आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला 8 वर्षे तर आयुष्मान भारत डिजिटल मिशनला 5 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित 'आरोग्य मंथन 2026' चे केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते उद्घाटन
60 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना कवच प्रदान करणारी एबी पीएम जेएवाय ही जगातील सर्वात मोठी आरोग्य हमी योजना: केंद्रीय आरोग्य मंत्री
Posted On:
25 SEP 2026 3:18PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच रसायन आणि खते मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 'आरोग्य मंथन 2026' चे उद्घाटन झाले. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला (एबी पीएम जेएवाय) 8 वर्षे तर आयुष्मान भारत डिजिटल मिशनला (एबीडीएम) 5 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (एनएचए) आयोजित केलेल्या या कार्यक्रमात, भारताच्या आरोग्य हमी आणि डिजिटल आरोग्य परिसंस्थेच्या प्रगतीवर आणि तिच्या पुढील टप्प्यातील प्राधान्यक्रमांवर विचारविनिमय करण्यासाठी वरिष्ठ सरकारी अधिकारी, आरोग्य सेवा प्रदाते, विमा कंपन्या, तंत्रज्ञान आणि डिजिटल आरोग्य तज्ञ, शिक्षणतज्ञ, विकास भागीदार आणि इतर हितधारक सहभागी झाले होते.

उपस्थितांना संबोधित करताना जे. पी. नड्डा यांनी एबी पीएम-जेएवाय योजनेला 8 वर्षे आणि एबीडीएम योजनेला 5 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सर्व हितधारकांचे अभिनंदन केले. या महत्वपूर्ण टप्प्यांमुळे आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्याची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या दूरदृष्टीनुसार समाजातील गरीब आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठीची वचनबद्धता नव्याने दृढ करण्याची संधी मिळाली असल्याचे, त्यांनी सांगितले.
नड्डा यांनी एबी पीएम-जेएवाय योजनेच्या प्रारंभापासून झालेल्या महत्वपूर्ण विस्तारावर प्रकाश टाकला. ही योजना जगातील सर्वात मोठा आरोग्य विमा कार्यक्रम म्हणून उदयास आली असून 60 कोटींहून अधिक लाभार्थी तसेच 13 कोटींहून अधिक रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याच्या प्रक्रियेला सुलभता आली आहे, असे त्यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत 2 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या उपचारांना मदत मिळाली आहे, असेही ते म्हणाले.

सरकारने या योजनेचा आणखी विस्तार करून 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना, त्यांची सामाजिक-आर्थिक स्थितीलक्षात न घेता , योजनेच्या कक्षेत आणल्याचे त्यांनी सांगितले. विशेष करून स्थलांतरित कामगारांसाठी या योजनेअंतर्गत उपचार सुविधा देशभरात उपलब्ध होण्यासाठी पोर्टेबिलिटीच्या महत्त्वावरही त्यांनी प्रकाश टाकला. हा कार्यक्रम पुढे नेण्यात राज्य सरकारे, आरोग्य सेवा संस्था आणि इतर हितधारकांनी दिलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.
एबी पीएम-जेएवाय आणि एबीडीएमच्या प्रवासातून आरोग्यसेवेतील तंत्रज्ञानाची परिवर्तनात्मक भूमिका अधोरेखित झाली आहे, असे नड्डा यांनी सांगितले. विविध ठिकाणी रुग्णांची ओळख पटवणे, मान्यता देणे आणि उपचारांची उपलब्धता सुलभ करणे त्यासाठी डिजिटल प्रणाली उपयुक्त ठरत असल्याचे ते म्हणाले. एबीडीएम अंतर्गत झालेल्या प्रगतीवर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की, 97.8 कोटींहून अधिक आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट्स (आभा) तयार करण्यात आले असून, 121 कोटींहून अधिक आरोग्य नोंदी जोडल्या गेल्या आहेत, तर 5.6 लाखांहून अधिक आरोग्य सुविधा आणि सुमारे 11 लाख आरोग्यसेवा व्यावसायिक एबीडीएम परिसंस्थेवर नोंदणीकृत आहेत. नॅशनल हेल्थ क्लेम्स एक्सचेंजच्या विकासावरही त्यांनी प्रकाश टाकला. रुग्णालये आणि विमा कंपन्यांना एका समान डिजिटल मंचावर आणणे, हा या प्रणालीचा उद्देश आहे.

आरोग्य मंथन 2026मध्ये सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांचा उल्लेख करताना नड्डा म्हणाले की, यामुळे डिजीटल आरोग्यसेवा अधिक बळकट होईल, आरोग्यविषयक माहितीचा सुरक्षित वापर सुलभ होईल आणि आरोग्य क्षेत्रातील संशोधन, नवोपक्रम आणि माहितीवर आधारित निर्णय प्रक्रियेसाठी नवीन संधी निर्माण होतील.
नड्डा यांनी ही वाटचाल सातत्यपूर्ण पद्धतीने सुरू ठेवण्यावर भर दिला आणि आरोग्यसेवा अधिक सुलभ, कार्यक्षम रुग्णकेंद्रित करण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे आवाहन केले.

आरोग्य मंथन 2026 मधील चर्चेतून प्रत्यक्ष अंमलबजावणीयोग्य निष्कर्ष समोर येतील आणि भारताची आरोग्य परिसंस्था बळकट करण्यासोबत मानवसेवा करण्याच्या कार्यात मोलाची भर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नीती आयोगाचे आरोग्य सदस्य, डॉ. एम. श्रीनिवास यांनी या प्रसंगी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे अभिनंदन केले. एबी पीएम- जेएवाय मुळे झालेल्या बदलांवर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, या योजनेमुळे विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अधिक आत्मविश्वासाने आणि कमी आर्थिक बोज्यासह आरोग्य सेवा मिळणे शक्य झाले आहे.

भारताच्या आरोग्य विमा आणि सुरक्षा परिसंस्थेचा डिजीटल पाया बळकट करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले विविध उपक्रम हे आरोग्य मंथन 2026 चे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. यामध्ये राष्ट्रीय आरोग्यसेवा पुरवठादार नोंदणी कार्यालय मोबाईल अॅप, आदर्श डिजीटल आरोग्य सुविधेसाठी मार्गदर्शक पुस्तिका, सुरक्षित माहिती वातावरण उपयोजन आणि एबी पीएम-जेएवाय अंतर्गत दाव्यांच्या स्वयंचलित निपटारा प्रक्रियेसाठीच्या आराखड्याचा समावेश होता.

आरोग्य मंथन 2026 मधील चर्चा या आरोग्यसेवांची कार्यक्षमता, गुणवत्ता आणि परस्पर सुसंगतता बळकट करण्यावर केंद्रित होत्या.
***
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/विजयालक्ष्मी साळवी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2315014)
अभ्यागत कक्ष : 12