रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नवी दिल्ली येथे वैधानिक पूर्ण आयोगाची बैठक
Posted On:
22 SEP 2026 10:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,22 सप्टेंबर 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) आज नवी दिल्ली येथे आयोगाच्या सातही अभिमत सदस्यांच्या प्रतिनिधींची वैधानिक पूर्ण आयोगाची बैठक आयोजित केली होती. मानवाधिकारांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी विविध आयोगांमधील परस्पर समन्वय आणि सहकार्य वाढवणे, हे या बैठकीचे उद्दिष्ट होते.
एनएचआरसीचे अध्यक्ष न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यन, बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. विविध आयोगांमधील परस्पर सहकार्याने काम करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की हे आयोग समाजाच्या विविध घटकांच्या मानवी हक्कांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी अर्थपूर्ण कार्य करू शकतात. न्यायमूर्ती रामसुब्रमण्यन यांनी सर्व राष्ट्रीय आयोगांमध्ये समन्वय साधण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्याची सूचना केली. ते म्हणाले की प्रकरणांच्या तपासात यंत्रणेची कमतरता असेल, तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (एनएचआरसी) इतर आयोगांनाही सहकार्य करण्याच्या शक्यता पडताळून पाहू शकतो. आपल्या भाषणाचा समारोप करताना, त्यांनी भिक्षेकरी आणि मानसिकदृष्ट्या आजारी महिलांच्या पुनर्वसनासाठी उपाययोजनांचा अभाव असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नमूद केले. तसेच, त्यांनी जगभरात दिव्यांग व्यक्तींची (पीडब्ल्यूडी) मोठी संख्या असल्याचे अधोरेखित केले आणि त्यांच्या कल्याणासाठी असलेल्या धोरणांचे पुनरावलोकन करून त्यामधील त्रुटी ओळखण्याच्या गरजेवर भर दिला. दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षेचा अभाव आणि विमा कंपन्यांकडून विमा संरक्षण नाकारले जाणे, याबाबत एनएचआरसीच्या अध्यक्षांनी चिंता व्यक्त केली.
या बैठकीत असुरक्षित आणि उपेक्षित घटकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी एकात्मिक दृष्टिकोन, सहयोगात्मक प्रयत्नांसाठी प्रमुख क्षेत्रांची ओळख, सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण आणि प्रकरणांची पुनरावृत्ती कमी करणे, यासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया के. रहाटकर यांनी महिलांच्या हक्कांना प्रोत्साहन आणि संरक्षण देण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने केलेले कार्य आणि त्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या जनसुनावण्या, यासारख्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की तक्रारी हाताळण्याबरोबरच, राष्ट्रीय महिला आयोग महिलांच्या कल्याणासाठी संशोधन, जागरूकता आणि संपर्क आणि प्रशिक्षण कार्यक्रमांवरही लक्ष केंद्रित करते. राष्ट्रीय महिला आयोग केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या सहकार्याने मानवी तस्करीविरोधी मोहिमा राबवत आहे आणि विविध संस्थांच्या सहकार्याने पॉश (POSH), पॉक्सो (POCSO) आणि सायबर गुन्ह्यांशी संबंधित मुद्द्यांवर तरुणांशी संवाद साधत आहे, असे त्यांनी सांगितले.
भारतातील मानवी हक्कांचे संवर्धन आणि संरक्षणासाठी विविध आयोगांमधील सहकार्यात्मक प्रयत्नांप्रति नव्या वचनबद्धतेसह ही बैठक संपन्न झाली.



माधुरी पांगे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2313692)
अभ्यागत कक्ष : 5