अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबई विमानतळावर सुमारे 15 कोटी रुपये किमतीचे 9.40 किलो विदेशी सोने जप्त करत तिघांना केली अटक

Posted On: 25 SEP 2026 4:43PM by PIB Mumbai

 

सोने तस्करीविरोधातील सातत्यपूर्ण कारवाई जारी राखत  महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबई विभागीय पथकाने विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे दुबईहून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या तीन भारतीय प्रवाशांना 23 सप्टेंबर 2026 रोजी पहाटे अडवले. मुंबई विमानतळावरील एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) आणि सीमाशुल्क विभागाने देखील यात सहकार्य केले.

या प्रवाशांच्या सामानाची सखोल तपासणी केल्यावर सोने लपवण्याची एक अत्यंत अत्याधुनिक आणि असामान्य पद्धत उघडकीस आली. या प्रवाशांनी विदेशी सोन्याचे बारीक पावडरमध्ये रूपांतर करून ते त्याच रंगाच्या, पोताच्या, तितक्याच घट्टपणे पॅक केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये मिसळले होते, जेणेकरून ते सहजासहजी नजरेस पडणार नाही.

दुधाची पावडर, ओट्स, विविध प्रकारची पिठे, न्युट्रिला आणि नारळाच्या दुधाची पावडर यांसारख्या अनेक सामान्य दिसणाऱ्या खाद्यपदार्थांच्या पाकिटांमध्ये सोन्याची पावडर लपवलेली आढळली. विभागाने सोन्याची पावडर मिसळलेले सुमारे 33.50 किलो खाद्यपदार्थ त्या तीन प्रवाशांच्या सामानातून जप्त केले.

काळजीपूर्वक विलगीकरण आणि तपासणी केल्यानंतर त्यातून 9.40 किलो परदेशी बनावटीचे सोने मिळाले. त्याची किंमत सुमारे 14.81 कोटी रुपये असून सीमाशुल्क कायदा, 1962 मधील संबंधित तरतुदींनुसार हे सोने जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान तिन्ही प्रवाशांनी एकाच संघटित सोने तस्करी करणाऱ्या टोळीच्या वतीने काम करत असल्याची कबुली दिली. त्यानंतर सीमाशुल्क अधिनियम, 1962 मधील संबंधित तरतुदींनुसार तिन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली.

या कारवाईत सोने तस्करीची एक नवी आणि अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धत उघडकीस आली आहे. नियमित तपासणीदरम्यान शोध लागणे टाळण्यासाठी सोन्याची पावडर विविध प्रकारच्या पॅकेज्ड खाद्यपदार्थांमध्ये अत्यंत चलाखीने मिसळण्यात आली होती.

***

निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2315044) अभ्यागत कक्ष : 11