उपराष्ट्रपती कार्यालय
सुरक्षा आणि विकास प्रक्रियेशी संबंधित उदयोन्मुख आव्हानांचा सामना करण्यासाठी ग्लोबल साऊथ अंतर्गतच्या देशांमध्ये अधिक धोरणात्मक सहकार्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीतून मानवाच्या सामूहिक कल्याणाचे हित साधले जावे : उपराष्ट्रपती
Posted On:
25 SEP 2026 2:07PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज इन स्टेप अर्थात इंटरनॅशनल स्ट्रॅटेजिक एंगेजमेंट प्रोग्राम (IN-STEP - आंतरराष्ट्रीय धोरणात्मक संवाद कार्यक्रम) या उपक्रमाच्या चौथ्या पर्वात सहभागींना संबोधित केले. उप राष्ट्रपती भवनात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपराष्ट्रपतींनी या उपक्रमासाठी आलेल्या देशातील, तसेच मित्र देश आणि ग्लोबल साऊथ अंतर्गतच्या देशांमधून आलेल्या 38 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्वागतही केले.
इन-स्टेप या उपक्रमातून अर्थपूर्ण संवाद, परस्पर सहकार्याने शिकणे तसेच धोरणात्मक सहभागासाठी एक शाश्वत मंच निर्माण करण्याची भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळातील सामायिक वचनबद्धता दिसून येते असे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन म्हणाले. आजच्या परस्परांशी जोडलेल्या जगात कोणत्याही राष्ट्राला उदयोन्मुख आव्हानांचा एकट्याने सामना करणे अत्यंत कठीण झाले आहे, ही बाबही त्यांनी नमूद केली.
तंत्रज्ञान, सायबर क्षेत्र, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऊर्जा सुरक्षा, आर्थिक लवचिकता, सागरी सुरक्षा, हवामान बदल आणि पुरवठा साखळी या क्षेत्रांशी संबंधित आव्हानांसोबतच पारंपरिक सुरक्षा विषयक आव्हानेही मोठ्या प्रमाणावर जोडली जात आहेत, त्यामुळे धोरणात्मक परिस्थितीत वेगाने बदल घडून येऊ लागले असल्याचे निरीक्षणही उपराष्ट्रपतींनी नोंदवले.
अशावेळी इन-स्टेप या उपक्रमाच्या माध्यमातून व्यापक धोरणात्मक दृष्टिकोन विकसित करण्याची, जागतिक घडामोडींच्या दीर्घकालीन परिणामांचा अंदाज मांडण्याची आणि त्यानुसार योग्य उपाययोजना आखण्याची संधी लाभली असल्याचे ते म्हणाले.
विचार जागतिक पातळीवरचा हवा, संवाद धोरणात्मक हवा आणि कृती एकजुटीने हवी असा सल्ला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी दिला. ही तत्वेच या उपक्रमाचे मूळ तत्त्वज्ञान आहेत असे त्यांनी सांगितले. परस्पर सामायिक आव्हानांना, परस्पर सहकार्य, समन्वय आणि सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे तोंड दिले जाऊ शकते ही बाबही त्यांनी अधोरेखित केली.
आज आंतरराष्ट्रीय चर्चांची दिशा ठरवण्यात ग्लोबल साऊथ अंतर्गत'च्या देशांची भूमिका खूप महत्वाची असल्याचे उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले. या देशांकडे असलेले व्यापक अनुभव आणि या देशांचे विकासाच्यादृष्टीने असलेले प्राधान्यक्रम यातून लवचिकता, विकास, सुरक्षा, सुशासन आणि सहकार्याची मौल्यवान शिकवण मिळते असे उपराष्ट्रपती म्हणाले.
ग्लोबल साऊथसोबतचे भारताचे संबंध हे परस्पर आदर सन्मान, सामायिक हितसंबंध, सार्वभौम समानता आणि प्रत्येक राष्ट्राच्या विकासात्मक तसेच धोरणात्मक प्राधान्यक्रमांचा आदर राखण्यावर आधारलेले असल्याचे त्यांनी सांगितले.
भ्रष्टाचार ग्लोबल साऊथच्या देशांसमोरील प्रमुख आव्हानांपैकी एक असल्याची बाब त्यांनी नमूद केली. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समन्वयीत प्रयत्नांचे आवाहनही त्यांनी केले.
यंदाच्या स्टेप-इन या उपक्रमाच्या चौथ्या पर्वात 22 देशांमधील 25 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसह एकूण 38 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यात श्रीलंका, सेशल्स, मंगोलिया, नेपाळ, मॉरिशस, मालदीव, ओमान, गयाना, चिली, अर्जेंटिना, फिलीपिन्स, थायलंड, आर्मेनिया, किर्गिस्तान, कतार, म्यानमार, उझबेकिस्तान आणि ब्राझील या देशांचा समावेश आहे.
इन-स्टेप हा उपक्रम दोन आठवडे चालणार आहे. परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाच्या वतीने आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या सहकार्याने संयुक्तपणे या उपक्रमाचे आयोजन केले गेले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांना धोरणात्मक, सुरक्षा विषयक तसेच विकासात्मक मुद्द्यांवरील दृष्टिकोनांची देवाणघेवाण करण्याची, आणि संस्थात्मक तसेच व्यावसायिक सहकार्य बळकट करण्यासाठीचा एक मंच उपलब्ध झाला आहे.
***
निलिमा चितळे/तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2314964)
अभ्यागत कक्ष : 8