युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘माय भारत' मंचाने तीन वर्षांहून कमी कालावधीत पार केला तीन कोटीहुन अधिक युवकांच्या नोंदणीचा ऐतिहासिक टप्पा

Posted On: 23 SEP 2026 5:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,23 सप्टेंबर 2026

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने युवा सहभागाचा महत्वाकांक्षी मंच असलेल्या 'मेरा युवा भारत' (माय भारत) अंतर्गत 3 कोटींहून अधिक नोंदणी साध्य करत मोठा टप्पा गाठला आहे. ही ऐतिहासिक कामगिरी भारतातील सर्वात मोठ्या युवा सहभाग परिसंस्थेच्या विस्ताराचे प्रतीक असून या व्यासपीठाच्या माध्यमातून युवावर्गासाठी अनुभवाधारित अध्ययन, स्वयंस्फूर्तीने सहभाग, नेतृत्त्व विकास, नागरी कार्यात सहभाग आणि विविध युवा केंद्रित उपक्रमांमध्ये सहभागी होण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 31 ऑक्टोबर 2023 रोजी माय भारत या  उपक्रमाची सुरुवात झाली होती. देशातील युवावर्ग राष्ट्र उभारणीच्या प्रवासात आपले योगदान देऊ शकेल या विचारातून हे  तंत्रज्ञान आधारित व्यासपीठ उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांना एका सामायिक व्यासपीठावर एकत्र आणून त्यांना राष्ट्र उभारणीच्या कार्यात अधिकाधिक सहभागी करुन घेण्यावर विशेष भर दिला होता. भारतीय युवकांमधील ऊर्जा, महत्वाकांक्षा आणि क्षमतांचे रूपांतर विकसित भारत @2047 च्या दिशेने सुरु असलेल्या अर्थपूर्ण सहभागात करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संस्थात्मक यंत्रणा म्हणून या व्यासपीठाची संकल्पना मांडण्यात आली होती.

आपल्या स्थापनेपासूनच ‘माय भारत’ ने अत्यंत जलद विस्तार अनुभवला आहे. या व्यासपीठाने ऑक्टोबर 2025 मध्ये 2 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा पार केला तर ऑगस्ट 2026 मध्ये 2.46 कोटींहून अधिक नोंदणी पर्यंत झेप घेतली. आता या उपक्रमाने आपल्या पुढील टप्प्यात पार केलेली 3 कोटीहुन अधिक नोंदणी या व्यासपीठावरील युवकांच्या सातत्यपूर्ण वाढत्या सहभागाचे प्रतिबिंब दर्शवते.

माय भारत व्यासपीठ हे आज एक असे सामायिक डिजिटल प्रवेशद्वार आहे ज्यामधून तरुण पिढी अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रम, स्वयंसेवेच्या संधी, प्रश्नमंजुषा, नेतृत्त्वविषयक उपक्रम, युवा संवाद आणि सामुदायिक सहभागाचे उपक्रम शोधू शकते आणि त्यात सहभागी होऊ शकते. ऑगस्ट 2026 पर्यंत  सुमारे 25,000  'अनुभवाधिरीत शिक्षण कार्यक्रमां'मध्ये  1.22 लाखांहून अधिक तरुणांनी नोंदणी केली होती; या कार्यक्रमांमुळे तरुणांना पारंपरिक वर्गाबाहेरील उपक्रमांत सहभागी होऊन प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली आहे.

हे व्यासपीठ तांत्रिकदृष्ट्याही विकसित होत राहिले आहे. तरुणांना व्यावसायिक प्रोफाइल तयार करण्यात मदत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित CV Builder सुरू करण्यात आला आहे. तसेच, डिजिटल सेवांचा विस्तार आणि तळागाळातील युवकांपर्यंत अधिक व्यापक पोहोच सुनिश्चित करून हे व्यासपीठ अधिक सक्षम करण्यात येत आहे.

माय भारत द्वारे राबविला जाणारा एक प्रमुख उपक्रम म्हणजे विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग, व्हीबीवायएलडी 2027. हा उपक्रम भारतीय तरुणांना 'विकसित भारत @2047 च्या ध्येयासाठी त्यांच्या कल्पना, सर्जनशीलता, नेतृत्वगुण आणि नाविन्यपूर्ण विचार मांडण्याच्या विविध संधी उपलब्ध करून देतो. या उपक्रमाची सुरुवात 17 ऑगस्ट 2026 रोजी विकसित भारत क्विझने झाली असून,  माय भारत  प्लॅटफॉर्मवर ती 30 सप्टेंबर 2026 पर्यंत खुली राहणार आहे.

नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत मोहिमेद्वारे, माय भारत, अधिक आरोग्यदायी आणि अंमली पदार्थ-मुक्त भारतासाठी तरुणांना संघटित करण्याच्या देशव्यापी प्रयत्नांमध्येही योगदान देत आहे.

त्यामुळे, 3 कोटींहून अधिक नोंदणींचा हा टप्पा केवळ नोंदणींच्या संख्येतील वाढ दर्शवत नाही; तर तो एका अशा राष्ट्रीय व्यासपीठाचा विस्तार दर्शवतो ज्याद्वारे भारतीय तरुण अनुभवातून शिकू शकतात, सामुदायिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात, नेतृत्वगुण विकसित करू शकतात आणि देशाच्या विकासप्रवासात आपल्या कल्पनांचे योगदान देऊ शकतात.

'विकसित भारत @2047 च्या दिशेने अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी भारतातील तरुण लोकसंख्येला सक्षम करण्याचा  दृष्टीकोन बाळगत, माय भारत,   डिजिटल आणि तळागाळातील परिसंस्थेचा विस्तार जारी राखत , युवा शक्ती, जन भागीदारी आणि तरुणांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रनिर्मिती बळकट करण्यावर आपले लक्ष केंद्रित करत आहे.


निलिमा चितळे/भक्ती सोनटक्के/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2313970) अभ्यागत कक्ष : 8