युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
पंतप्रधानांनी नशामुक्त युवा अभियानाला तरुणांचा वाढता प्रतिसाद केला अधोरेखित
‘नशामुक्तीचा संदेश’ आणि तरुणांच्या नेतृत्वाखालील सर्जनशील जनजागृती उपक्रमाचे पंतप्रधानांकडून कौतुक
Posted On:
27 SEP 2026 5:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या आकाशवाणीवरील मासिक कार्यक्रम ‘मन की बात’च्या 138व्या भागात देशभरातील तरुणांचा नशामुक्त युवा अभियानातील वाढता सहभाग अधोरेखित केला. देशातील लाखो तरुणांनी अमली पदार्थ आणि व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प केला असून, इतरांमध्येही याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी ते स्वीकारत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी सांगितले की, 100 आठवड्यांचे ‘विकसित भारतासाठी नशामुक्त युवा अभियान’ हे ‘मेरा युवा भारत (माय भारत)’ आणि ‘राष्ट्रीय सेवा योजनेशी (रासेयो)’ संबंधित स्वयंसेवकांसोबतच शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे तसेच विविध सामाजिक आणि आध्यात्मिक संस्थांना एकत्र आणत आहे. या अभियानाचा भाग म्हणून अलीकडच्या काळात देशभरात हजारो संकल्प समारंभ आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तरुणांच्या नेतृत्वाखालील जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधानांनी विशेषतः ‘नशामुक्तीचा संदेश’ या उपक्रमाचे कौतुक केले. तरुण आपल्या स्वतःच्या भाषांमधून आणि सर्जनशील अभिव्यक्तीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवत असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘मन की बात’च्या माध्यमातून यापूर्वी तरुणांना या अभियानात आपल्या सर्जनशीलतेचे योगदान देण्याचे आवाहन केल्याची आठवण करून देत पंतप्रधानांनी देशभरातील तरुणांकडून मिळालेल्या प्रतिसादाचे कौतुक केले. तरुणांनी आपल्या सर्जनशीलतेचा वापर करून जनजागृती करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी माय भारतच्या माध्यमातून गीत, घोषवाक्य लेखन आणि पथनाट्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
अभियानाचा संदेश अधिक व्यापक करण्यासाठी तरुणांकडून सोशल मीडियाचा वाढता वापर होत असल्याचेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले. #NashaMuktYuva या हॅशटॅगच्या माध्यमातून तरुण सर्जनशील आशयाचा वापर करून अभियानाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवत आहेत. या अभियानात संदेश, माध्यम आणि त्यामागची प्रेरक शक्ती तरुण स्वतःच बनले आहेत, असे त्यांनी नमूद केले.
अभियानाची जनजागृती मोहीम पुढेही सुरू ठेवण्यासाठी आगामी काळात आरोग्य तपासणी शिबिरे आणि ध्यानधारणा शिबिरांसारखे उपक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत. या माध्यमातून तरुणांमध्ये निरोगी जीवनशैली आणि सर्वांगीण आरोग्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
‘विकसित भारतासाठी नशामुक्त युवा अभियान’ हे तरुणांमध्ये सातत्याने जनजागृती वाढवणे, समाजाचा सहभाग प्रोत्साहित करणे आणि अमली पदार्थांच्या गैरवापराविरोधात सामूहिक संकल्प बळकट करणे या उद्देशाने 100 आठवड्यांच्या सातत्यपूर्ण अभियानाच्या स्वरूपात राबवले जात आहे. माय भारत, रासेयो, शैक्षणिक संस्था आणि सहकारी संघटनांच्या माध्यमातून भारतातील तरुणांची ऊर्जा आणि सर्जनशीलता एका निरोगी आणि नशामुक्त पिढीच्या निर्मितीसाठी वापरण्याचा या अभियानाचा प्रयत्न आहे.
* * *
सुषमा काणे/नितीन गायकवाड/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2315586)
अभ्यागत कक्ष : 9