वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

14 व्या पूर्व आशिया शिखर परिषद अर्थमंत्र्यांच्या बैठकीत आणि 23 व्या आसियान-भारत अर्थमंत्र्यांच्या चर्चेत भारत सहभागी

Posted On: 24 SEP 2026 8:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 सप्‍टेंबर 2026

 

फिलिपिन्समधील मनिला येथे आयोजित 14व्या पूर्व आशिया शिखर परिषद अर्थमंत्र्यांच्या बैठकीत (ईएएस-ईएमएम) आणि 23व्या आसियान-भारत अर्थमंत्र्यांच्या चर्चेत, वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव नितीन कुमार यादव यांच्या नेतृत्वात भारतीय प्रतिनिधीमंडळ सहभागी झाले.

ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड, तिमोर-लेस्ते आणि व्हिएतनाम या सर्व 11 आसियान  देशांचे अर्थमंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधी, तसेच भारत, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, न्यूझीलंड, कोरिया, रशिया आणि अमेरिका यांसारख्या ईएएस भागीदार देशांचे प्रतिनिधी या बैठकांमध्ये सहभागी झाले.

या बैठकांमुळे सध्याच्या क्षेत्रीय आणि जागतिक आर्थिक घडामोडींबाबत एकमेकांचे विचार जाणून घेणे शक्य झाले. आसियान सचिवालयाने वर्ष 2027 साठी प्रादेशिक आणि जागतिक आर्थिक स्थितीचा आढावा सादर केला; यामध्ये व्यापार आणि गुंतवणुकीच्या ओघावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचाही समावेश होता.

आसियान-भारत अर्थमंत्र्यांच्या सल्लामसलतीत भारताने बळकट व्यापारी भागीदारीला चालना देण्यासाठी आणि प्रादेशिक व्यापार करार परस्परहिताचे असतील, याची सुनिश्चिती करण्याबाबत आपली निरंतर वचनबद्धता अधोरेखित केली. चर्चा प्रामुख्याने सध्या आढावा सुरू असलेल्या आसियान-भारत वस्तू व्यापार करारावर (एआयटीआयजीए) केंद्रित होती, याचा उद्देश सध्याची व्यापार तफावत दूर करणे आणि व्यापार ओघ वृद्धी सुलभ करण्याचा आहे.

वर्ष 2025–26 मध्ये भारत आणि आसियान यांच्यातील द्विपक्षीय व्यापार 128.38 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर पोहोचला. भारताच्या एकूण जागतिक व्यापारात आसियानचा वाटा 10.55 टक्के असून यातून या भागीदारीचे महत्त्व अधोरेखित होते.  

एआयटीआयजीए आढाव्याची फलश्रुती परस्परांना फायदेशीर ठरावी आणि हा करार संतुलित, अधिक प्रभावी, हितधारकांना सुलभ व व्यवसायांसाठी व्यापार-पूरक ठरेल, याबाबतच्या सुनिश्चितीसाठी भारताने आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली.

या बैठकांदरम्यान भारतीय प्रतिनिधीमंडळाने 22 सप्टेंबर 2026 रोजी फिलिपिन्समध्ये कार्यरत असलेल्या भारतीय उद्योजकांशी संवाद साधला आणि त्यांना वस्तू व सेवांच्या निर्यातीदरम्यान भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा केली. तसेच प्रतिनिधीमंडळ 23 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित आसियान-भारत व्यापार मंच 2026 मध्येही सहभागी झाले. 

   

 

* * *

सुषमा काणे/सोनाली काकडे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2314616) अभ्यागत कक्ष : 8