वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत-यूएई उच्चस्तरीय संयुक्त कृती दलाची 14 वी बैठक मुंबईत संपन्न


गुंतवणूक आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून भारत-यूएई भागीदारी महत्त्वपूर्ण परिवर्तनासाठी सज्ज- केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल

भारत-यूएईकडून सीईपीएच्या प्रगतीचा आढावा आणि संयुक्त गुंतवणूक प्रकल्पांना गती

Posted On: 28 SEP 2026 6:06PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2026

 

गुंतवणुकीवरच्या  भारत-यूएई (संयुक्त अरब अमिराती) उच्चस्तरीय कृती दलाची 14 वी बैठक आज मुंबईत झाली. या बैठकीचे सह-अध्यक्षपद केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि अबू धाबी इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटीचे (एडीआयए) व्यवस्थापकीय संचालक शेख हामेद बिन झायेद अल नाह्यान यांनी भूषवले.

भारत-यूएई उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना 2013 मध्ये भारत आणि यूएई यांच्यातील व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक बंध अधिक वृद्धिंगत करण्याकरिता झाली आहे. भारत-यूएई उच्चस्तरीय कृती दलाने, स्थापनेपासूनच भारत आणि यूएईमध्ये पुढील गुंतवणुकीच्या संधी व शक्यतांवर चर्चा करण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा उपलब्ध करण्यासोबतच दोन्ही देशांमधील गुंतवणूकदारांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठीचा मंच म्हणून काम केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मे 2026 मधील यूएई दौरा आणि सप्टेंबर 2026 मध्ये अबू धाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचा भारत दौरा यांसह नियमित होणाऱ्या उच्चस्तरीय आदानप्रदानामुळे धोरणात्मक दिशा मिळाली आहे. तसेच सातत्याने बळकट होत असलेल्या द्विपक्षीय भागीदारीला नवी गती मिळाली आहे.  

आजच्या बैठकीत व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित प्रमुख प्राधान्यक्रमांवर चर्चा करण्यात आली. यात द्विपक्षीय गुंतवणुकीचा ओघ विस्तारणे आणि सहयोगाच्या नवीन क्षेत्रांचा शोध घेणे यांसाठीच्या उपक्रमांचा समावेश होता. यूएई आणि भारत यांच्यातील आर्थिक भागीदारीचा विस्तार आणि धोरणात्मक महत्त्व सातत्याने वाढत आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये द्विपक्षीय व्यापार 101.25 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला. वर्ष  2025 मध्ये बिगर-तेल  व्यापार 76.2 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला. ही आकडेवारी दोन्ही देशांमधील वाढते व्यावसायिक संबंध आणि सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराचा (सीईपीए) प्रभाव दर्शवते. यूएई आणि भारत दोन्ही देश, वर्ष 2032 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 200 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याच्या सामायिक महत्त्वाकांक्षेसाठी निरंतर कार्यरत असून दोन्ही देश ऊर्जा, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता  यांसारख्या भविष्यातील विकासाला चालना देणाऱ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूकविषयक सहकार्य वृद्धिंगत करत आहेत.

या सकारात्मक पार्श्वभूमीवर सह-अध्यक्षांनी बैठकीच्या प्रारंभी, यूएई आणि भारत यांच्यातील वाढता व्यापार, सीईपीएची भूमिका,द्विपक्षीय गुंतवणूक करार आणि करआकारणी, परस्पर कायदेशीर सहकार्य यांसारख्या इतर करारांनी द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यात बजावलेली भूमिका, यांचा उल्लेख केला.  दोन्ही बाजूंनी सीईपीएच्या संबंधित उप-समित्यांच्या कामाचा आढावा घेतला आणि अधिकाधिक गुंतागुंतीच्या होत चाललेल्या भू-राजकीय व आर्थिक परिस्थितीत व्यापाराची लवचिकता अधिक बळकट करण्याच्या उपायांवर चर्चा केली.

संयुक्त कार्यदलाने गुजरातमधील फूड पार्क प्रकल्पासह अनेक संयुक्त गुंतवणूक प्रकल्प आणि सहकार्याच्या क्षेत्रांमधील सकारात्मक प्रगतीचा आढावा घेतला. इन्व्हेस्ट इंडिया कार्यालयाचे संयुक्त अरब अमिराती मधील कार्यालय 2026 च्या अखेरपर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा असल्याचे दोन्ही बाजूनी नमूद  केले. अमिरात एनबीडीने भारतातील आरबीएल बँकेतील मोठे  भागभांडवल सुमारे 3 अब्ज अमेरिकन डॉलर्समध्ये, आणि इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने (आयएचसी) भारतातील सन्मान कॅपिटलमध्ये 1 अब्ज अमेरिकन डॉलर्स गुंतवणूक केल्याचे, तसेच ओदिशामध्ये एकात्मिक ॲल्युमिनियम संकुलाच्या उभारणीसाठी 11.5 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या संयुक्त गुंतवणुकीच्या उद्देशाचे स्वागत करण्यात आले. भारतातील गिफ्ट सिटीमध्ये मश्रेक बँक, फर्स्ट अबू धाबी बँक (एफएबी) आणि अबू धाबी नॅशनल इन्शुरन्स कंपनी (एडीएनआयसी) यांच्या शाखा कार्यालयांच्या यशस्वी उद्घाटनाचीही त्यांनी नोंद घेतली. दोन्ही बाजूंनी मे 2026 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या संयुक्त अरब अमिराती  दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य करारांनुसार ऊर्जा सहकार्याचाही आढावा घेतला. परस्पर गुंतवणुकीची व्यापकता आणि सखोलता पाहता, ही खरोखरच दोन्ही देशांमधील एक बहुआयामी भागीदारी आहे.

