेले 'भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026' हे नवोन्मेष आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील भागीदारी पुढे नेण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देते, असे जितेंद्र सिंह यांनी नमूद केले.

भारत-फ्रान्स अंतराळ भागीदारीला वैज्ञानिक सहकार्याच्या व्यापक संदर्भात पाहण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली. या सहकार्यात जैवतंत्रज्ञान, डिजिटल विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच सागरी विज्ञान यांचा समावेश आहे.

अवकाश, विज्ञान आणि सागरी क्षेत्रांमध्ये वाढत्या सहकार्यामुळे विविध संस्था आणि परिसंस्थेतील हितधारकांच्या सहभागातून एक व्यापक भारत-फ्रान्स भागीदारी निर्माण करण्याची संधी उपलब्ध होत आहे, असे त्यांनी सांगितले.

   

विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात भागीदारी पुढे नेण्याच्या भारताच्या दृष्टिकोनाशी फ्रान्स सहमत आहे असे फिलिप बाप्टिस्ट यांनी सांगितले. या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यात त्यांनी विशेष स्वारस्य व्यक्त केले. दोन्ही देशांतील संशोधन संस्था आणि स्टार्ट-अप्सना जोडण्याबद्दलही त्यांनी सकारात्मक मत व्यक्त केले. हे अधिक सक्षम आणि भविष्यवेधी भारत-फ्रान्स नवोन्मेष परिसंस्था निर्माण करण्याच्या सामायिक उद्दिष्टाचे प्रतिबिंब आहे.

 

* * *

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2316148) अभ्यागत कक्ष : 6