महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अवैध दत्तकविधान रोखण्यासाठी ‘कारा’ची मणिपूरमध्ये दत्तकविधान जागरूकता कार्यशाळा


“कायदेशीर दत्तकविधान- सुरक्षित बालपण, सुरक्षित भविष्य; बेकायदा दत्तकविधानाला नाही म्हणा” या संकल्पनेखाली कार्यशाळेचे आयोजन

सुमारे 150 हितधारकांना कायदेशीर,सुरक्षित आणि बालक-केंद्रित दत्तक प्रक्रियेबद्दल दिली माहिती

Posted On: 23 SEP 2026 8:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,23 सप्टेंबर 2026

भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाने (कारा) 23 सप्टेंबर 2026 रोजी मणिपूरमधील इम्फाळ येथील नॉर्थ ए.ओ.सी. येथे “कायदेशीर दत्तक- सुरक्षित बालपण- सुरक्षित भविष्य- बेकायदा दत्तकविधानाला नाही म्हणा!” या संकल्पनेखाली दत्तकविधान जागरूकता कार्यशाळेचे आयोजन केले.

कायदेशीर, पारदर्शक आणि बालक-केंद्रित दत्तकविधान प्रक्रियेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि बेकायदेशीर दत्तकविधान पद्धतींशी संबंधित धोके व परिणाम अधोरेखित करण्यासाठी या कार्यशाळेत सुमारे 150 सहभागी एकत्र आले होते.

या कार्यशाळेत समाजकल्याण विभाग, बाल कल्याण समित्या, जिल्हा गुन्हे अन्वेषण विभाग, विशेष प्रशासकीय संस्था, केंद्रीय तपास संस्था, आरोग्य आणि पोलीस विभाग, न्यायपालिका, विधी सेवा प्राधिकरण, रुग्णालये आणि खाजगी नर्सिंग होम, आशा आणि एएनएम कार्यकर्त्या, नागरी समाज संघटना आणि प्रसारमाध्यमे यांच्यासह इतर प्रतिनिधी एकत्र आले होते.

सहभागींना संबोधित करताना मणिपूरच्या समाजकल्याण विभागाचे संचालक शेख अब्दुल हकीम यांनी मुलांना अनियंत्रित आणि बेकायदा  दत्तक व्यवस्थेपासून संरक्षण मिळावे,  यासाठी सर्व संबंधितांच्या समन्वित प्रयत्नांच्या महत्त्वावर भर दिला. ‘कारा’च्या सहायक संचालक रुपंशी पांडे यांनी “बेकायदा दत्तकविधान रोखण्यासाठी प्रत्येक स्तरावर दक्षता आणि समन्वित कृती आवश्यक आहे,” असे सांगून प्रत्येक स्तरावर दक्षता आणि समन्वित कृतीच्या गरजेवर प्रकाश टाकला.

संवादात्मक घटकाचा भाग म्हणून सहभागींना चार गटांमध्ये विभागण्यात आले. या गटचर्चांनी सहभागींना कायदेशीर दत्तक प्रक्रियेच्या चौकटीबद्दलच्या त्यांच्या सध्याच्या समजावर चिंतन करण्यासाठी, जागरूकता आणि समन्वयातील उणिवा ओळखण्यासाठी तसेच प्रतिबंध, ओळख, अहवाल आणि प्रतिसाद यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी व्यावहारिक सूचना मांडण्यास एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

त्यानंतर प्रत्येक गटाने आपली प्रमुख निरीक्षणे आणि शिफारसी सादर केल्या, तसेच आंतर-विभागीय समन्वय, वेळेवर माहितीची देवाणघेवाण, जबाबदार संदर्भ आणि वैधानिक अवलंबन प्रक्रियेचे काटेकोर पालन यांच्या महत्त्वावर भर दिला.

या सत्रात वेळेवर हस्तक्षेप करण्याचे महत्त्व आणि मुलांच्या संरक्षणासाठी क्षेत्रीय स्तरावरील बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आला.

अधिकृत दत्तकविधान प्रक्रियेचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि बेकायदा  दत्तकविधान प्रक्रियेतील धोक्यांविषयी अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी कायदेशीर दत्तकविधान प्रक्रियेवर आधारित एक काल्पनिक चित्रपटही सादर करण्यात आला. या कार्यशाळेत राज्य बाल भवनातील मुलांनी एक बाल-केंद्रित सादरीकरणही केले, त्यामधून  कौटुंबिक काळजीचा संदेश आणि मुलांना सुरक्षित, प्रेमळ,  आधार देणारे कौटुंबिक वातावरण देण्याचे महत्त्व अधोरेखित झाले. या छोट्या नाटकाने प्रेक्षकांशी नाते जोडले आणि कार्यशाळेच्या बाल-केंद्रित संदेशाला अधिक दृढ केले.

मणिपूर कार्यशाळेने बाल संरक्षण आणि दत्तकविधान प्रक्रियेमध्ये सातत्यपूर्ण जागरूकता, अधिक मजबूत समन्वय आणि वेळेवर हस्तक्षेप करण्याची गरज अधोरेखित केली. सहभागींना त्यांच्या संबंधित जबाबदाऱ्यांविषयी आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या प्रत्येक मुलाशी कायद्यानुसारच आणि मुलाच्या सर्वोत्तम हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन व्यवहार करण्याच्या महत्त्वाविषयी संवेदनशील करण्यात आले.

सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2314157) अभ्यागत कक्ष : 15