वित्तीय क्षेत्रातील सहकार्य हा संयुक्त अरब अमिराती-भारत आर्थिक भागीदारीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. संयुक्त अरब अमिराती  आणि भारताच्या मध्यवर्ती बँकांनी स्थानिक चलनातील व्यवहार, पेमेंट आणि मेसेजिंग प्रणालींचे एकत्रीकरण, आणि मध्यवर्ती बँकेची डिजिटल चलने यांसारख्या उपक्रमांवर केलेल्या प्रगतीचा सह-अध्यक्षांनी आढावा घेतला. या उपक्रमांमध्ये द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक अधिक कार्यक्षम, सुलभ आणि सक्षम बनवण्याची क्षमता असल्याचे नमूद करण्यात आले. या उपक्रमांच्या वेळेत अंमलबजावणीसाठी एकत्रितपणे काम करण्याकरिता पावले उचलण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली.

द्विपक्षीय गुंतवणुकीचा ओघ वाढवण्याची क्षमता असलेल्या क्षेत्रांवर प्रतिनिधी मंडळांनी चर्चा केली. ऊर्जा, उद्योग, लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ, अन्न सुरक्षा, कृषी क्षेत्रातील नवोन्मेष आणि स्टार्टअप परिसंस्थेत एकत्रितपणे काम करणे ही क्षेत्रे यामध्ये समाविष्ट आहेत.

व्यापक आर्थिक संबंधांना पाठिंबा देण्यासाठी हवाई संपर्क वाढवण्याच्या उद्देशाने, अबू धाबी आणि भारत यांच्यातील नागरी-विमान वाहतूक सहकार्यावरही बैठकीत चर्चा झाली. याच संदर्भात, भारतातील गुजरात राज्यातील धोलेरा येथे विमान वाहतूक आणि लॉजिस्टिक्स केंद्र विकसित करण्याच्या गुंतवणुकीच्या संधी आणि सहकार्यावरही दोन्ही बाजूंनी विचारविनिमय करण्यात आला.

याशिवाय, भारतातील युएईच्या गुंतवणुकीवर व कंपन्यांवर, तसेच युएईमधील भारतीय गुंतवणुकीवर व कंपन्यांवर परिणाम करणाऱ्या प्रलंबित मुद्द्यांचा निपटारा करण्यासाठी 'युएई-भारत फास्ट ट्रॅक यंत्रणे'द्वारे केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची दोन्ही बाजूंनी दखल घेतली. या समस्यांचे वेळेत निवारण व्हावे यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले.

बैठकीच्या सांगतेवेळी, सह-अध्यक्षांनी गुंतवणुकीवरील भारत-यूएई उच्चस्तरीय कृती दलाच्या यशातील निरंतर योगदानाबद्दल दोन्ही देशांचे राजदूत, अधिकारी आणि तांत्रिक पथकांचे विशेष आभार मानले.

गुंतवणुकीवरील भारत-यूएई उच्चस्तरीय कृती दलाच्या 14 व्या बैठकीवर भाष्य करताना, या कृती दलाचे सह-अध्यक्ष आणि भारत सरकारचे वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले:

“जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारत सर्वसमावेशक, शाश्वत आणि मजबूत विकासासाठी कटिबद्ध आहे. या प्रवासात संयुक्त अरब अमिराती (युएई) हा एक विश्वासू मित्र आणि भागीदार आहे. आज पार पडलेल्या संयुक्त कार्यगटाच्या बैठकीत अनेक उपक्रमांअंतर्गत झालेली सकारात्मक प्रगती अधोरेखित करण्यात आली, तसेच सहकार्याच्या भविष्यातील दिशांवर सखोल चर्चा झाली. गुंतवणूक, नावीन्यपूर्ण विकास आणि आपल्या नागरिकांच्या सुरक्षेतील सहकार्यावर अधिष्ठित असलेली ही भागीदारी दोन्ही देशांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली एका महत्त्वपूर्ण परिवर्तनासाठी सज्ज आहे.”

गुंतवणुकीवरील भारत-यूएई उच्चस्तरीय कृती दलाचे सह-अध्यक्ष आणि अबु धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (ADIA) चे व्यवस्थापकीय संचालक महामहीम  शेख हमेद बिन झायेद अल नाहयान म्हणाले: "युएई आणि भारत यांच्यातील प्रदीर्घ आणि सातत्याने विस्तारणाऱ्या भागीदारीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाच्या वळणावर पार पडत आहे. 2013 मधील स्थापनेपासूनच, आमचा हा संयुक्त कार्यगट मोकळा संवाद, प्रत्यक्ष समस्या निवारण आणि परस्पर आर्थिक प्राधान्यक्रमांना पुढे नेण्यासाठी एक अत्यंत मौल्यवान व्यासपीठ ठरला आहे. गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना पाठबळ देऊन, अडीअडचणी दूर करून आणि सहकार्याच्या नव्या संधी शोधून या कार्यगटाने आपल्या दोन्ही देशांना अधिक जवळ आणण्यात मोलाची मदत केली आहे."

 

* * *

निलिमा चितळे/सोनाली काकडे/श्रद्धा मुखेडकर/वैभवी जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2316119) अभ्यागत कक्ष : 9